घाईगडबडीत पाय मुरगळण्याची शक्यता असल्याने नागरिकांची प्रशासनाविरोधात नाराजी
कल्याण-डोंबिवली रेल्वे स्थानक परिसर हा सर्वाधिक वाहतूक व वर्दळीचा परिसर आहे. या भागात पालिकेने सीमेंटचे भक्कम पोलादासारखे कायमस्वरूपी कणखर रस्ते तयार करणे आवश्यक होते. पण, प्रशासनाने या महत्त्वाच्या भागांमध्ये पेव्हर ब्लॉक बसविल्याने घाईगडबडीत असलेल्या नागरिकांचे पाय मुरगळणार आहेत. या रस्त्यांवरुन ये-जा करणाऱ्या पादचाऱ्यांनी यासंदर्भात तक्रारीही केल्या आहेत.
रेल्वे स्थानकतून रिक्षा, पादचारी, अन्य वाहनांची वर्दळ असते. या सततच्या दणक्यांमुळे रस्ता उखडतो. त्यावर खड्डे पडतात. पेव्हर ब्लॉक हे रस्ता, पदपथावर बसविण्याच्या कामाचे नाहीत, असा निष्कर्ष बांधकामतज्ज्ञांनी काढला आहे. तरीही आयुक्त ई. रवींद्रन यांनी सीमेंट रस्त्यांवर पेव्हर ब्लॉक बसविण्याच्या कामाला मंजुरी दिलीच कशी,याविषयी ते संबंधित दोषी अधिकाऱ्यांवर कारवाई करणार की नाही, असा प्रश्न सामान्य रहिवासी उपस्थित करत आहेत.
पाऊस सुरू झाल्यानंतर पेव्हर ब्लॉक वर चुकून, घाईगडबडीत पाय घसरून तो लचकला तर डॉक्टरची धन करण्याशिवाय पर्याय नाही, अशी भीती पादचाऱ्यांनी व्यक्त केली. त्यामुळे रेल्वे स्थानकात सीमेंटचे पक्के रस्ते तयार करा,अशी मागणी रहिवाशांची आहे.

सुनील जोशीची कार्यप्रणालीही वाद्ग्रस्त?
सुनील जोशी यांच्याकडे आयुक्त रवींद्रन यांनी सीमेंट रस्तेकामांचे काम सोपविल्याने या कामात आता सर्वाधिक ढिसाळपणा सुरू होईल. जोशी यांच्याकडून विधायक कामाच्या अपेक्षाच नाहीत, अशा संतप्त प्रतिक्रिया सामान्यांकडून देण्यात येत आहेत.

जोशी यांचे पालिकेतील यापूर्वीचे कारनामे आणि आता त्यांनी सीमेंट रस्तेकामात पेव्हर ब्लॉक बसविण्याचा घातलेला घाट, या प्रकरणाची नगरविकास विभागाच्या सचिव मनीषा म्हैसकर यांच्याकडे तक्रार करणार असून ही करदात्यांच्या पैशांची उधळपट्टी आहे.
प्रशांत रेडीज, सामाजिक कार्यकर्ते, जागृत भारत सेवाभावी संस्था