वेळोवेळी दुरुस्तीसाठी बंद ठेवण्यात येणारा पालघर तालुक्यातील माकूणसार खाडी पूल वाहतुकीसाठी पुन्हा एकदा एक महिना बंद ठेवण्यात येणार आहे. हा पूल दुरुस्ती कामासाठी 27 जुलैपर्यंत वाहतुकीसाठी वाहतुकीस बंद करुन पर्यायी मार्गाने ती वळविण्यासाठी वाहतूक अधिसुचना लागू करण्यात आली असल्याचे जिल्हाधिकारी डॉ. कैलास शिंदे यांनी सांगितले. पूल बंद असल्याने केळवा – दादरापाडा पुल – भरणेपाडा जंक्शन – केळवे रोड – कपासे – सफाळे तर दादरापाडा पुल- केळवा – दांडाखाडी – उसरणी – एडवण – दातिवरे असा पर्यायी मार्गाचा वापर करावा असे आवाहनही करण्यात आले आहे.

पोलीस अधीक्षक पालघर यांनी सादर केलेल्या अहवालानुसार माकुणसार खाडीवरील पूल कमकुवत झालेला असून पुलाच्या गर्डरचे जुन्या गंजलेल्या लोखंडी सळया तुटून पडलेल्या असल्याने या पुलावरुन अवजड माल वाहतुक व प्रवासी वाहतूक बंद करुन पुलाच्या दुरुस्तीचे काम २२ जून ते दि.२१ जुलै असा ०१ महिन्यापर्यंत चालणार आहे. पुलावरुन वाहतूक बंद करुन पर्यायी मार्गाने वाहतूक सोडणे आवश्यक आहे. यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत ठिकठिकाणी फलक लावण्यात येणार आहेत.तसेच पुलाच्या दुरुस्ती दरम्यान पुलाचे दोन्ही बाजूस केळवा पोलीस ठाण्याकडून योग्य तो पोलीस बंदोबस्त तैनात असणार आहे. या पार्श्वभूमीवर वाहतूक अधिसुचना निर्गमित करण्यात आली असल्याचे जिल्हाधिकारी डॉ. शिंदे यांनी सांगितले.

वाहतुकीकरिता पर्यायी मार्ग :-
१) केळवा – दादरापाडा पुल – भरणेपाडा जंक्शन – केळवे रोड – कपासे – सफाळे
२) दादरापाडा पुल- केळवा – दांडाखाडी – उसरणी – एडवण – दातिवरे