शासन आदेशानुसार दुकाने, बाजारपेठांना परवानगी, सकाळी ९ ते संध्याकाळी ५ वाजेपर्यंत व्यवहार सुरू राहणार
ठाणे/कल्याण : साधारण अडीच महिन्याच्या काळानंतर ठाण्यासह कल्याण-डोंबिवली शहरात टाळेबंदीतील सर्व नियमांचे काटेकोर पालन करून बुधवारपासून दुकाने आणि बाजारपेठा सुरू होत आहेत. ठाणे आणि कल्याण-डोंबिवली महानगरपालिका प्रशासनाने नागरिकांना खरेदीसाठी परवानगी दिली आहे. यातून मॉल, केशकर्तनालय, सौंदर्य सुविधा केंद्रांना वगळण्यात आले आहे. या निर्णयामुळे व्यापाऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण आहे. ३० जूनपर्यंत ही मुभा असेल, असे महापालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी आदेशात म्हटले आहे.
करोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी मागील ६५ दिवसांपासून पालिका हद्दीतील सर्व व्यवहार बंद आहेत. हार्डवेअर, कपडे, इलेक्ट्रिक, झेरॉक्स, शालेय सामग्री विक्रीची दुकाने खुली करावीत म्हणून रहिवाशांकडून, व्यापारी संघटनांकडून वारंवार मागणी करण्यात येत होती. व्यवहार सुरू करण्याचे शासनाने आदेश काढून दोन दिवस उलटले तरी जिल्हा महसूल विभाग, स्थानिक पालिका प्रशासन व्यवहार सुरू करण्याचे आदेश काढत नसल्याने व्यापाऱ्यांमधील अस्वस्थता वाढत चालली होती. आयुक्त डॉ. सूर्यवंशी यांनी मंगळवारी दुपारी कल्याण-डोंबिवली पालिका क्षेत्रातील सर्व व्यवहार काही अटी शर्तीवर सुरू करण्यास मुभा देण्याचा आदेश जाहीर केला. ३ जूनपासून (बुधवार) या निर्णयाची अंमलबजावणी होणार असल्याने महापालिका हद्दीतील बाजारपेठा करोना संसर्गाचे नियम, आदेश पाळून सुरू होणार आहेत. रस्त्याच्या दुतर्फाची दुकाने सम, विषम (पी-१, पी-२) नियमाने सुरू होतील. सम, विषम तारखेची दुकाने सुरू करण्याचा निर्णय प्रभाग अधिकारी आणि स्थानिक पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याने एकत्रित बैठकीत घ्यायचा आहे. दुकाने सकाळी नऊ ते संध्याकाळी पाच वेळेत सुरू राहतील. रात्री नऊ ते पहाटे पाच वेळेत नागरिकांना बाहेर फिरण्यास मज्जाव असेल.
तयार कपडय़ांच्या दुकानात फक्त विक्री व्यवहार केले जातील. नवीन कपडे कसे दिसतात, होतात हे पाहण्याची कपडे बदल खोली बंद असेल.
विक्री कपडे पुन्हा परत करण्यास ग्राहकांना प्रतिबंध असेल. दुकानाबाहेर ग्राहकांची गर्दी होणार नाही. साथसोवळे पाळले जाईल याची खबरदारी मालकांनी घ्यायची आहे. टोकन देणे, घरपोच सेवेला दुकान मालकांनी प्राधान्य देण्याची सूचना प्रशासनाने केली आहे. खरेदीसाठी बाहेर पडताना नागरिकांनी शक्यतो पायी प्रवास करावा. सायकलला प्राधान्य द्यावे. बाजारपेठेत दुचाकी, चारचाकी वाहनांना मज्जाव असेल. सामाजिक अंतर न पाळणारी दुकाने बंदची कारवाई केली जाईल.
प्रतिबंधित क्षेत्रात मर्यादा
प्रतिबंधित क्षेत्रातील दूध, भाजीपाला, किराणा दुकाने, बेकरी, खाद्यपदार्थ आस्थापना सकाळी नऊ ते संध्याकाळी पाच वेळेत सुरू राहतील. या काळात मालकांनी मंचक सेवेपेक्षा घरपोच सेवेला सर्वाधिक प्राधान्य द्यावे. औषध दुकाने, सिलिंडर वितरक, उद्वाहन, दवाखाने, रुग्णालयांना ही अट लागू नाही. या क्षेत्रात रहिवाशांना ये-जा करता येणार नाही.
