विरारमधील खळबळजनक घटना
संशयाने पछाडलेल्या एका तरुणाने आपल्या प्रेयसीची चाकूने वार करून हत्या केल्याची खळबळजनक घटना विरारमध्ये घडली आहे. तुळींज पोलिसांनी अवघ्या काही तासात आरोपीला अटक केली.
आरोपी देवेंद्र भोसले (२३) हा नालासोपाऱ्यातील तुळींज येथे राहतो. त्याचे विरारच्या बोळींज येथे राहणाऱ्या किंजल शहा (२१) या तरुणीशी गेल्या चार वर्षांंपासून प्रेमसंबंध होते. देवेंद्र हा मुंबईच्या एका पंचतारांकित हॉटेलात काम करतो. परंतु गेल्या काही दिवसांपासून दोघांमध्ये भांडणे सुरू होती. किंजलचे दुसऱ्या मुलासमवेत प्रेमसंबंध असल्याचा देवेंद्रला संशय होता. सोमवारी त्याने एका मुलासोबत किंजलला फिरताना पाहिल्याने त्याचा संताप अनावर झाला होता. सोमवारी संध्याकाळी त्याने किंजलला भेटायला बोलावले होते. त्यांने तिच्या हत्येची आधीच योजना बनवली होती. त्यानुसार त्याने किंजलला बोळींज येथील तिच्या घराच्या मागील झुडपांमधील निर्जनस्थळी नेले आणि चाकूचे वार करून तिची हत्या केली. तिचा मृतदेह झुडपात फेकून दिला. दरम्यान, किंजल बेपत्ता असल्याची तक्रार तिच्या कुटुंबीयांनी अर्नाळा सागरी पोलीस ठाण्यात दिली होती.
मंगळवारी सकाळी घराच्या मागील झुडपात किंजलचा मृतदेह आढळून आला. अर्नाळा सागरी पोलीस आरोपीचा शोध घेत होते. याच वेळी तुळींज पोलिसांना आरोपी देवेंद्र भोसले याने काहीतरी गुन्हा केला आहे आणि तो पळून जाण्याच्या तयारीत असल्याची माहिती मिळाली.
तुळींज पोलीस ठाण्याच्या पथकाने त्वरीत सापळा लावून त्याला अटक केली. याबाबत माहिती देताना तुळींज पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रकाश बिराजदार यांनी सांगितले की, आरोपीने काय गुन्हा केला आहे हे आम्हाला माहीत नव्हते. फक्त माहिती मिळाल्यानंतर आम्ही त्याला ताब्यात घेतले. चौकशीत त्याने किंजलची हत्या केल्याची कबुली दिली आहे. त्याला पुढील तपासासाठी अर्नाळा सागरी पोलिसांच्या ताब्यात देण्यात आल्याचे ते म्हणाले.