27 October 2020

News Flash

बहुउपयोगी सावर..!

ग्रीष्मातील उन्हाचा ताप सहन करीत, निसर्गात आणि सीमेंट काँक्रीटच्या जंगलात गुलमोहर बहरला आहे. बहावा शेंगा देण्याच्या मन:स्थितीत आहे.

| May 26, 2015 01:17 am

ग्रीष्मातील उन्हाचा ताप सहन करीत, निसर्गात आणि सीमेंट काँक्रीटच्या जंगलात गुलमोहर बहरला आहे. बहावा शेंगा देण्याच्या मन:स्थितीत आहे. सोनमोहराच्या झुपक्यांना तपटय़ा, तांबूस, तपकिरी रंगाच्या शेंगा लटकू लागल्या आहेत. परवा संध्याकाळी सहज बाहेर फिरायला बाहेर पडले तेव्हा दोन म्हाताऱ्या डोक्यावरून अलगदपणे उडत गेल्या. तपकिरी रंगाचा उभट गोल ठिपका आणि त्याला पांढरे तंतू. या म्हातारीभोवती आपल्या कितीतरी भावना गुंतलेल्या असतात. आपण त्यांच्याशी गप्पा मारलेल्या असतात. एखाद्या कातरक्षणी दूरवर असलेल्या आपल्या जीवाभावाच्या व्यक्तीपर्यंत आपण त्यामार्फत निरोप देऊ शकतो. भारतीय साहित्य परंपरेत अशा प्रकारचे अनेक दाखले मिळतात.
भावना थोडय़ा बाजूला ठेवून या म्हाताऱ्यांकडे शास्त्रीय दृष्टीने पाहिले की लक्षात येते की बीज प्रसारासाठी ही पंखांची योजना आहे. या पंखांमुळे झाडाची बीज दूरवर जाऊन रुजू शकते. साधारण फेब्रुवारी महिन्यात फुलणाऱ्या सावर वृक्षाच्या बिजांना अशा प्रकारचे पंख असतात. सध्या त्याला शेंगा आल्या असून त्या पिकून फुटण्याच्या बेतात आहेत.
सावर वृक्षाचे शास्त्रीय नाव- बॉम्बॅक्स सेइबा. तो मालवेसी कुळातील आहे. इंग्रजीत याला ‘इंडियन सिल्क कॉटन ट्री’ असे म्हणतात. मूळचा हा भारतीय. दक्षिणपूर्व आशियात म्हणजे व्हिएतनाम, मालाज, इंडोनेशिया, दक्षिण चीन, हाँगकाँग, तैवान, पाकिस्तान या राष्ट्रांमध्ये याची लागवड केली जाते. दक्षिण ऑस्ट्रेलिया आणि थायलंडमध्येही विशिष्ट हेतूने सावर वृक्षाची जोपासना केली जाते. शुष्क प्रदेशात आढळणाऱ्या या वृक्षाचे खोड अतिशय भक्कम असते. या खोडावर तीक्ष्ण, शंकूसारखे काटे असतात. त्यामुळे याला ‘काटे सावर’ असेही म्हटले जाते. या काटय़ांमुळेच या वृक्षाचे चरणाऱ्या प्राण्यांपासून रक्षण होते. याच्या फांद्यांचा विस्तार मोठा असतो. पाने मोठी आणि संयुक्त प्रकारची असतात. जानेवारी महिन्यात याची पाने गळून त्यावर किरमिजी लाल रंगांची बोंडे येतात. लाल रंगांची ही बोंडे म्हणजेच या वृक्षाच्या कळ्या. काही दिवसांतच ही बोंडे अतिशय मनमोहक अशा फुलांमध्ये परावर्तीत होतात. या फुलांमध्ये पाच मांसल लाल रंगाच्या पाकळ्या असतात. पाकळ्यांच्या आतील बाजूस आकर्षक स्त्री केशर, पुं केसर असतात. पूर्ण फुललेली फुले जणू काही लालभडक ताऱ्यांप्रमाणे दिसतात. पूर्णहीन झाडावर ही लालभडक ताऱ्यांसारखी दिसणारी फुले अनेक पक्षी आणि कीटकांना आकर्षित करतात. या फुलांच्या वेडय़ाने मैना, कावळे, बुलबुल, चिमण्या, पोपट, कोतवाल, फुल टोच्या सावरच्या झाडावर गर्दी करतात. त्यामुळे झपाटय़ाने परागीभवन होऊन झाडाला फळे येऊ लागतात. फांद्यांना लागलेल्या आखूड आणि बोथट शेंगा ही या झाडाची फळे.
