जयेश सामंत-भगवान मंडलिक

ठाणे : ठाणे ते डोंबिवली दरम्यानच्या प्रवासाच्या वेळेत एका तासाची बचत करणाऱ्या माणकोली-मोटागाव मार्गावरील सहा पदरी पुलाचा पोहोच रस्ता उभारण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. या पुलाच्या भिवंडी बाजूकडील पोहोच रस्त्याच्या उभारणीत ०.५८ हेक्टर वनजमिनीवरील कांदळवने अडसर ठरत होती. हा पोहोच रस्ता उभारल्याशिवाय पूल उभारणीला अर्थच उरणार नव्हता. या पाश्र्वभूमीवर केंद्र आणि राज्य सरकारने हे कांदळवन क्षेत्र वळते करण्यास मंजुरी दिली आहे. त्यामुळे आता या पुलाच्या उभारणीला वेग मिळणार आहे.

ठाणे आणि डोंबिवलीपर्यंतचा रस्ते प्रवास सद्य:स्थितीत अतिशय दगदगीचा आणि वाहतूक कोंडीचा आहे. मुंबई-नाशीक महामार्गाने डोंबिवलीच्या दिशेने जाण्यासाठी कल्याणचा फेरा मारावा लागतो, तर ठाण्याहून शिळ-कल्याण रस्त्यामार्गे डोंबिवलीत प्रवेश करणेही वाहन कोंडीमुळे त्रासदायक झाले आहे. मुंब्रा बाह्य़वळण रस्त्यामार्गे शिळ चौकापर्यंत पोहोचताना मोठय़ा वाहनकोंडीचा प्रवाशांना सामना करावा लागतो. पुढे शिळ-कल्याण रस्त्यालगत उभ्या राहिलेल्या नव्या वसाहतींमुळेही येथील वाहनांची संख्या दिवसागणिक वाढत आहे. या पाश्र्वभूमीवर काही वर्षांपूर्वी मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (एमएमआरडीए) उल्हास खाडीवर माणकोली येथे सहा पदरी पूल उभारण्याचा निर्णय घेतला होता. या पुलाला मंजुरी मिळाली असली तरी, या पुलाच्या पोहोच रस्त्यासाठी या भागातील ०.५८ हेक्टर वनजमिनीवरील कांदळवने हटवायला लागणार होती.

डोंबिवली बाजूने माणकोली पुलावरून ठाण्याकडे जाण्यासाठी माणकोली, पिंपळास, खाडी किनार ते नाशिक महामार्ग असा दोन ते तीन किमीचा पोहोच रस्ता आहे. मात्र पोहोच रस्त्यासाठी जमिनी देताना शेतकऱ्यांनी केलेला विरोध आणि याच पट्टय़ातील कांदळवनाचा विस्तीर्ण पट्टा यामुळे हे काम गेली अनेक वर्षे रखडले आहे. कांदळवनाचा पट्टा या प्रकल्पासाठी वळता केला जावा असा प्रस्ताव मुंबई महानगर विकास प्राधिकरणाने काही वर्षांपूर्वी राज्य तसेच केंद्र सरकारकडे रवाना केला होता. त्याला केंद्र आणि राज्य सरकारच्या महसूल व वने विभागाने मंजुरी दिली आहे. त्यामुळे हा पोहोच रस्ता आणि खाडीपूल उभारण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

माणकोली उड्डाणपुलाच्या भिवंडी बाजूकडील माणकोली, पिंपळास पट्टय़ात खासगी शेतकऱ्यांच्या जमिनी आहेत. तसेच, या भागात उल्हास खाडी किनारी कांदळवनाचा पट्टा आहे. पुलाचे काम सुरू होताच शेतक ऱ्यांनी सुरुवातीला माणकोली उड्डाणपुलामुळे लाभ होणार असल्याने शासन दराने जमिनी देण्याची तयारी दर्शवली होती. परंतु या प्रकरणात काही राजकीय मंडळींनी उडी घेऊन शेतक ऱ्यांना जमिनीचे दर वाढवून मिळतील असे सांगून माणकोली ते नाशिक महामार्गालगतच्या दोन ते तीन किमी पोहोच रस्त्यासाठी जमिनी देण्यास विरोध करण्यास उद्युक्त केल्याची चर्चा आहे. नवी दिल्ली ते उरण डेडिकेटेड फ्रेट कॉरिडरचा मार्ग डोंबिवलीजवळून जात आहे. या रेल्वे मार्गासाठी जमिनी देणाऱ्या शेतक ऱ्यांना रेल्वेकडून दामदुप्पट मोबदला देण्यात येत आहे. मात्र एक किलोमीटर अंतरावर असलेल्या माणकोली परिसरातील गावातील शेतकऱ्यांना शासन पोहोच रस्त्यासाठी जमिनी देताना मात्र अल्प मोबदला देत असल्याची शेतकऱ्यांची भावना झाली होती. त्यामुळेही शेतकरी जमिनी देण्यास विरोध करीत होते. मात्र या मुद्दय़ावरही शासनाने तडजोड केली असल्याची माहिती सूत्रांनी दिली.