मीरा-भाईंदर महापालिकेच्या उत्पन्नात घट तर खर्चात वाढ

मयूर ठाकूर, लोकसत्ता

भाईंदर : शहरात मोठय़ा प्रमाणात राबवीत असलेल्या विकास कामाचा फटका मीरा-भाईंदर महानगरपालिकेला चांगलाच बसला असून याकामांनी पालिकेच्या कर्जात कमालीची वाढ झाली आहे. सध्या पालिकेवर ३९७ कोटी रुपयाचे कर्ज वाढले असून वाढत्या कर्जाचा बोजा सामान्य नागरिकांसाठी मोठी चिंतेची बाब ठरत आहे.

मीरा-भाईंदर महानगरपालिकेची स्थापना २००२ रोजी झाली. मुबंई लगतचा परिसर असल्यामुळे गेल्या काही वर्षांतच या भागातील लोकसंख्या झपाटय़ाने वाढली. त्याच बरोबर विकास कामांनासुद्धा प्रशासनाला गती द्यावी लागली. पण वाढत्या विकासकामांमुळे पालिकेवर कर्जाचा डोंगर उभा राहिला आहे. करोनाचे संकट डोक्यावर असल्याने पालिकेच्या उत्पन्नाचे मुख्य स्रोत थंडावले असले परंतु असे असताना इतर सुशोभीकरणाच्या  कामाकरिता  देखील पैशाची उधळपट्टी सुरू असल्याचे आरोप होत आहेत.

२०२०-२१ करिता  पालिकेने १६३४ कोटी ५६ लाख  रुपयाचा अर्थसंकल्प सदर केला होता. यात प्रामुख्याने उत्पन्न वाढवण्याकरिता घनकचरा शुल्कात वाढ करणे, मोकळ्या जागेवर कर आकारणे आणि वस्तू सेवा कर अशा ठळक बाबींकडे लक्ष देण्यात आले आहे. मात्र करोनामुळे पालिकेच्या उत्पन्न घट झाली असताना विविध कामाकरिता घेण्यात येणाऱ्या कर्जाचा बोजा प्रशासनावर वाढत चालला आहे.

गेल्या महिन्यात पालिकेने बीएसयूपी योजनेचे काम पूर्ण करण्याकरिता ४० कोटीचे अधिक कर्ज एमएमआरडीकडून घेतले आहे तर सिमेंट आणि रस्त्याच्या कामाकरिता १०० कोटी रुपयांची कर्ज  घेतले.

तसेच, गत वर्षांतील विविध कामांसाठी घेतलेले  शिल्लक २७७ कोटी कर्ज आणि या वर्षांत  होणारी १२० कोटी कर्जाची  वाढ मिळून ३७७ कोटी रुपयांचे कर्ज वाढले आहेत.

या कर्जामुळे आस्थापनेवरील आणखी ताण वाढला आहे. करोनामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीमुळे पालिकेत अधिक मनुष्य बळाची गरज निर्माण झाली होती. यावेळी अनेक राजकीय नेत्याच्या हस्तक्षेपामुळे गरजेपेक्षा अधिक कंत्राटी कर्मचाऱ्यांची भरती करण्यात आली असून त्यांच्या वेतनाचा अधिक बोजा पालिकेवर पडला असल्याची तक्रार सामाजिक कार्यकर्त्यांकडून करण्यात येत आहे.

खर्चाच्या ठळक बाबी

स्थायी /अस्थायी वेतनातील खर्च-१४२.४७ कोटी, आरोग्य व्यवस्थापन- ४१ कोटी, पाणीपुरवठा जल नि:सारण आणि मल नि :सारण-१३७.११ कोटी, सार्वजनिक बांधकाम -१३१.४० कोटी, वीज देयक व दुरुस्ती – ३७ कोटी, उद्यान विकास-१८.५ कोटी

पालिकेने घेतलेले प्रत्येक कर्जाचे हफ्ते वेळेत भरण्यात येत आहेत. आतापर्यंत कोणतेच हफ्ते चुकलेले नसून अधिक दंड भरावा लागलेला नाही.

– शरद बेलवटे, मुख्य लेखापरीक्षक, मीरा-भाईंदर महानगरपालिका