भगवान मंडलिक

गृहसंकुलांच्या परिसरात विकासकांनी पथदिवे लावल्याने पालिकेच्या निधीची बचत

कल्याणमधील नव्याने विकसित होत असलेल्या गृहसंकुलांच्या परिसरात विकासकांनी पालिकेची परवानगी घेऊन सुमारे तीन कोटी रुपये खर्च करून ६५० पथदिवे बसविले आहेत. पालिकेच्या विद्युत विभागाने विकासक आणि प्रशासन यांच्यात समन्वय साधून ही कामे करून घेतली आहेत. त्यामुळे आर्थिक स्थिती बेताची असलेल्या कल्याण डोंबिवली महापालिकेच्या निधीची बचत झाली आहे.

कल्याण शहराच्या परिघावरील आंबिवली, वायलेनगर, योगीधाम, मोहन प्राइड, टिटवाळा भागांत ११ विकासकांनी गृहसंकुले उभारली आहेत. तिथे लवकरच रहिवासी राहण्यास येणार आहेत. अनेकदा विकासक गृहसंकुल बांधून जातात आणि पथदिव्यांअभावी रहिवाशांना चाचपडत घर गाठावे लागते. हे टाळण्यासाठी विकासकांनी बांधकाम खर्चातून गृहसंकुलाच्या परिसरातील रस्त्यांवर पथदिवे लावल्यास, पालिका त्या कामाला तात्काळ मंजुरी देईल, असे विद्युत अभियंत्यांनी सांगितले.

विकासकांनी पालिका अभियंत्यांचा प्रस्ताव मान्य केला. पथदिवे लावण्याचे विकासकांनी पालिकेला दिलेले प्रस्ताव विद्युत विभागाने तात्काळ मंजूर केले. विकासकांनी आपापल्या संकुलांच्या समोर अत्याधुनिक पद्धतीचे ६५० पथदिवे लावून दिले. या कामासाठी सुमारे दोन कोटी ९९ लाख रुपये विकासकांनी स्वनिधीतून खर्च केले. या कामासाठी पालिकेला कोणताही खर्च करावा लागला नाही. विकासकांनी एवढय़ा मोठय़ा प्रमाणात पथदिवे लावून देण्याची कामे केल्याची कल्याणमधील ही पहिलीच घटना आहे, असे उपअभियंता प्रशांत भागवत यांनी सांगितले. या पथदिव्यांचे यापुढील देखभाल-दुरुस्तीचे काम पालिकेचा विद्युत विभाग करणार आहे.

विद्युत विभागाचे कार्यकारी अभियंता, उपअभियंता प्रशांत भागवत, कनिष्ठ अभियंता यांच्या पथकाने गेल्या काही महिन्यांत पालिकेच्या नियंत्रणाखाली विकासकांकडून पथदिवे बसवून घेण्याची कामे केली आहेत.

आयुक्त गोविंद बोडके यांनी विद्युत विभागाने विकासकांकडून करून घेतलेल्या या उपक्रमाचे कौतुक केले आहे.

विकासकांनी गृहसंकुले पूर्ण केली की तेथील रस्त्यांवर पालिकेला पथदिवे लावून द्यावे लागतात. या वेळी विकासकांनी बांधलेल्या संकुलांसमोर त्यांच्याकडूनच पथदिवे लावून घेण्यात आणि हे काम पालिकेच्या नियंत्रणाखाली करून घेण्यात विद्युत विभागाला यश आले. विकासकांनी विद्युत विभागाचा प्रस्ताव मान्य केला आणि त्यामुळे पालिकेची कोटय़वधी रुपयांच्या निधीची बचत झाली.

– प्रशांत भागवत, उपअभियंता, विद्युत विभाग

पथदिवे बसविलेले रस्ते

योगीधाम ते वृंदावन सोसायटी, माधव संसार ते गोकुळनगरी- अमृत पार्क, वायलेनगर ते मोहन प्राइड, वृंदावन ते वसंत व्हॅली, त्रिवेणी उद्यान, कोलवली नेबुला सृष्टी ते वृंदावन, टिटवाळा रिजन्सी सर्वम संकुल, निळकंठ सृष्टी, नेपच्यून ते बा वळणरस्ता.