ठाणे : ठाणे ते पनवेल ट्रान्स हार्बर मार्गावरील वातानुकूलित (एसी) लोकलमुळे गुरुवारी रात्री ठाणे स्थानकात प्रवाशांचा गोंधळ उडाला. साध्या लोकलचे वेळापत्रक बिघडल्याने काही प्रवाशांनी थेट एसी लोकलमध्ये शिरण्याचा प्रयत्न केला. मात्र, रेल्वे सुरक्षा दलाने या प्रवाशांना पुन्हा बाहेर काढले. या प्रकारामुळे फलाटावर प्रवाशांची प्रचंड गर्दी झाली होती.

ठाणे ते पनवेल या ट्रान्स हार्बर मार्गावर मध्य रेल्वे प्रशासनाने काही दिवसांपूर्वीच एसी लोकल सुरू केली आहे. मात्र, या लोकलमुळे ट्रान्स हार्बर मार्गावरील साध्या लोकलचे वेळापत्रक कोलमडले आहे. त्यातच गुरुवारी रात्री सुमारे पावणे आठ वाजता एसी लोकल ठाणे स्थानकात आली. त्यामुळे संतप्त झालेल्या साध्या लोकलच्या प्रवाशांनी एसी लोकलमध्ये शिरण्याचा प्रयत्न केला. मात्र, रेल्वे सुरक्षा दलाच्या जवानांनी प्रवाशांना बाहेर काढले. त्यानंतर रात्री ८.०५ वाजता ही लोकल पनवेलच्या दिशेने रवाना करण्यात आली. मात्र, या गोंधळामुळे रात्री उशिरापर्यंत ट्रान्स हार्बर मार्गावरील लोकल गाडय़ा सुमारे १५ मिनिटे उशिराने धावत होत्या.