मैदाने खुली
खेळाची मैदाने, उद्याने, बगीचे, शतपावली पथ सकाळी पाच ते संध्याकाळी सातपर्यंत खुली राहतील. खुल्या जागेत लहान मुलांना प्रवेश असणार नाही. अंतरसोवळे पाळून रहिवाशांनी या सुविधांचा लाभ घ्यावा. बंदिस्त जागेत खेळ, कसरती, व्यायाम करण्यास मज्जाव आहे. रहिवाशांनी घराशेजारील खुल्या मैदानांचा वापर करावा. दूरवरच्या मैदानावर जाण्यास रहिवाशांना प्रतिबंध असेल.
सवलतींआधीच ठाणे पूर्वपदावर
महापालिका क्षेत्रामध्ये दूध, जीवनावश्यक वस्तू आणि भाजीपाल्याव्यतिरिक्त इतर दुकाने खुली करण्यासंबंधीचा निर्णय महापालिका प्रशासनाने अद्याप घेतला नसला तरी मंगळवारी शहरात जीवनावश्यक वस्तूंसह वडापाव, समोसा अशी खाद्यपदार्थाची दुकानेही सुरू असल्याचे दिसून आले. तसेच गेल्या काही दिवसांच्या तुलनेत मंगळवारी शहरातील रस्त्यांवर वाहनांची वर्दळही वाढली होती. त्यामुळे गेल्या अडीच महिन्यांपासून टाळेबंद असलेले ठाणे शहरातील जनजीवन आता पूर्वपदावर येत असल्याचे या निमित्ताने दिसून आले.
करोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी महापालिका प्रशासनाकडून विविध उपाययोजना केल्या जात असून त्याचाच एक भाग म्हणून शहरात गेल्या अडीच महिन्यांपासून टाळेबंदी लागू करण्यात आली आहे. केवळ जीवनावश्यक वस्तू, दूध आणि भाजीपाला अशी दुकाने सुरू आहेत.
अन्य नियम
* टॅक्सी, कॅबमधून चालकासह फक्त दोन प्रवासी, रिक्षातून दोन प्रवासी, मोटारीतून दोन प्रवाशांना प्रवासास मुभा
* दुचाकीवर दोन जणांचा प्रवास बेकायदा असेल.
* पाचपेक्षा अधिक ग्राहकांना दुकानात प्रवेशास मज्जाव.
* मोठे उत्सव, समारंभ, धार्मिक, प्रार्थनास्थळ, कार्यक्रमांवरील बंदी कायम आहे.
* सार्वजनिक ठिकाणी तंबाखू, सिगारेट, पान खाण्यास बंदी
अंबरनाथ, बदलापुरात दुकानांच्या वेळेत बदल
अंबरनाथ: टाळेबंदीच्या ७० दिवसांनंतर मुंबई महानगर प्रदेशातील अंबरनाथ आणि बदलापूर शहरात ३० मेपासून विविध प्रकारची दुकाने सुरू करण्यात आली आहेत. मात्र दुपारनंतर दुकानांमध्ये गर्दी वाढत असल्याचे दिसून आल्याने या दोन्ही शहरांतील दुकाने दुपारी तीनपर्यंत सुरू ठेवली जातील, असा निर्णय प्रशासनाने घेतला आहे.अंबरनाथ आणि कुळगाव बदलापूर या नगरपालिका क्षेत्रांमध्ये ३० मेपासून एक दिवसाआड चक्राकार पद्धतीने दुकाने सुरू करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय जिल्हा आणि स्थानिक प्रशासनाकडून घेण्यात आला. त्यामुळे नागरिकांना काही प्रमाणात दिलासा मिळाला असून पावसाळ्यापूर्वीच्या खरेदीसाठी ग्राहकांची दुकानांत गर्दी होऊ लागली आहे. अंबरनाथ बाजारपेठांमध्ये अशाच प्रकारे गर्दी दिसून येत आहे. दुकानदारांकडून सामाजिक अंतर राखण्याचे प्रयत्न केले जात असले तरी बहुतांश ग्राहक दुपारनंतर खरेदीसाठी बाहेर पडत असल्यामुळे गर्दी होत आहे. त्यामुळे व्यापारी संघटनांनी वेळ कमी करण्याचे आवाहन नगरपालिकेला केले होते.