ई-पास, ओळखपत्राशिवाय कल्याण-डोंबिवली शहरात ये-जा करण्यास मनाई; प्रत्येक नाक्यावर चोख बंदोबस्त
कल्याण : कल्याण-डोंबिवली महापालिका क्षेत्रातील करोना रुग्णांनी पाच हजारांचा टप्पा ओलांडल्याने रुग्णांची साखळी तोडण्यासाठी प्रशासनाने गुरुवारपासून ११ दिवसांची टाळेबंदी जाहीर केली आहे. टाळेबंदीच्या काळात पोलिसांकडून कठोर कारवाईला सामोरे जावे लागेल या भीतीने गुरुवारी सकाळपासून टिटवाळा, कल्याण, डोंबिवली पूर्व-पश्चिम, २७ गावे परिसरांतील रस्त्यांवर शुकशुकाट होता.
मागील अनेक दिवस पहाटेपासून व्यापारी, भाजीपाला विक्रेते, खरेदीदारांमुळे रस्ते गर्दीने ओसंडून वाहत आहेत. महापालिका प्रशासन, पोलीस, वाहतूक पोलिसांकडून या बेशिस्त परिस्थितीवर कोणतेही नियंत्रण आणले जात नव्हते. त्यामुळे रहिवासी, व्यापाऱ्यांमधील बेफिकीरी वाढली होती. त्यामुळे कल्याण, डोंबिवलीत करोनाचा सर्वाधिक फैलाव झाला, असे प्रशासनातील वरिष्ठ अधिकाऱ्यांचे मत आहे. करोना रुग्ण वाढीमुळे राज्यात कल्याण-डोंबिवली शहरे अव्वल दिशेने वाटचाल करत असल्याचे दिसू लागल्याने स्थानिक प्रशासनासह जिल्हा, राज्य प्रशासन अस्वस्थ होते. यामधून शहरात टाळेबंदीचा निर्णय घेण्यात आला.
बाजारपेठा, वाहतूक बंद
शहराच्या विविध भागांत भरणारे भाजीपाला बाजार पहाटेच्या वेळेत भरले, पण नऊ वाजण्याच्या आत त्यांनी आपला बाजार गुंडाळला. रस्तोरस्ती फिरणारे हातगाडीचालक गुरुवारी दिसत नव्हते. कल्याण रेल्वे स्थानक, लक्ष्मी बाजार, बाजार समिती, फडके मैदान, खडकपाडा, डोंबिवली रेल्वे स्थानक भागातील बाजार, उमेशनगर बाजारात सकाळपासून शुकशुकाट होता. कल्याण रेल्वे स्थानक भागातील रस्ते आणि डोंबिवलीतील फडके रस्ता परिसर मागील अनेक दिवस गर्दीने भरून गेलेला असायचा. या रस्त्यावर सकाळपासून शुकशुकाट होता. बाजीप्रभू चौकातून सुटणाऱ्या अत्यावश्यक सेवा बससाठी काही कर्मचारी ये-जा करताना फक्त दिसत होते. दुचाकी, चारचाकी खासगी वाहने, ओला-उबर, रिक्षा वाहतूक पूर्ण बंद असल्याने रस्त्यावरील वाहतूक कमी होती. बाहेरील वाहनांना शहरात प्रवेश देण्यात येत नसल्याने चाकरमान्यांना मुंबई, नवी मुंबईत घेऊन जाण्यासाठी येणारी ओला-उबर वाहने येऊ शकली नाहीत. त्यामुळे बहुतांशी चाकरमान्यांना बसने प्रवास करावा लागला. रिक्षा बंद झाल्याने नोकरदारांना घरापासून बस स्थानकापर्यंत पायी प्रवास करावा लागला. मुख्य रस्ते, प्रवेशद्वारावर ई-पास असल्याशिवाय शहरातील वाहने बाहेर आणि बाहेरील वाहने आत येऊ दिली जात नव्हती. त्यामुळे अनेक वाहन चालकांना शहरांच्या वेशीवरून परत जावे लागले.
बाजार समिती बंद
कल्याण कृषी उत्पन्न बाजार समितीने ११ दिवसांच्या टाळेबंदी समिती आवारातील सर्व व्यवहार बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. या ठिकाणी भाजी, फूल, फळ, धान्य असे कोणतेही व्यवहार होणार नसल्याचे बाजार समितीच्या अधिकाऱ्याने सांगितले. बाजार समितीत दररोज विविध भागांतून ७०० ते ८०० ट्रक भाजी, फळ घेऊन येत होत्या. खरेदीसाठी झुंबड उडत होती.
चारही बाजूच्या सीमा बंद
कल्याण, डोंबिवली शहरात येणारे गंधारे, दुर्गाडी, पत्रीपूल, शिळफाटा, तळोजा खोणी रस्ता, नेवाळी, तिसगाव, मुरबाड रस्ता, मोहने-टिटवाळा रस्ता, मानपाडा रस्ता, भोपर असे एकूण बारा ठिकाणचे शहरात येणारे रस्ते बंद करण्यात आलेत. या नाक्यांवर पोलीस, वाहतूक पोलिसांची चोवीस तास गस्त असणार आहे, असे कल्याण परिमंडळाचे पोलीस उपायुक्त विवेक पानसरे यांनी सांगितले. शहरांतर्गत ५०० पोलीस रस्ते, गल्लीबोळात तैनात केलेत. अत्यावश्यक सेवकांना पहाटेपासून ते १० वाजण्याच्या आत आपली कामे उरकून घ्यावीत, असे विक्रेत्यांना सांगितल्याची माहिती पानसरे यांनी दिली. अनावश्यक वाहने रस्ते काढणाऱ्यांवर दंड आणि वाहन जप्तीची कारवाई केली जाणार आहे, असे उपायुक्तांनी सांगितले.
पालिका पथकांकडून कारवाई
सकाळपासून चोरून लपून विविध रस्त्यांवर भाजी, फळविक्री करणाऱ्या विक्रेत्यांना पालिका पथकांनी हटविले. काहींच्या टोपल्या सामानासह जप्त केल्या. १० प्रभागांमधील पथके कारवाईसाठी सकाळपासून रस्त्यावर उतरली होती. प्रत्येक प्रभागात टाळेबंदीची कठोर अंमलबजावणी करण्याचे आदेश आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी प्रभाग अधिकाऱ्यांना दिले आहेत. टाळेबंदीच्या काळात घराबाहेर पडू नका, करोनाची साखळी तोडण्यासाठी सहकार्य करा, अशा उद्घोषणा रिक्षामधून पालिका कर्मचाऱ्यांकडून देण्यात येत होत्या.
टाळेबंदीत बाहेरील वाहने शहरात येणार नाहीत. शहरांतर्गत सोसायटीमधील एकही रहिवासी रस्त्यावर अनावश्यक बाहेर येणार नाही. या दोन गोष्टींना सर्वाधिक प्राधान्य दिले आहे. अत्यावश्यक सेवेतील वाहने, कर्मचारी वगळता अनावश्यक कोणी बाहेर पडू नये यावर पोलिसांचा भर आहे. बेशिस्तीने वागणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई केली जाणार आहे.
– विवेक पानसरे, पोलीस उपायुक्त, कल्याण परिमंडळ
टाळेबंदीची कठोर अंमलबजावणी करण्याचे आदेश प्रभाग अधिकाऱ्यांना दिलेत. फेरीवाले, विक्रेते दिसणार नाहीत. कोठेही गर्दी होणार नाही याची दक्षता या कालावधीत घेतली जाणार आहे.
– डॉ. विजय सूर्यवंशी, आयुक्त, महापालिका