४० कुटुंबांची अग्निशमन दलाकडून सुटका

भाईंदर : भाईंदर पूर्व भागातील एका जुन्या इमारतीच्या जिन्याचा भाग मंगळवारी रात्री कोसळला. यावेळी इमारतीमध्ये राहणारी ४० कुटुंबे त्यात अडकून पडली होती. मात्र मीरा-भाईंदर महानगरपालिकेच्या अग्निशमन दलाने त्वरेने घटनास्थळी धाव घेऊन इमारतीमध्ये अडकलेल्यांची सुखरूप सुटका केली.

गोडदेव येथील सत्य विजय शॉपिंग सेंटर या इमारतीमधील पहिल्या माळ्यावरची भिंत रात्री साडेनऊच्या सुमारास जिन्यावर कोसळली आणि त्यात जिन्याचा भागदेखील कोसळला. परिणामी, इमारतीबाहेर पडण्याचा मार्ग बंद होऊन त्यात राहणारी ४० कुटुंबे इमारतीमध्येच अडकून पडली. ही इमारत महानगरपालिकेने धोकादायक घेषित केलेली नसली तरी तिची अवस्था सध्या वाईट झालेली आहे. त्यामुळे अडकलेल्या रहिवाशांचा जीव टांगणीला लागला होता. अग्निशमन दलाला ही माहिती मिळताच त्यांनी त्वरेने घटनास्थळी धाव घेतली आणि सर्व रहिवाशांना इमारतीच्या गच्चीत नेले नंतर त्यांना लगतच्या इमारतीच्या गच्चीत स्थलांतर करून त्यांची सुटका केली. या दुर्घटनेत कोणीही जखमी झाले नाही. रहिवाशांना सध्या महानगरपालिकेच्या शाळेत निवारा देण्यात आला असून नंतर त्यांना महापालिकेच्या भाडेतत्त्वावरील सदनिकांमध्ये स्थलांतर करण्यात येणार आहे.  इमारत खूप जुनी असून २०१३ मध्येदेखील इमारतीला दुरुस्तीचे काम करवून घेण्याच्या सूचना महापालिकेकडून देण्यात आल्या होत्या.  अलीकडे महापालिकेने पुन्हा या इमारतीला संरचनात्मक तपासणी करून देण्याची नोटीस बजावली होती. सुरुवातीला पदाधिकाऱ्यांनी दुर्लक्ष केले. मात्र अंतिम नोटीस बजावल्यानंतर इमारतीची महापालिकेने नेमलेल्या अभियंत्यांकडून नुकतीच तपासणी करून घेण्यात आली होती. बुधवारी त्याचा अहवालदेखील मिळणार होता. मात्र त्याआधीच मंगळवारी रात्री इमारतीचा जिन्याचा भाग कोसळला.