प्रभाग कार्यालय सुरू करण्याच्या पालिकेच्या हालचाली

कल्याण शिळफाटा रस्त्यावरील रिजन्सी गृहसंकुलाजवळील ज्ञानेश्वर सोसायटीच्या बांधकाम नकाशामध्ये पालिकेने दवाखाना, बालवाडीचे आरक्षण ठेवले आहे. गृहसंकुलाचे बांधकाम पूर्ण झाल्यानंतर या आरक्षित जमिनी विकासकाने तत्कालीन नियोजन प्राधिकरण मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या स्वाधीन करण्याची अट बांधकाम परवानगी देताना पालिकेने घातली होती. या आरक्षित जमिनीवर आता पालिकेने ‘ई’ प्रभाग क्षेत्र कार्यालय सुरू करण्याच्या हालचाली सुरू केल्या आहेत, अशी तक्रार ज्ञानेश्वर सोसायटीचे विश्वनाथ पटवर्धन यांनी आयुक्तांकडे केली आहे.

परिसरातील लोकसंख्येच्या प्रमाणानुसार नियोजनकारांनी सर्वसमावेशक आरक्षणांच्या सुविधा विकास आराखडय़ात करून ठेवल्या आहेत. त्याप्रमाणे मे. रिजन्सी कापरेरेशन कुलमुखत्यार असलेल्या जमिनीवर गृहसंकुल उभारताना कल्याण डोंबिवली पालिकेने आठ वर्षांपूर्वी गृहसंकुलाचे बांधकाम पूर्ण झाल्यानंतर सुविधा आरक्षणाच्या दवाखाना तसेच बालवाडी सुविधा ठरविल्या आहेत. या सुविधांच्या आरक्षणावर सध्या ज्येष्ठ नागरिक संघ, रिजन्सी परिवार यांची कार्यालये सुरू आहेत, असे पटवर्धन यांनी तक्रारीत म्हटले आहे. या सुविधा आरक्षणाच्या उर्वरित जागेवर पालिकेने कब्जा करून तेथे ‘ई’ प्रभाग कार्यालय सुरू करण्याच्या हालचाली सुरू केल्या आहेत, असे निवेदनात म्हटले आहे. पालिकेच्या या नियमबाह्य़ प्रकाराची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, नगरविकास सचिव मनीषा म्हैसकर यांच्याकडे तक्रार करण्यात येणार आहे, असे सोसायटीतील रहिवासी श्रीराम जोशी यांनी सांगितले.

महापालिकेची आरक्षणे केवळ विकासक, भूमाफिया गिळंकृत करीत नाहीत, तर महापालिकाही बेमालूमपणे ‘एमएमआरडीए’ला अंधारात ठेवून सुविधांची आरक्षणे बळकावत असल्याची परिसरातील रहिवाशांची भावना आहे. आठ वर्षांपूर्वी २७ गावांचे नियोजन प्राधिकरण ‘एमएमआरडीए’कडे होते. ही गावे महापालिकेच्या ताब्यात असल्याने नियंत्रक संस्था म्हणून पालिकेने या सुविधेच्या आरक्षणावर ताबा घेतल्याची चर्चा आहे. बालवाडी, दवाखाना या सुविधेच्या आरक्षणावर पालिकेच्या प्रभाग कार्यालयाऐवजी या दोन्ही सुविधा सुरू कराव्यात अशी मागणी परिसरातील रहिवाशांकडून होत आहे.

पालिकेचे स्पष्टीकरण

रिजन्सीच्या जागेवर विकासकाचे एक तयार बांधकाम आहे. त्या जागेत ‘ई’ प्रभाग कार्यालय सुरू करण्यात येणार आहे. सध्या ही प्रक्रिया थांबली आहे. गावांचा विचार करता ही जागा मध्यवर्ती ठिकाणी आहे, असे एका पालिका अधिकाऱ्याने सांगितले.