ठाण्यातील तीन पुलांबाबत साशंकता; अरुंद रस्त्यांमुळे वाहतूक कोंडीची भीती

ठाणे शहरातील नौपाडा, अल्मेडा तसेच मीनाताई ठाकरे चौकात तब्बल २७० कोटी रुपयांचा खर्च करून उभारण्यात येत असलेल्या तीन उड्डाणपुलांमुळे शहरातील वाहतूक कोंडी कमी होईल असा दावा केला जात असला तरी सोमवारी स्थानिक लोकप्रतिनिधींनी महापालिका आणि एमएमआरडीएच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत केलेल्या पाहणी दौऱ्यात मात्र या उड्डाणपुलांखाली असलेल्या चिंचोळ्या रस्त्यांमुळे कोंडीत अधिक भर पडेल, अशी भीती व्यक्त करण्यात आली. जुन्या ठाणे शहरातील रस्त्यांचे जोवर रुंदीकरण होत नाही तोवर नव्याने उभारण्यात येणारे हे उड्डाणपूल वाहतूक कोंडीवर उतारा ठरू शकत नाही, असा मुद्दाही या वेळी मांडण्यात आला. दरम्यान, येत्या मे महिन्याअखेरीस हे तीनही उड्डाणपूल वाहतुकीसाठी खुले केले जातील, असा दावा खासदार राजन विचारे यांनी पाहणी दौऱ्यादरम्यान केला.

ठाणे शहरातील वाहतूक कोंडी कमी व्हावी यासाठी मुंबई महानगर विकास प्रदेश प्राधिकरणामार्फत अल्मेडा चौक, मीनाताई ठाकरे चौक आणि संत नामदेव पथ या परिसरात उड्डाणपूल बांधण्यात येत आहेत. या उड्डाणपुलांचे काम २०१६ मध्येच पूर्ण होणे अपेक्षित होते. मात्र, अगदी सुरुवातीपासून हे काम संथगतीने सुरू असल्याने ते वेळेत झालेले नाही. या उड्डाणपुलांच्या बांधणीसाठी नौपाडा तसेच आसपासच्या परिसरातील जुन्या वृक्षांवर कुऱ्हाड फिरविण्यात आली आहे. तसेच काम करताना आसपासच्या परिसरात धुळीचे प्रदूषण रोखण्यासाठी फारशी पावले ठेकेदारामार्फत उचलली जात नसल्याचा स्थानिक रहिवाशांचा आक्षेप आहे. या पाश्र्वभूमीवर ठाण्याचे खासदार राजन विचारे यांनी सोमवारी एमएमआरडीए आणि महापालिका अधिकाऱ्यांसह उड्डाणपुलांच्या कामाची पाहणी केली. त्या वेळी उड्डाणपूल उभारले गेले तरी शहरातील वाहतूक कोंडी खरेच कमी होईल का , असा सवाल उपस्थित झाल्याने या कामाच्या नियोजनाविषयी प्रश्नचिन्ह उपस्थित होऊ लागले आहे.

ठाण्यातील अत्यंत दाटीवाटीच्या रस्त्यावरुन हे उड्डाणपूल उभारण्यात आले असले तरी मुख्य रस्त्यांचे रुंदीकरण व्यापाऱ्यांच्या विरोधामुळे रखडले आहे. चिंचोळ्या आणि जागोजाही अतिक्रमण असलेल्या रस्त्यावर पुलांची उभारणी करूनही मूळ प्रश्न सुटेल का, असा सवाल सोमवारी पाहणी दौऱ्यादरम्यान काही लोकप्रतिनिधी दबक्या आवाजात उपस्थित करत होते. हे तीनही उड्डाणपूल ज्या ठिकाणी खाली उतरतात तेथील रस्ते लहान असल्याने या ठिकाणी वाहतूक अडकून पडण्याची भीती विचारे यांनी व्यक्त केली. यावर या भागातील अतिक्रमणे तातडीने काढली जातील तसेच रस्ता रुंदीकरणाची प्रक्रिया हाती घेतली जाईल, असे आश्वासन महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी दिले.

बांधणी अंतिम टप्प्यात

अल्मेडा चौकातील उड्डाणपूल फेब्रुवारी अखेरीस वाहतुकीस खुला होईल. संत नामदेव पथावरील उड्डाण पूल एप्रिलमध्ये तर मीनाताई ठाकरे चौकातील उड्डाणपूल मे महिन्यात पूर्ण होईल, अशी माहिती देण्यात आली. मीनाताई चौकातील उड्डाण पुलाचे दोन भागांत वर्गीकरण करण्यात आले आहे. अल्मेडा चौकातील पूल ६६३ मीटर, मीनाताई ठाकरे चौकातील पूल ६८३ मीटर, होलीक्रॉस मार्गावरील पूल ५८९ मीटर आणि संत नामदेव पथावरील पूल ६४७ मीटर लांबीचा आहे.

कोपरी पुलाचे कार्यादेश

‘एमएमआरडीए’कडून कोपरी येथे उड्डाणपूल उभारण्यात येणार आहे. या पुलाच्या कामाचे कार्यादेशही देण्यात आले आहेत.येत्या १५ दिवसात हे काम सुरू करण्यात येईल. त्यामुळे होणारी संभाव्य वाहतूक कोंडी सोडण्यासाठी या तीन उड्डाण पुलांची कामे युद्ध पातळीवर केली जाणार आहेत.

उड्डाणपुलाखालील मुख्य रस्त्यावर होणारी वाहतूक कोंडी सुटावी यासाठी येत्या १५ दिवसांत रस्त्याच्या दोन्ही बाजूंना असणारी अतिक्रमणे तोडण्यात येणार आहेत. तसेच रस्त्यावरील खड्डे बुजविण्याचे कामही सुरू करण्यात येईल. या उड्डाणपलामुळे वाहतूक कोंडी कमी होण्यास मदत होणार आहे.

अनिल पाटील, शहर अभियंता, ठाणे महानगरपालिका