कल्याण रेल्वे स्थानक परिसरात फेरीवाल्यांच्या उपद्रवामुळे प्रवाशांना चालणेही कठीण होऊन बसले आहे. त्यामुळे अनेक पादचारी स्कायवॉकचा आधार घेतात. असे असताना मुसळधार पावसात कल्याणमधील स्कायवॉकवर सर्वत्र पाणी साचू लागल्याने पादचाऱ्यांची अवस्था इकडे आड तिकडे विहीर अशी झाली आहे. महापालिका अधिकाऱ्यांचे या गंभीर विषयाकडे लक्ष नसल्याने नागरिकांमध्ये नाराजी व्यक्त केली जात आहे.
डोंबिवली पश्चिमेतील विष्णुनगर भागाकडील स्कायवॉकवरील लाद्या गेल्या दोन वर्षांपासून निघाल्या आहेत. एकदाही अधिकाऱ्यांनी या लाद्या बसवण्याची तसदी घेतलेली नाही. या संबंधीचे प्रस्ताव तयार करण्यात आले आहेत. निधीची पुरेशी तरतूद नाही, अशी उडवाउडवीची उत्तरे अधिकाऱ्यांकडून देण्यात येत आहेत. अलीकडेच या स्कायवॉकच्या नूतनीकरणाचा प्रस्ताव मंजूर करण्यात आला आहे. कल्याण रेल्वे स्थानकातील स्कायवॉकवरून जाणाऱ्या पादचाऱ्यांना या खड्डय़ांमुळे वळसा घेऊन प्रवास करावा लागत आहे. या खड्डय़ातील पाणी स्कायवॉकच्या तळाच्या फर्निचरला लागून ते खराब होत आहे. त्यामधून मग अपघात होत असल्याचे प्रकार घडतात. गेल्या चार महिन्यांत दोन ते तीन वेळा असे प्रकार घडले आहेत. ३० ते ४० कोटी रुपये खर्च करून उभारण्यात आलेल्या या स्कायवॉकची देखभाल महापालिकेकडून योग्यरीतीने करण्यात येत नसल्याने नागरिकांमध्ये नाराजीचा सूर आहे. लाद्या निघून काही महिने झाले आहेत तरी पालिका अधिकारी या गंभीर विषयाकडे लक्ष देत नाहीत. निघालेल्या लाद्या आजूबाजूच्या झोपडीतील नागरिक, टपरी चालक, हातगाडय़ा चालक उभे राहण्यासाठी, साहित्य ठेवण्यासाठी घेऊन जात असल्याचे चित्र आहे. पालिकेने तातडीने स्कायवॉकवरील लाद्या बसवण्याचे काम हाती घ्यावे, अशी पादचाऱ्यांची मागणी आहे.

काम सुरू केले आहे
स्कायवॉकवरील डागडुजी, लाद्या बसवण्याची कामे हाती घेण्यात आली आहेत. स्कायवॉकवरील तुटलेल्या लाद्या बसवण्याचे काम लवकरच पूर्ण झालेले दिसेल.
-पी. के. उगले -शहर अभियंता