|| किशोर कोकणे

ठाण्यातील प्राणीप्रेमी संस्थेचा ‘हेल्प देम हील’ उपक्रम;  प्राणीप्रेमींकडून चांगला प्रतिसाद

ठाणे : एखाद्या आजारी किंवा जखमी व्यक्तीला उपचारा दरम्यान जवळच्या, ओळखीच्या माणसाची भेट मिळाली तर त्याला मानसिक आधार मिळतो. हे मानसिक बळ पुढे आजाराशी लढण्यास कामी येते, असेही म्हटले जाते. ठाण्यातील ‘सिटीझन फॉर अ‍ॅनिमल प्रोटेक्शन’ (कॅप) या संस्थेने असाच प्रयोग आता प्राण्यांच्या बाबतीत हाती घेतला आहे. भटक्या जखमी, आजारी प्राण्यांना माणसांचे प्रेम मिळावे म्हणून ‘हेल्प देम हील’ नावाने एक उपक्रम सुरू केला आहे. प्राण्यांवर प्रेम करणाऱ्या व्यक्तींनी जखमी, आजारी प्राण्यांसोबत वेळ व्यतित करावा, असा हा उपक्रम आहे. या उपक्रमाला प्राणीप्रेमींचा उत्तम प्रतिसाद मिळत असून समाजमाध्यमांवर प्राण्यांसोबत वेळ व्यतित करणसाठी अनेक नागरिक पुढे सरसावत आहेत.

करोना कालावधीत अनेक नागरिकांनी पाळीव प्राण्यांना घराबाहेर सोडून दिल्याची उदाहरणे आहेत. इतर प्राण्यांच्या हल्ल्यात हे पाळीव प्राणी जखमी झाले आहेत. भटके प्राणीही वाहनांच्या धडकेत किंवा आजारपणामुळे रस्त्यावर जखमी झालेले असतात. अशा प्राण्यांना ठाण्यातील सिटीझन फॉर अ‍ॅनिमल प्रोटेक्शन ही प्राणीमित्र संघटना त्यांच्या वाघबीळ येथील निवारा केंद्रात उपचारासाठी दाखल करत असते. सध्या या संस्थेकडे १० श्वान आणि नऊ मांजरी उपचार घेत आहेत. यातील काही प्राणी पंगू झाले आहेत, तर काही प्राणी विविध व्याधींनी ग्रस्त आहेत. निवारा केंद्रातील स्वयंसेवक या प्राण्यांच्या जेवणाची तसेच त्यांच्या स्वच्छेतेसाठी कार्यरत असतात. प्राण्यांची संख्या जास्त असल्याने या स्वयंसेवकांना हवा तितका वेळ देता येत नाही. प्राण्यांना प्रेम मिळावे तसेच त्यांच्या उपचारासाठी अधिक लक्ष देता यावे यासाठी संघटनेने आठवड्याभरापूर्वी हेल्प देम हील नावाने एक उपक्रम सुरू केला आहे. या उपक्रमामध्ये जखमी किंवा आजारी प्राण्यांना नागरिक भेटायला येऊन त्यांच्यासोबत वेळ घालवू शकतात. त्यांच्यासोबत खेळू शकतात. त्यासाठी वेळ ठरवून देण्यात येत आहे. प्राण्यांना माणसांकडून प्रेम मिळाल्यास ते लवकर बरे होतात, असा या उपक्रमाचा उद्देश आहे. या उपक्रमास चांगला प्रतिसाद मिळू लागला आहे. अनेकजण या प्राण्यांच्या भेटीसाठी समाजमाध्यमांवर प्रतिसाद देत आहेत. काही कुटुंब या प्राण्यांना दर रविवारी भेटण्यासाठी येत आहेत, असे येथील स्वयंसेवकांनी सांगितले.

या उपक्रमाच्या माध्यमातून प्राण्यांना माणसांचे प्रेम मिळावे आणि ते आजारपणातून लवकर बरे व्हावे हा उद्देश आहे. यासाठी कोणतेही शुल्क आकारले जात नाही. प्राण्यांना माणसांचे प्रेम मिळाल्यास त्यांनाही आनंद मिळतो. – एडविन जॉन्सन, स्वयंसेवक, कॅप फाऊंडेशन.