भाग्यश्री प्रधान

डोंबिवलीत भव्य तिरुपती महोत्सवाचे आयोजन; अडीच लाख लाडूंचा प्रसाद; जागोजागी फलकबाजी

अयोध्येतील राम मंदिराच्या उभारणीचा मुद्दा उपस्थित करून उत्तर भारताकडे कूच करणाऱ्या शिवसेनेने डोंबिवलीतील तिरुपती श्रीनिवास मंगल महोत्सवाच्या निमित्ताने दक्षिण भारतीयांनाही साद घातली आहे. ठाणे पट्टय़ातील दक्षिण भारतीय मतदारांना आकर्षित करण्यासाठी पक्षाच्या वतीने १ डिसेंबरपासून हा महोत्सव भरवण्यात येत असून पक्षप्रमुख उद्धव ठाकरे तेथे हजेरी लावणार आहेत.

या महोत्सवासाठी शिवसेनेने अडीच लाख लाडूंचा प्रसाद, तिरुपती येथील पुजाऱ्यांना निमंत्रण, आकर्षक रोषणाई अशी जय्यत तयारी केली आहे. या महोत्सवाचा सर्वदूर प्रचार करण्यासाठी कल्याण, डोंबिवली, शीळ या भागांतील सर्व प्रमुख रस्त्यांवर जोरदार फलकबाजीही करण्यात येत आहे.

पक्षाच्या स्थापनेनंतरच्या काळात दक्षिण भारतीयांविरोधात घेतलेल्या उग्र भूमिकेमुळे शिवसेनेला दक्षिण भारतीय समाजातून फारसा प्रतिसाद मिळत नाही. याच पाश्र्वभूमीवर पालकमंत्री एकनाथ शिंदे, खासदार डॉ. श्रीकांत शिंदे आणि आमदार सुभाष भोईर यांनी डोंबिवलीतील सावळाराम महाराज क्रीडासंकुलात श्रीनिवास मंगल महोत्सवाचे आयोजन केले आहे. तिरुपती येथील तिरुमाला तिरुपती मंदिरात आयोजित करण्यात येणाऱ्या उत्सवासारखेच या उत्सवाचे स्वरूप असेल, असे सांगण्यात येत आहे. काही मठाधिपतींचा सत्कारही घडवून आणण्यात येणार आहे.

कल्याण लोकसभा मतदारसंघात पालकमंत्री एकनाथ शिंदे यांचे पुत्र डॉ. श्रीकांत हे खासदार असून आगामी लोकसभा निवडणुकीत युती झाली नाही तर भाजपचे कडवे आव्हान शिवसेनेला येथून पेलावे लागणार आहे. गेल्या काही महिन्यांमध्ये या भागात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निकटवर्तीय राज्यमंत्री रवींद्र चव्हाण यांनी आक्रमक राजकारण सुरू केले असून तेदेखील शिवसेनेच्या जिव्हारी लागले आहे. कल्याण ग्रामीणमध्ये सेनेचा आमदार असला तरी विधानसभेसाठी भाजपने जोरदार मोर्चेबांधणी सुरू केली आहे. महोत्सवाचे आयोजन करत शिंदे यांनी अमराठी मतदारांना आकर्षित करण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. रात्री उशिरापर्यंत शिंदे पिता-पुत्र या महोत्सवाच्या आयोजनासाठी घेत असलेल्या बैठका राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय ठरल्या आहेत.

उडपीहून ४०० आचारी

तिरुपती देवस्थानाच्या दर्शनात त्याठिकाणी प्रसाद म्हणून दिल्या जाणाऱ्या लाडवांना विशेष महत्त्व असते. त्यामुळे डोंबिवलीतील महोत्सवात तब्बल दीड लाख प्रसादाचे लाडू तयार केले जाणार असून महाप्रसादासाठी खास उडपीहून ४०० आचाऱ्यांना आमंत्रित करण्यात आले आहे. महोत्सवाच्या दिवशी पहाटेपासून विविध धार्मिक कार्यक्रम करण्यात येणार आहेत. सुमारे दोन लाख भाविक या सोहळ्याला उपस्थित राहतील, असे नियोजन करण्यात आले आहे.

या कार्यक्रमाचे नियोजन स्वत: पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केले असून हा कार्यक्रम पूर्णत: धार्मिक स्वरूपाचा आहे. मतबांधणीवर लक्ष ठेवून शिवसेना कोणतेही काम करत नाही. समाजकारण आणि त्यातून उभे राहणारे कार्यक्रम ही पक्षाची ताकद असून तिरुपती देवस्थानाचे दर्शन कल्याण-डोंबिवलीच नव्हे, तर संपूर्ण जिल्ह्यातील भक्तांना मिळावे हा या महोत्सवामागील उद्देश आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

– सुभाष भोईर, आमदार शिवसेना