‘नो मास्क, नो एन्ट्री” या राज्य सरकारच्या धोरणाचे उल्लंघन करणाऱ्या पालघर जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा भारती कामडी यांनाच थेट जिल्हा प्रशासनाने २०० रुपयांचा दंड ठोठावला आहे. राज्यात करोना रुग्णांची संख्या पुन्हा वाढत असताना जिल्हा प्रशासनाने केलेल्या कारवाईमुळे जिल्ह्यात सतर्कतेचे संकेत दिले आहेत.
पालघर जिल्हाधिकारी यांच्या दालनात एका विषयावर चर्चा करण्यासाठी अध्यक्षा भारती कामडी यांनी सकाळी ११ वाजताच्या सुमारास प्रवेश घेतला. जिल्हाधिकारी यांच्या समोरआसनस्थ होत असताना त्यांच्याकडे मास्क नसल्याचे निदर्शनास आले. त्याबाबत त्यांच्याकडे विचारणा केली असता आपण मास्क घालायला विसरल्याची त्यांनी प्रांजळपणे कबुली दिली.
राज्य शासनाच्या धोरणानुसार सार्वजनिक ठिकाणी मास्क परिधान न करणे गुन्हा असल्याने त्यांच्यावर २०० रुपयाची दंडात्मक कारवाई करून त्यांना एक नवीन मास्क देण्यात आला. पालघर जिल्हाधिकारी कार्यालयात मास्क घालण्याबाबत सक्ती केली जात असून त्याचे अनुकरण जिल्ह्यात इतर ठिकाणी करण्याची अपेक्षा जिल्हाधिकारी डॉ. माणिक गुरसळ यांनी व्यक्त केली आहे.
राज्यामध्ये पुन्हा करोना रुग्णांची संख्या वाढत असून त्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी मास्क घालणे तसेच सामाजिक अंतर पाळणे आवश्यक आहे. रेल्वे प्रवास करताना तसेच इतर सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेतून प्रवास करताना देखील अनेक नागरिक मास्क चालत नसल्याचे दिसून आले आहे. बाजारपेठ तसेच आठवडा बाजारमध्ये देखील नागरिक मास्क घालण्याबद्दल उदासीन असल्याचे दिसून येत असून आगामी काळात बेफिक्री दाखवणाऱ्या नागरिकांच्या विरुद्ध दंडात्मक कारवाई मोहीम हाती घेण्यात येईल असे संकेत पालघर जिल्हाधिकारी यांनी दिले आहेत.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on February 16, 2021 12:11 pm