ठाण्यातील तीन हात नाका येथील टिपटॉप प्लाझा सभागृहात विद्यार्थ्यांना करिअर आणि शिक्षणाच्या विविध पर्यायांविषयी मार्गदर्शनासाठी ‘लोकसत्ता’च्या वतीने आयोजित ‘मार्ग यशाचा’ उपक्रमातील उपस्थित पालक व विद्यार्थ्यांच्या प्रतिक्रिया

करिअरच्या नव्या वाटा सापडल्या

ठाण्याचे सहपोलीस आयुक्त आशुतोष डुम्बरे यांच्या वक्तव्यामुळे आम्हाला खरोखरच चांगले मार्गदर्शन लाभले. त्यांनी सांगितल्याप्रमाणे स्पर्धा परीक्षा हे एक उत्तम करिअर आहे. तसेच राजेंद्र बर्वे यांनी मुलांच्या मानसिकतेबद्दल आम्हा पालकांना चांगले मार्गदर्शन केले. आम्हाला आमच्या पाल्यासाठी काही वेगळ्या करिअरच्या वाटा उमगल्या.

स्वप्निल मोघे, (पालक) ठाणे</strong>

 

डोळे उघडले

डॉ. बर्वे यांची सडेतोड उत्तर देण्याची शैली अतिशय आवडली. समाज माध्यामांच्या आहारी गेलेल्या मुलांची काळजी पालकांना नेहमीच सतावत असते. अशा मुलांची समजूत कशी काढायची याचे उत्तम मार्गदर्शन या कार्यक्रमातून आम्हाला मिळाले. विद्यार्थ्यांना त्यांच्या कलाने घेत, त्यांच्या उत्तम भविष्यासाठी पालक म्हणून कशी साथ द्यावी हे या निमित्ताने उमगले. विद्यार्थ्यांपेक्षा पालकांना जास्त काळजी असते. यामुळे  हे सेमिनार पालकांसाठी अधिक आहे असे वाटले. पालकांचे या कार्यक्रमाच्या निमित्ताने डोळे उघडले.

स्वाती गावडे , (पालक), विक्रोळी

 

सोप्या भाषेत मूलमंत्र

‘मार्ग यशाचा’ उपक्रम विद्यार्थी आणि पालकांसाठी अतिशय उपयुक्त आहे. मुलाला रोबोटिक अभियांत्रिकीचे प्रशिक्षण घ्यायचे आहे. हा प्रचंड अभ्यास मुलाला करता येईल का यासाठी आम्ही साशंक होतो. मानसोपचारतज्ज्ञ डॉ. राजेंद्र बर्वे यांनी केलेल्या मार्गदर्शनामुळे करिअर निवडण्याचा संपूर्ण निर्णय हा पाल्यांचा असतो, हे समजले.

मिताली परळीकर, (पालक), ठाणे

 

वाचनाचे महत्त्व पटले

डॉ. राजेंद्र बर्वे यांनी जे मार्गदर्शन केले ते नक्कीच व्यक्तिमत्त्व विकासाच्या दृष्टिकोनातून महत्त्वाचे आहे. सेमिनार चालू असतानादेखील अनेक जण ऑनलाइन असल्याचे दिसून येत होते. त्यामुळे इंटरनेटचा कधी कसा उपयोग करावा यासंदर्भात डॉ. बर्वे यांनी केलेले मार्गदर्शन येथे जमलेल्या सर्वासाठीच महत्त्वाचे आहे यामुळे पुस्तक वाचणे किती गरजेचे आहे याची जाणीव झाली.

अभिलाषा देशमुख, (विद्यार्थी) ठाणे

 

पालकांचाही दृष्टिकोन बदलेल

कोणत्या गोष्टीला किती महत्त्व द्यावयाचे याचे मार्गदर्शन या सेमिनारमध्ये मिळाले. तयारी  कशापद्धतीने झाली पाहिजे याचे मार्गदर्शन मिळाल्यामुळे पुढचे निर्णय घेण्यास सोपे जातील. तसेच नीट अनील देशमुख यांनी दिलेली नीट बद्दलची माहिती अतिशय गरजेची होती. त्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये निर्माण झालेला संभ्रम काही प्रमाणात दूर होण्यास नक्कीच मदत होईल. शिवाय डॉ. राजेंद्र बर्वे यांनी पालक आणि विद्यार्थ्यांसाठी जे काही छोटे प्रयोग घेतले ते उत्तम आहेत.

– प्रतीक मुळ्ये, (विद्यार्थी) , ठाणे