जयेश सामंत/नीलेश पानमंद

ठाणे, मीरा-भाईंदर आणि भिवंडी या तीन महापालिकांच्या हद्दीबाहेर उभारल्या जाणाऱ्या गृहप्रकल्पांना यापुढे पाणीपुरवठा न करण्याचा निर्णय सोमवारी  ‘स्टेम’ प्राधिकरणाने घेतला.

ठाणे आणि भिवंडी महापालिका हद्दींना खेटून मुंबई-नाशिक महामार्गालगतच्या शेकडो एकर जमिनींवर ‘नवीन ठाणे’ अशी जाहिरात करत मुंबई, ठाणेस्थित बडय़ा विकासकांमार्फत मोठय़ा गृहप्रकल्पांची बांधकामे सुरू आहेत. या प्रकल्पांना ‘स्टेम’मार्फत पाणी पुरवठा करण्याचे यापूर्वी संचालक मंडळाच्या बैठकीत ठरवण्यात आले होते. मात्र, सोमवारी झालेल्या प्रशासकीय समितीच्या धोरणात्मक बैठकीत यासंबंधीचे सर्व प्रस्ताव नामंजूर करण्यात आले. त्यामुळे येथे उभ्या राहणाऱ्या हजारो घरांच्या पाणीपुरवठय़ाचा प्रश्न ऐरणीवर येणार आहे.

ठाणे महापालिका मुख्यालयात सोमवारी स्टेम प्राधिकरणाची बैठक झाली. या बैठकीला ‘स्टेम’चे अध्यक्ष ठाण्याचे महापौर नरेश म्हस्के आणि व्यवस्थापकीय संचालक तथा ठाणे महापालिका आयुक्त डॉ. विपीन शर्मा यांच्यासह मिरा भाईंदर महापालिका, भिवंडी महापालिकांचे महापौर, आयुक्त तसेच जिल्हा परिषदेचे अध्यक्ष, मुख्याधिकारी हे स्टेमचे सदस्य या नात्याने उपस्थित होते.

स्टेम प्राधिकरणामार्फत ठाणे, मीरा भरईदर तसेच भिवंडी महापालिका आणि भिवंडी लगतच्या काही गावांना मिळून ३०० दशलक्ष लीटर इतका पाणी पुरवठा केला जातो. ठाणे, मीरा भाईदर आणि भिवंडी या तीन शहरांना ‘स्टेम’ने ठरवलेल्या पाण्याच्या कोटय़ानुसार पूर्ण क्षमतेने पाणी पुरवठा होत नसल्याच्या तक्रारी गेल्या काही वर्षांपासून सातत्याने येत आहेत. असे असताना ‘स्टेम’च्या संचालक मंडळाने २०१६ ते २०१९ या कालावधीत महापालिका हद्दीबाहेर उभ्या रहात असलेल्या खासगी बांधकाम प्रकल्प तसेच टाऊनशीप प्रकल्पांना ७० दशलक्ष लीटर इतका पाणी पुरवठा करण्याचा निर्णय घेतला. व्यवस्थापकीय संचालक म्हणून या काळात ठाणे महापालिकेचे तत्कालिन आयुक्त संजीव जयस्वाल कार्यरत होते.

हा निर्णय घेताना प्रशासकीय समितीची कोणतीही मान्यता घेण्यात आली नव्हती. गेल्या दीड दोन वर्षांत प्रशासकीय समितीची बैठकही घेण्यात आली नव्हती. अखेर सोमवारी ही बैठक घेण्यात आली आणि व्यवस्थापकीय मंडळाने यापूर्वी घेतलेल्या निर्णयाचे तीव्र पडसाद या बैठकीत उमटले. ‘स्टेम’ची स्थापना मुळात ठाणे, मीरा भाईंदर आणि भिवंडी शहरांना पाणीपुरवठा करण्यासाठी झाली असताना हद्दीबाहेर उभ्या राहाणाऱ्या खासगी टाऊनशीप प्रकल्पांना एवढय़ा मोठय़ा प्रमाणावर पाणीपुरवठा करण्याचा निर्णय कसा घेण्यात आला, असा सवाल उपस्थित करत ठाण्याचे महापौर नरेश म्हस्के यांनी यासंबंधीच्या प्रस्तावांच्या कार्योत्तर मंजुरीला आक्षेप घेतला.

मीरा भाईंदर आणि भिवंडीच्या महापौरांनीही त्यास विरोध केल्यानंतर तब्बल आठ मोठय़ा प्रकल्पांना पाणीपुरवठा करण्याचा यापूर्वीचा निर्णय रद्द करत यापुढे महापालिका हद्दीबाहेरील एकाही टाऊनशीपला ‘स्टेम’मार्फत पाणीपुरवठा केला जाणार नाही, असा निर्णय या बैठकीत घेण्यात आला.

यांचा पाणीपुरवठा रद्द होणार

प्रकल्प………..पाणीपुरवठा

– अंबिका ब्रिकवेल.    ८ दशलक्ष लीटर

– प्रियंका होम रिअ‍ॅल्टर.  ३.१० दशलक्ष लीटर

– दोस्ती अद्रिका डेव्हलपर्स. १२ दशलक्ष लीटर

– झर्बिया वरई डेव्हलपर्स. ३ दशलक्ष लिटर

– मदर डेअरी. ०.७ दशलक्ष लीटर

– लोढा स्प्लॅडोरा. ३ दशलक्ष लीटर

– अजितनाथ हायटेक बिल्डस. ७.५ दशलक्ष लीटर

– अंजूर गावाजवळील टाऊनशीप प्रकल्प. एक लाख लीटर

ठाणे, मीरा भाईंदर आणि भिवंडी ही शहरे तसेच आसपासच्या गावांना पुरेशा प्रमाणात पाणीपुरवठा व्हावा हे स्टेमचे प्राथमिक कर्तव्य आहे. यासाठी ही कंपनी स्थापन करण्यात आली. या तिन्ही शहरांना स्टेम ठरवून दिलेल्या कोटय़ाप्रमाणे पाणी पुरवठा करण्यात असमर्थ ठरत असताना मुंबई-नाशिक महामार्गावर उभ्या रहात असलेल्या टाऊनशीप प्रकल्पांना स्टेमचे पाणी देण्याचा निर्णय कोणत्या आधारे घेण्यात आला ? त्यामुळे एकमताने आम्ही जुने प्रस्ताव रद्द केले आहेत.

– नरेश म्हस्के, महापौर तथा अध्यक्ष स्टेम

‘स्टेम’ प्राधिकरण काय आहे?

ठाणे, भिवंडी आणि मीरा भाईंदर महापालिका तसेच जिल्हा परिषदेच्या काही क्षेत्राला पाणीपुरवठा करण्यासाठी शहाड-टेमघर पाणी पुरवठा प्राधिकरणाची स्थापना करण्यात आली आहे. या प्राधिकरणाला २०१०मध्ये स्वतंत्र्य पाणीपुरवठा कंपनीचा दर्जा देण्याचा निर्णय तत्कालिन राज्य सरकारने घेतला. या कंपनीवर तीन महापालिका आणि जिल्हा परिषदेची मालकी आहे. ज्या प्रमाणात कंपनीत सहयोगी संस्थांचे भाग भांडवल आहे त्याप्रमाणे पाण्याचा कोटा ठरवून देण्यात आला आहे. ‘स्टेम’च्या संचालक मंडळावर प्रशासकीय प्रमुख, तर प्रशासकीय समितीवर महापौरांसह प्रशासकीय प्रमुखांचा समावेश आहे.