मुरबाडमधील आदिवासी महिलांसाठी रोजगाराचे नवे साधन

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

आदिवासी विभागातील कल्पवृक्ष अशी ओळख असणाऱ्या मोह वृक्षाच्या फुलांपासून चविष्ट लाडू बनविण्याचा उद्योग सध्या मुरबाड तालुक्यातील गावपाडय़ांवर मूळ धरू लागला आहे. मोहफुलांचे आहारमूल्य मनुका आणि दुधाहून अधिक असल्याने या भागातील कुपोषण मुक्तीसाठी ते उपयोगी पडतीलच, शिवाय त्यातून स्थानिकांना रोजगार मिळेल, असा विश्वास वन निकेतन संस्थेच्या कार्यकर्त्यांनी व्यक्त केला आहे.

मुरबाड तालुक्यातील जंगलात मोठय़ा प्रमाणात मोहाची झाडे आहेत. या झाडापासून मिळणाऱ्या फळांची भाजी करतात. बियांपासून तेल काढतात. यापूर्वी मोहफुलांपासून मोठय़ा प्रमाणात दारू गाळली जात होती. मात्र आता गावठी दारूवर बंदी आणल्यानंतर परिसरातील जंगलात मिळणाऱ्या मुबलक फुलांचे  काय करायचे असा प्रश्न निर्माण झाला होता. लाडूमुळे तो प्रश्न सुटला आहे. वन निकेतन संस्थेतर्फे स्थानिक आदिवासींचा एक गट काही महिन्यांपूर्वी गडचिरोली जिल्ह्य़ात अभ्यास दौऱ्यासाठी गेला होता. तिथे त्यांनी मोहफुलांपासून बनविले जाणारे विविध पदार्थ पाहिले. विशेष म्हणजे मोहफुलांपासून बनविल्या जाणाऱ्या पदार्थाचे आहारमूल्यही तपासण्यात आले आहे. त्यातून दूध आणि मनुक्यापेक्षा मोहफुलांमध्ये प्रथिने, खनिजे, तंतुमय पदार्थ, ऊर्जा, कॅल्शियम तसेच क जीवनसत्त्वाचे प्रमाण अधिक असल्याचे दिसून आले आहे. त्यामुळे आदिवासी विभागात आढळणाऱ्या कुपोषण मुक्तीसाठी मोहाची फुले वरदान ठरू शकतात, असा विश्वास कार्यकर्त्यांना वाटू लागला आहे. मुरबाड तालुक्यात मोठय़ा प्रमाणात मोहाची झाडे आहेत. संयुक्त वनव्यवस्थापन समित्यांमुळे या परिसरातील जंगल संपदा वाढू लागली आहे. साधारण मार्च ते मे दरम्यान मोहफुलांचा बहर असतो. जंगलात फुलांचा अक्षरश: खच पडलेला असतो. ती फुले गोळा करून सुकवली जातात व लाडू बनविले जात आहेत. नाणेघाट प्रवेशद्वाराजवळ वन विभागाने उपलब्ध करून दिलेल्या विक्री केंद्रात हे लाडू विक्रीसाठी ठेवण्यात आले. शहरातील नागरिकांनाही या लाडूची चव आवडत असल्याची माहिती दशरथ वाघ यांनी दिली.

लाडू असे बनतात

सुकविलेली मोहफुले, चवीनुसार तीळ, शेंगदाणे आणि गूळ टाकून लाडू बनविले जातात. आधी सर्व जिन्नस चुलीवर भाजून घेतले जातात. त्यानंतर ते एकत्र कुटून त्यापासून लाडू वळले जातात.

गडचिरोली परिसरातील आदिवासी मोहफुलांची पुरणपोळी, सरबत, जॅम, लाडू आदी जिन्नस बनवितात. मुरबाडमधील आदिवासींना ते माहिती नव्हते. गेल्या महिन्यापासून प्रायोगिक तत्त्वावर हा उद्योग सुरू आहे. या लाडूला पसंतीही मिळू लागली आहे.

अ‍ॅड. इंदवी तुळपुळे, श्रमिक मुक्ती संघटना, मुरबाड

Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: New means of employment for tribal women in murbad
First published on: 22-08-2018 at 00:50 IST