‘झोपु’ योजनेच्या कर्मचाऱ्यांकडून पोलीस बंदोबस्तात कारवाई
स्वत:च्या मालकीच्या इमारतीवर बेकायदा भ्रमणध्वनी मनोरा (मोबाइल टॉवर) उभारणाऱ्या डोंबिवलीतील पाथर्ली भागातील शिवसेना कार्यकर्त्यांला अखेर कल्याण- डोंबिवली महापालिकेच्या अतिक्रमणविरोधी पथकाने अद्दल घडवली असून फ प्रभागातील कर्मचाऱ्यांनी इमारतीवरील भ्रमणध्वनी मनोरा तसेच त्याच ठिकाणी उभारण्यात आलेली चौकी जमीनदोस्त केली. या कारवाईमुळे रहिवाशांनी समाधान व्यक्त केले आहे.
डोंबिवली पूर्व भागातील पाथर्ली येथील सतुला इमारतीच्या गच्चीवर इमारत मालक जितेश पाटील यांनी एका कंपनीच्या सहकार्याने महापालिकेच्या परवानग्या न घेता बेकायदा भ्रमणध्वनी मनोरा उभारणीच्या हालचाली सुरू केल्या होत्या. सतुला इमारत चाळीस र्वष जुनी आहे. भ्रमणध्वनी मनोऱ्याचे वजन पाहता ही इमारत मनोऱ्याचे वजन सहन करू शकणार नाही. त्यामुळे दुर्घटना होण्याची भीती इमारतीमधील रहिवाशांना वाटत होती. असे असताना भाडेकरूंना न जुमानता हा मनोरा उभारण्याचे काम सुरू करण्यात आले होते. या परिसरातील महिलांनी संघटितपणे महापालिकेच्या फ प्रभाग कार्यालयात जाऊन या बेकायदा मनोऱ्याला प्रतिबंध करण्याची मागणी केली होती. फ प्रभागाचे प्रभाग अधिकारी भरत जाधव यांनी अधीक्षक संजय कुमावत यांच्या पथकाने घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. त्यावेळी सतुला इमारतीच्या गच्चीवर मनोरा उभारणीचे काम सुरू होते ते थांबवण्याचे आदेश महापालिकेच्या पथकाने दिले. त्याप्रमाणे काम थांबविण्यात आले. एका मनोऱ्यापासून इमारत मालकाला २५ ते ३० हजार रुपये भाडे मिळते. गेल्या आठवडय़ात डॉ. आंबेडकर जयंती, रामनवमीनिमित्त सलग दोन दिवस महापालिकेला सुट्टी होती.
सुट्टी संपल्यावर कारवाई
शनिवारी सकाळीच महापालिकेचे पथक पोलीस बंदोबस्तात सतुला इमारतीच्या ठिकाणी आले. घटनास्थळी असलेले कंपनीचे कर्मचारी कारवाईच्या भीतीने पळून गेले. कर्मचाऱ्यांनी तातडीने मनोरा जमीनदोस्त करण्याचे काम सुरू केले. यावेळी इमारतीच्या मालकाने शिवसेनेच्या एका वरिष्ठ नेत्याच्या स्वीय साहाय्यकांशी चर्चा केली, तसेच कर्मचाऱ्यांवर दबाव टाकण्याचा प्रयत्न केला; मात्र कर्मचाऱ्यांनी त्यास दाद दिली नाही. सतुला इमारत झोपडपट्टी पुनर्वसन योजनेच्या जागी आहे. त्यामुळे झोपु योजनेचे कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी मनोरा तोडण्यास पुढाकार घेतला. राजकीय दबावाला न जुमानता भ्रमणध्वनी मनोरा कर्मचाऱ्यांनी जमीनदोस्त केला.