मुंबई, ठाणे आणि कल्याण-डोंबिवली शहरांमध्ये परराज्यातून येणाऱ्या नागरिकांचा लोंढा मोठा असून यामध्ये अनेक अमराठी कुटुंबांचाही समावेश आहे. या शहरांमध्ये स्थायिक झाल्यानंतरही केवळ मराठी बोलता येत नसल्याने त्यांच्यावर ‘उपरे’ असा शिक्का बसतो. हे टाळण्यासाठी अशा परराज्यातून आलेल्या अमराठी भाषकांना मराठीविषयी रुची निर्माण व्हावी, त्यांचे दैनंदिन व्यवहार मराठीतून व्हावे, या उद्देशाने मराठी भाषा संरक्षण व विकास संस्थेच्या वतीने ‘शिका मराठी बोला मराठी’ हा उपक्रम सुरू करण्यात
आला आहे. या उपक्रमांतर्गत पाच दिवसांच्या काळात दैनंदिन जीवनातील वापरायची मराठी शिकवण्यात येणार आहे.
भारताच्या विविध प्रांतातून कल्याण-डोंबिवली शहरामध्ये येऊन स्थायिक झालेल्या नागरिकांची संख्या मोठी आहे. येथे राहून येथील परिस्थिती जुळवून घेत असताना या मंडळींना भाषेची अडचण येत असून मराठी शिकण्याचा या मंडळींचा प्रयत्न राहिला आहे. असे असले तरी इंग्रजीतून मराठी शिकवणाऱ्या खासगी शिकवण्या उपलब्ध नसल्याने या मंडळींना शहरातील मित्र, शेजारी यांच्या मदतीने मराठी शिकण्याचा प्रयत्न करावा लागत होता. कल्याण शहरामध्ये मराठी भाषा संरक्षण व विकास संस्था कार्यरत असून मराठी भाषेच्या संवर्धनासाठी ही संस्था कार्यरत आहे. या संस्थेकडे अशा अमराठी मंडळींकडून मराठी भाषा शिकवण्यासाठी विनंती होत होती. त्यामुळे नव्या वर्षांमध्ये अमराठी भाषिक नागरिकांना मराठी शिकवण्यासाठी शिकवणी सुरू करण्याचा निर्णय संस्थेच्या वतीने घेण्यात आला. संस्थेचे सचिव प्रवीण देशमुख यांनी छत्रपती शिक्षण मंडळ संस्थेशी संपर्क करून त्यांच्यासमोर हा प्रस्ताव मांडला. त्यांनीही या उपक्रमाला पाठिंबा दिला. तर विकासचंद्र जगताप आणि बबनराव निकुंभ या दोन मराठी शिक्षकांनी या अमराठी नागरिकांना मराठी शिकवण्याचा निर्णय घेतला. १० ते १४ जानेवारीदरम्यान सायंकाळी ७.३० ते ९ या वेळात कल्याण पूर्व आणि कल्याण पश्चिमेकडील दोन शाळांमध्ये या शिकवणी चालणार आहेत. कल्याण पश्चिमेकडील कर्णिक रस्त्यावरील नूतन विद्यालय व कल्याण पूर्वेतील काटेमानिवली येथील नूतन ज्ञानमंदिर शाळेमध्ये हे वर्ग चालणार आहेत, अशी माहिती मराठी भाषा व विकास संस्थेच्या वतीने देण्यात आली.
शहरामध्ये दैनंदिन स्वरूपात होणारा लोकव्यवहार या उपक्रमामुळे मराठीतून होण्यास निश्चित मदत होईल. इंग्रजी तसेच हिंदी भाषेतून मराठी शिकवण्याचा हा प्रयत्न अमराठी भाषिकांसाठी नक्कीच उपयुक्त ठरू शकेल.
– प्रवीण देशमुख