सावरीच्या झाडाचे अनेक उपयोग आहेत. या झाडापासून मिळणारे लाकूड हलके, नरम, कठीण व चिवट असते. ते पाण्यात लवकर कुजत नाही. त्यापासून प्लायवूड, फळांच्या पेटय़ा, छताच्या फळ्या, आगपेटीतील काडय़ा तसेच बोटी बनविल्या जातात. फळापासून मिळणारा कापूस हलका, लवचिक आणि जल प्रतिबंधक असतो. या कापसाला एक वेगळा वास येतो. तसेच या कापसाच्या तंतूवर मेणाचे आवरण असल्याने त्याला कीड लागत नाही. त्याचा उपयोग गाद्या, उशा, ध्वनिनिरोधक आदींसाठी या कापसाचा उपयोग करतात. शस्त्रक्रियेनंतर वापरण्यात येणाऱ्या मलमपट्टय़ांमध्ये सावरीचा कापूस वापरतात. या कापसाचे तंतू आखूड असल्यामुळे दोरा व वस्त्रोद्योगामध्ये फारसा वापर करत नाहीत. तरीही वस्त्रोद्योगासाठी हा कापूस अतिशय उपयोगी ठरतो. महत्त्वाचे म्हणजे भारतातून हा कापूस जमैका, फिजी बेटे, युगोस्लाविया आदी देशांमघ्ये निर्यात होतो.
सावरीच्या झाडापासून ‘मोचरस’ नावाचा नैसर्गिक डिंक मिळतो. तो तपकिरी पिंगट असून पाणी शोषल्यावर तो फुगतो. राख आणि एरंडेल तेलास हा डिंक मिसळून तयार होणाऱ्या मिश्रणाचा उपयोग लोखंडी वस्तूमधील भेगा बुझवू शकतो. तसेच या डिंकाचा उपयोग आमांश, एन्फ्लूएन्झा, मासिक अतिस्राव तसेच क्षयरोगांवरील औषधांमध्ये करतात.
त्वचारोगांमध्ये फुले किंवा पानांचा लगदा अतिशय गुणकारी आहे. मूत्रपिंड व मूत्राशय यांच्या जुन्या विकारात सावरीची कोवळी फळे औषधात वापरतात. बियांपासून पिवळसर रंगाचे तेल निघते. त्या तेलाचा उपयोग खाण्यासाठी, साबणामध्ये तसेच दिव्यांसाठी केला जातो. तेल काढल्यानंतर मिळणाऱ्या पेंडीत प्रथिने जास्त असल्यामुळे पशुखाद्य म्हणून ते वापरले जाते. हे झाड नक्षत्र वनाचा एक भाग आहे. ज्येष्ठा नक्षत्रात जन्मास आलेल्या व्यक्तींना सावर वृक्षाच्या सान्निध्यात खूप फायदा होतो. हे नक्षत्र वृश्चिक राशीत असते. अशा प्रकारे सावरीचा वृक्ष मानवाच्या अनेक दृष्टीने उपयोगी ठरतो.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 26, 2015 1:17 am

Web Title: multipurpose trees in cities
टॅग Thane News
Next Stories
1 कोकणात मानवी वसाहतीचे प्राचीन वास्तुशिल्प
2 मुंब्रा बायपासवर गॅस टँकरला अपघात
3 फसवणाऱ्या तरुणाला तरुणीकडून धडा
Just Now!
X