तीन दिवसांत जिल्ह्यात १७,४१४ रुग्ण; ५७ जणांचा मृत्यू

ठाणे : राज्यात अंशत: टाळेबंदी लागू करण्यात आल्यानंतरही ठाणे जिल्ह्यात करोना रुग्णवाढ आणि मृत्यूचे प्रमाण कायम आहे. मंगळवार ते गुरुवार या तीन दिवसांच्या टाळेबंदीच्या कालावधीत जिल्ह्यात १७ हजार ४१४ करोना रुग्ण आढळले असून ५७ जणांचा मृत्यू झाला आहे. करोनाबाधित आणि मृतांमध्ये ठाणे, कल्याण-डोंबिवली आणि नवी मुंबईतील रुग्णांची संख्या सर्वाधिक आहे.

राज्य शासनाने मंगळवारपासून राज्यात अंशत: टाळेबंदीचे आदेश दिले आहेत. त्यानुसार अत्यावश्यक सेवा वगळता शहरातील दुकाने, मॉल्स बंद आहेत. तर, सार्वजनिक वाहतूक सेवेतही प्रवाशांच्या वाहतुकीवर निर्बंध आहेत. मात्र, या टाळेबंदीनंतरही जिल्ह्यातील करोना बाधितांचे प्रमाण घटलेले नाही. जिल्ह्यात तीन दिवसांत १७ हजार ४१४ जण करोनाबाधित आढळून आले आहेत. तर ५७ जणांचा मृत्यू झाला आहे. त्यामध्ये मंगळवारी ५ हजार ९५७, बुधवारी ६ हजार २९० आणि गुरुवारी ५ हजार १६७ रुग्ण आढळून आले. करोना बाधितांमध्ये ठाणे, कल्याण-डोंबिवली आणि नवी मुंबई शहरात सर्वाधिक करोनाबाधित आहेत. जिल्ह्यातील १७ हजार ४१४ करोना रुग्णांपैकी ठाणे, कल्याण-डोंबिवली आणि नवी मुंबई या तीन शहरात १३ हजार १३१ रुग्ण आढळून आले आहेत. तर, उर्वरित रुग्ण हे भिवंडी, मिरा भाईंदर, बदलापूर, उल्हासनगर, अंबरनाथ, ठाणे ग्रामीण या क्षेत्रातील आहेत. त्यामुळे टाळेबंदी लागू करण्यात आल्यानंतरही करोना रुग्णांच्या संसर्गाची साखळी तुटत नसल्याचे चित्र आहे.

मृतांचे प्रमाणही अधिक

गेल्या तीन दिवसांत जिल्ह्यात ५७ मृत्यू झाले. त्यामध्येही ठाणे, नवी मुबई आणि कल्याण-डोंबिवली शहरे आघाडीवर आहे. करोनाबाधितांसोबतच करोनामुळे मृत्युमुखी पडणाऱ्यांचे प्रमाणही वाढल्याने जिल्हा प्रशासनाची चिंता वाढली आहे.