पुलाच्या रुंदीकरणाच्या कामामुळे उडणारा गोंधळ टाळण्यासाठी पर्यायी मार्ग; नाल्यावर रस्ता, तात्पुरते रिक्षा-टॅक्सी थांबे उभारण्याच्या सूचना

पूर्व द्रुतगती मार्गावरील ठाणे शहरातील वाहतूक कोंडीचे प्रमुख कारण ठरत असलेल्या कोपरी उड्डाणपुलाचे रुंदीकरण हाती घेण्यात येणार आहे. यामुळे ठाण्यासह मुंबईतील वाहतुकीचाही बोजवारा उडण्याची भीती असल्याने पालिका प्रशासनाने युद्धपातळीवर उपाय आखले आहेत. जकात नाक्याकडे जाणाऱ्या मुंबईकडील नाल्यावर तात्पुरता स्लॅब उभारून पर्यायी रस्ता तयार करणे, काही भागांतील रस्त्यांचे रुंदीकरण करणे, रस्त्यालगतची अतिक्रमणे हटवणे, बसडेपोचे पुनर्नियोजन करणे, रिक्षा-टॅक्सीसाठी तात्पुरते थांबे उभे करणे अशी कामे १५ दिवसांच्या आत पूर्ण करण्याच्या सूचना ठाणे महापालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांनी दिल्या आहेत. यासाठी मुंबई महापालिकेसह अन्य शासकीय यंत्रणांची मदत घेतली जाईल, असेही जयस्वाल यांनी स्पष्ट केले.

मुलुंड टोलनाका ओलांडल्यावर ठाण्याच्या दिशेने येजा करणाऱ्यांना अरुंद कोपरी पुलामुळे मोठय़ा प्रमाणावर वाहतूक कोंडीला सामोरे जावे लागते. याचा परिणाम संपूर्ण ठाणे शहरातील अंतर्गत वाहतुकीवर दिसून येतो. त्यामुळे या पुलाचे रुंदीकरण करण्याचे काम मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (एमएमआरडीए) हाती घेतले आहे. पुढील महिन्यापासून हे काम सुरू होणार आहे. मात्र, या कामामुळे पूर्व द्रुतगती मार्गावरील वाहतुकीचा बोजवारा उडण्याची भीती आहे. या पाश्र्वभूमीवर ठाणे पालिकेचे आयुक्त संजीव जयस्वाल यांनी मुंबई महापालिका तसेच एमएमआरडीएच्या अधिकाऱ्यांसह बुधवारी सायंकाळी या ठिकाणची पाहणी केली. त्यानंतर संभाव्य वाहतूक कोंडी टाळण्यासाठी विविध पर्याय ठरवण्यात आले आहेत.

ठाणे पूर्व लगत असलेल्या मुंबई जकात नाक्याच्या आवारात कंपनी बस, रिक्षा तळ यांच्या करिता तात्पुरते थांबे करण्याच्या सूचना यावेळी करण्यात आल्या. तसेच श्रीमाँ बालनिकेतन शाळेसमोरील सेवा रस्ता वाहतुकीकरिता सलग करण्यासाठी अडथळा ठरणारी बांधकामे हटवण्याचा निर्णयही यावेळी घेण्यात आला. त्यामुळे ठाण्यातील वाहतूक या सेवा रस्त्याने मुंबईच्या दिशेला जाऊ शकेल. कोपरी पोलीस स्टेशन ते एम. जे. पी. ऑफिस या २० मी. रुंदीच्या रस्त्याचे काम तातडीने सुरु करणेबाबत नगर अभियंतांना सूचना देण्यात आल्या. या कामामुळे कोपरी पूर्व कडील संपूर्ण वाहतूक थेट महामार्गावर पोहचू शकेल.

कोंडी टाळण्याचे उपाय

  • पुलाचे काम सुरू होण्यापूर्वी एसीसी कंपनीच्या रस्त्यावर पोहोचण्यासाठी नऊ मीटर रुंदीचा रस्ता तयार करणे.
  • आनंदनगर नाक्याजवळील लालबहादूर शास्त्री रस्त्याचे चार मीटर रुंदीकरण, बस डेपोचे पुनर्नियोजन ही कामे १५ दिवसांत पूर्ण करणे.
  • पूर्व द्रुतगती महामार्ग आणि मुलुंड पूर्वदरम्यानच्या जोड रस्त्यांवरून वाहतूक वळवण्यासाठी मुंबई महापालिकेकडून सुरू असलेलेले रस्त्याचे काम महिनाभरात पूर्ण करणे.
  • ठाणे महानगरपालिका हद्दीतील जकात नाक्यालगत नाल्यावर स्लॅब टाकून जोड रस्ता तयार करणे.