विवाहित महिलांची पहिली संक्रांत म्हणजे हलव्याचे दागिने परिधान करण्याची संधी. सारे काही ऑनलाइन खरेदी करणाऱ्या नव्या पिढीतील महिला हे दागिनेही ऑनलाइन मागवू लागल्या आहेत. त्यांच्यासाठी अनेक पर्यायही उपलब्ध करून देऊन कारागिरांनीही ही संधी साधली आहे.

फेसबुक, इस्टाग्रामसारख्या समाजमाध्यमांमुळे हलव्याचे दागिन्यांना मोठी बाजारपेठ उपलब्ध झाली असल्याची माहिती ‘श्रद्धाज आर्ट्स’च्या श्रद्धा खाती यांनी दिली. समाजमाध्यमांमुळे परदेशातूनही या दागिन्यांना मोठय़ा प्रमाणात मागणी येते, असेही त्यांनी सांगितले. काळी चंद्रकला नेसून त्यावर पांढऱ्याशुभ्र हलव्याच्या दागिन्यांचा साज ल्यालेल्या नववधूची संक्रांत या दागिन्यांमुळे अधिकच गोड होते. ही हौस लहान मुलांच्या बाबतीतही पुरवली जाते. तिळवण किंवा बोरनहाण करताना लहान बाळांना हलव्याचे दागिने घातले जातात. डोक्यावर लहानसा मुकुट, गळ्यात गुलाब आणि हलव्याची माळ, हलव्याच्या मनगटय़ा आणि छोटय़ाशा बोटांमध्ये हलव्याने सजवलेली बासरी, असा गोंडस थाट असतो. यंदा हस्तकलाकारांनी विविध प्रकारची मंगळसूत्रे, हार, कांकण,  लॅपटॉप, टाय, फेटा, मोबाइल, हार, नारळ, हत्ती, गुच्छ, अंगठी, लहान मुलांसाठी मुकुट, बासरी, अंगठी, हार, मोरपीस तसेच कृष्णसाज असे दागिने तयार केले आहेत. या वस्तू ३५० ते दोन हजार रुपयांदरम्यान उपलब्ध आहेत.

पारंपरिक दागिन्यांना अधिक मागणी

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

सण साजरे करण्याच्या पद्धतींमध्ये बदल होत गेले असले तरी त्यामधील पारंपरिकता टिकवून ठेवण्याचा प्रयत्न नवी पिढी करताना दिसते. आजकाल हलव्याचे दागिने घरी तयार करण्याची पद्धत इतिहासजमा झाली आहे. पण बॅट, मोबाइल फोन यांसारख्या वस्तू बाजारात उपलब्ध असतानाही पारंपरिक वस्तू आणि दागिन्यांच्या मागणीत किंचितही फरक पडलेला नसल्याचे विक्रेते सांगतात.