भूसंपादनाचे काम अंतिम टप्प्यात

आशीष धनगर, ठाणे</strong>

मध्य रेल्वेच्या कल्याण-कसारा या तिसऱ्या मार्गिकेच्या गेली अनेक वर्षे रखडलेल्या कामासाठी भूसंपादनाची प्रक्रिया अंतिम टप्प्यात असून या प्रक्रियेनंतर म्हणजेच मार्चपासून मार्गिकेच्या कामाला प्रत्यक्षात सुरुवात होणार आहे. येत्या तीन वर्षांत मार्गिकेचे काम पूर्ण केले जाणार असले तरी वर्षांअखेपर्यंत या मार्गिकेवर पहिल्या टप्प्यात कल्याण ते आसनगाव रेल्वे वाहतूक सुरू करण्यात येणार असल्याचे रेल्वे प्रशासनाकडून सांगण्यात आले.

कल्याण ते कसारा दरम्यानच्या परिसरात मोठय़ा प्रमाणात नागरी वसाहती आणि गृहप्रकल्प उभे राहत असल्याने येथे लोकवस्ती वाढू लागली आहे. या लोकवस्तीच्या सार्वजनिक वाहतुकीचा भार रेल्वेस्थानकांवर वाढू लागला असून सर्वच स्थानकांवर मोठी गर्दी पाहायला मिळत आहे. सध्या या मार्गावर केवळ दोनच मार्गिका आहेत. त्यावरून उपनगरीय लोकल गाडय़ा आणि एक्स्प्रेस गाडय़ा धावतात. एक्स्प्रेसमुळे लोकल गाडय़ा विलंबाने धावतात. एक्स्प्रेस किंवा मालगाडीचा अपघात झाला तर मार्गच बंद होतो. अशा वेळी येथील प्रवासाचा मार्गच खुंटतो. या समस्येवर तोडगा म्हणून कल्याण-कसारा तिसऱ्या, चौथ्या मार्गिकेची योजना राबवण्यात येत आहे.

रेल्वे प्रशासनाने २०११ मध्ये तिसऱ्या मार्गिकेच्या कामाला मान्यता दिली. मात्र, या कामाला प्रत्यक्षात सुरुवात २०१६ मध्ये झाली; परंतु भूसंपादनाअभावी हे काम पूर्ण होऊ शकलेले नाही. आता भूसंपादनाची प्रक्रिया अंतिम टप्प्यात असून वर्षांअखेपर्यंत ही मार्गिका वाहतुकीसाठी खुली करण्यात येणार असल्याचे मध्य रेल्वेच्या घाटकोपर विभागाचे उपमुख्य अभियंता धर्मेद्र कुमार यांनी सांगितले. या कामासाठी ठाणे जिल्हा प्रशासन सहकार्य करीत असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

भिवंडीतील काम अंतिम टप्प्यात

या प्रकल्पासाठी उल्हासनगरमधील भूसंपादन अंतिम टप्प्यात आले आहे. भिवंडीतील २३ गावांपैकी १९ गावांचे भूसंपादन अंतिम टप्प्यात आहे. या जागेवर कोणतीही बांधकामे नसल्यामुळे भूसंपादनाचे काम फेब्रुवारीपर्यंत पूर्ण होणार आहे. तसेच कल्याणमधील १४ गावांचे भूसंपादन सुरू करण्यात येणार आहे. आसनगाव ते कसारा या मार्गावर काही ठिकाणी दगड फोडण्याचे काम १० जानेवारीपर्यंत सुरू करण्यात येणार आहे.

प्रकल्पाचे स्वरूप

६७ किमी तिसऱ्या मार्गिकेची लांबी

७९२ कोटी रु.मार्गिका उभारणीचा खर्च

३८ गावांतील ४२ हेक्टर भूसंपादन

७  मार्गिकेवर उभारण्यात येणारे पूल