18 January 2019

News Flash

वर्सोवा खाडीवर नवा पूल

ठाण्याहून मुंबई-अहमदाबाद तसेच मीरा-भाईंदरमार्गे मुंबईच्या दिशेने नियमित ये-जा करणाऱ्यांचा प्रवास सुसाट होणार आहे.

घोडबंदर मार्गावरील प्रवास सुसाट

मुंबई-अहमदाबाद महामार्गावर वर्सोवा खाडी पुलामुळे होणाऱ्या वाहतूक कोंडीवर उतारा म्हणून या ठिकाणी नव्या उड्डाणपुलाची उभारणी केली जाणार आहे. या उड्डाणपुलामुळे वर्सोवा नाक्यावर वाहतूक नियंत्रणासाठी सिग्नलची आवश्यकता राहणार नसून येथील वाहतूक विनाअडथळा सुरू राहणार आहे. परिणामी ठाण्याहून मुंबई-अहमदाबाद तसेच मीरा-भाईंदरमार्गे मुंबईच्या दिशेने नियमित ये-जा करणाऱ्यांचा प्रवास सुसाट होणार आहे.

सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार खाडीवर नव्याने बांधण्यात येणारा पूल थेट वर्सोवा नाका ओलांडून उतरवण्यात येणार आहे. त्यामुळे मुंबईहून वसईच्या दिशेने जाणारी तसेच वसईतून मुंबई दिशेने जाणारी वाहने थेट पुलावरून जाण्याचा मार्ग मोकळा होणार आहे. महामार्गावरून ठाण्याच्या दिशेने जाणाऱ्या वाहनांची कोंडी होणार नाही, अशाप्रकारे आराखडा तयार करण्यात आला आहे.

मुंबई-अहमदाबाद महामार्ग अतिशय वर्दळीचा मार्ग असून गेल्या काही वर्षांत ठाणे, नवी मुंबई तसेच आसपासच्या शहरांमधून मुंबई तसेच वसई-विरार, गुजरातच्या दिशेने जाणारी हजारो वाहने या मार्गाचा वापर करू लागली आहेत. सद्य:स्थितीत वर्सोवा नाक्याजवळचा एक रस्ता सरळ वसईच्या दिशेने आणि एक रस्ता ठाण्याकडे जातो. या मार्गावर गुजरातच्या दिशेने मोठय़ा प्रमाणावर अवजड वाहनांची वाहतूक होते. यापैकी बरीच अवजड वाहने ही ठाण्यातील घोडबंदरमार्गे पुढे मुंबई-अहमदाबाद मार्गाच्या दिशेने ये-जा करतात. ठाण्याच्या दिशेने वर्सोवा नाक्यावर जे वळण आहे त्या ठिकाणी वाहनांची मोठी कोंडी होते. शनिवार, रविवार तसेच सलग येणाऱ्या सुट्टय़ांच्या दिवशी वसई-विरार तसेच आसपासच्या परिसरात असलेल्या समुद्रकिनाऱ्यांवर जाणाऱ्या पर्यटकांची संख्या मोठी असते. त्यामुळे मोठय़ा संख्येने खासगी वाहने या मार्गावर येतात. अशा वेळी वर्सोवा नाक्यापासून घोडबंदपर्यंत या वाहनांची कोंडी होते. मध्यंतरी वर्सोवा खाडीवरील एक पूल बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला होता. यावेळी मुंबई, ठाणे तसेच वसईच्या दिशेने वाहनांच्या लांब रांगा लागत होत्या.

कामाचा शुभारंभ आज

  • वर्सोवा खाडीवरील नव्या उड्डाणपुलाच्या कामांचा आरंभ ११ जानेवारी रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते होणार आहे.
  • ज्या वाहनांना मुंबईहून ठाण्याकडे जायचे आहे, ती नव्या पुलाच्या आधीच डावीकडे वळविण्यात येतील. पुलाखालून ठाण्याहून येणारी वाहने मुंबई, वसईच्या दिशेने वळतील. मुंबई आणि वसईच्या दिशेने येणारी वाहने पुलावरून थेट वर्सोवा नाका ओलांडून जातील.
  • घोडबंदर मार्गावरून वर्सोवा नाक्याजवळ उतरणाऱ्या मार्गाचे रुंदीकरण केले जाणार आहे.

First Published on January 11, 2018 2:33 am

Web Title: new bridge on versova creek ghodbunder road