केवळ मोठय़ा स्थानकांतच थांबा; अन्य स्थानकांतून चढणाऱ्या-उतरणाऱ्यांचे हाल

मुंबई, ठाणे : अत्यावश्यक सेवांमध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी उपनगरी रेल्वेसेवा सुरू करण्यात आली असली तरी, ही सेवा सोयीपेक्षा अडचणीची अधिक ठरू लागली आहे. उपनगरी रेल्वेगाडय़ा ठरावीक स्थानकांतच थांबत असल्याने उर्वरित स्थानकांतून ये-जा करणाऱ्यांचे हाल होत आहेत. मुंबईतील अनेक रुग्णालये, सरकारी कार्यालये परळ, एल्फिन्स्टन यासारख्या छोटय़ा स्थानकांपासून जवळ आहेत. मात्र लोकलगाडय़ा या स्थानकांतही थांबत नसल्याने अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांसाठी हा रेल्वेप्रवास द्राविडी प्राणायम ठरत आहे.

महामुंबई क्षेत्रातून दररोज कामानिमित्त ये-जा करणाऱ्या अत्यावश्यक सेवांमधील कर्मचाऱ्यांची संख्या मोठी आहे. या कर्मचाऱ्यांच्या ने-आणीसाठी ‘बेस्ट’ तसेच राज्य परिवहन मंडळाच्या बसगाडय़ा अपुऱ्या पडू लागल्याने राज्य सरकारच्या मागणीनंतर रेल्वे मंत्रालयाने उपनगरीय रेल्वेसेवा सुरू केली. त्यानुसार सोमवारपासून मध्य रेल्वेने २०० तर पश्चिम रेल्वेने १६२ लोकलफेऱ्या चालवण्यास सुरुवात केली आहे. मात्र, या लोकलगाडय़ांना ठरावीक स्थानकांतच थांबा देण्यात आला आहे. या लोकल केवळ जलद मार्गावरील स्थानकांतच थांबा घेतात. त्यामुळे उर्वरित स्थानकांच्या पट्टय़ात राहणाऱ्या किंवा त्या स्थानकांच्या परिसरातील कार्यालयांत काम करणाऱ्या प्रवाशांना जवळच्या ‘जलद’ थांब्यावर उतरून पुन्हा बस किंवा रिक्षा-टॅक्सीसाठी धावाधाव करावी लागत आहे. परिणामी लोकल सुरू होऊनही फरफट कायम आहे.

सध्या रेल्वे आपल्या क्षमतेच्या २५ टक्के सेवाच देत आहे. मात्र, या सेवेबाबतही रेल्वे, राज्य सरकार आणि महापालिका प्रशासन यांच्यात समन्वय नसल्याचे दिसून येत आहे. या न-नियोजनाचा फटका रुग्णालयीन कर्मचाऱ्यांना अधिक बसत आहे. मुंबईतील अनेक महत्त्वाची रुग्णालये धिम्या मार्गावरील स्थानकांपासून जवळ आहेत. केईएम, टाटा यासारख्या रुग्णालयांपासून परळ स्थानक जवळ आहे. मात्र, परळ स्थानकात लोकल थांबत नसल्याने येथील कर्मचाऱ्यांना दादर स्थानकात उतरून पुढे पायपीट करावी लागते. हार्बर मार्गावरही शिवडीऐवजी या प्रवाशांना वडाळय़ात उतरून टॅक्सीचा आधार घ्यावा लागतो. पश्चिम रेल्वेवरील शताब्दी रुग्णालय (कांदिवली), बाळासाहेब ठाकरे ट्रॉमा केअर (जोगेश्वरी), मध्य रेल्वेवरील कस्तुरबा (चिंचपोकळी), शताब्दी (चेंबूर-गोवंडी) या रुग्णालयांच्या कर्मचाऱ्यांनाही कामाचे ठिकाण गाठण्यासाठी पूर्वीइतकीच धावपळ करावी लागत आहे.

या स्थानकांत थांबा

’ मध्य रेल्वे : सीएसएमटी, भायखळा, दादर, कु र्ला, घाटकोपर, मुलुंड, ठाणे, दिवा, डोंबिवली, कल्याण, टिटवाळा, आसनगाव, कसारा, अंबरनाथ, बदलापूर, नेरळ, कर्जत

’ हार्बर मार्ग -सीएसएमटी, वडाळा, मानखुर्द, वाशी, जुईनगर, नेरुळ, बेलापूर, पनवेल. ट्रान्सहार्बरची वाहतूक बंदच

’ पश्चिम रेल्वे – चर्चगेट, मुंबई सेन्ट्रल, दादर, वांद्रे, अंधेरी, बोरिवली आणि दहिसरपासून विरापर्यंत सर्व स्थानकांत थांबा.

ठाणेकरांचेही हाल

विशेष लोकलना ठाण्याच्या पुढील मर्यादित स्थानकांतच थांबा देण्यात आला आहे. परिणामी, कळवा, मुंब्रा, कोपर, ठाकुर्ली, उल्हासनगर अशा स्थानकांतून ये-जा करणाऱ्या प्रवाशांना नजीकचे ‘जलद’ स्थानक गाठून प्रवास करावा लागत आहे.  या कर्मचाऱ्यांचा भार कल्याण, टिटवाळा, असनगाव, बदलापूर, अंबरनाथ आणि दिवा या रेल्वे स्थानकांवर वाढत असून या ठिकाणी गर्दी होत आहे. तर, अनेक कर्मचाऱ्यांना अजूनही बसच्या प्रवासावरच अवलंबून राहावे लागत आहे.

सरकारच्या सूचनांनुसारच लोकल चालवल्या जात आहेत. त्यानुसारच थांबे निश्चित केले आहेत. जर एखाद्या स्थानकात अत्यावश्यक कर्मचाऱ्यांना थांबा हवा असेल तर त्यांनी राज्य सरकारच्या प्रतिनिधींशी संपर्क साधून मागणी करावी.

– शिवाजी सुतार, मुख्य जनसंपर्क अधिकारी, मध्य रेल्वे

लोकल गाडय़ा जलद मार्गावरील स्थानकांवर थांबतात. शिवडी, परळ रेल्वे स्थानकाच्या परिसरात केईएम, वाडिया तसेच अन्य महत्त्वाची रुग्णालये असून तेथे जाणाऱ्या कर्मचाऱ्यांना लोकलचा उपयोग होत नाही. 

– प्रवीण निपाणे, कर्मचारी, केईएम रुग्णालय

उपनगरीय लोकल सेवा सुरू झाली असली तरी काही स्थानकांवर गाडी थांबत नसल्याने तेथील शेकडो कर्मचाऱ्यांचे हाल होत आहेत. त्यामुळे राज्य शासन आणि मुंबई महापालिका यांनी योग्य तो निर्णय घेऊन सर्व स्थानकांवर लोकल थांबवण्याचे नियोजन करावे. त्यामुळे मधल्या स्थानकांमधून प्रवास करणाऱ्या कर्मचाऱ्यांची सोय होईल.

– राजेश घनघाव, अध्यक्ष, कल्याण-कसारा-कर्जत रेल्वे प्रवासी संघटना