प्लैन्स क्युपिड हे लायकेनिडै कुळातील म्हणजेच ब्लु गटातील एक लहानसे फुलपाखरू आहे. हे फुलपाखरू जगभरातील फार मोठय़ा भूभागात सापडते. त्याच्या ९ प्रजाती आफ्रिकेमध्ये तर ५ प्रजाती आशियाई क्षेत्रात आढळतात. आशियाई विभागात भारताव्यतिरिक्त श्रीलंका, ब्रम्हदेश, मलेशिया आदी भागांत ही फुलपाखरे आढळतात. याचे मुख्य कारण म्हणजे या भागात सायकस, पाम या झाडांची असलेली मुबलकता. शिवाय शहरी बागांमध्ये ही सर्व झाडे लावली जातात आणि म्हणून ही फुलपाखरेपण जास्त मिळतात. यांचे या झाडांबरोबर इतकं घट्ट नाते आहे की मॉरिशससारख्या फार दूरच्या ठिकाणी, या झाडांबरोबर या फुलपाखरांचा प्रवेश झाला असावा असे मानले जाते.

त्यापैकी नर फुलपाखरांच्या पंखांची वरची बाजू ही जास्त गडद निळसर (लव्हेंडर) रंगाची असते तर मादी फुलपाखरांच्या पंखाचा रंग तपकिरी असतो. पंखांची खालची बाजू फिक्कट- राखाडी रंगाची असते. पुढच्या पंखांच्या टोकाला पांढऱ्या चतकोर वर्तुळाकार रेघांची नक्षी चार ओळींमध्ये असते. त्यामुळे पंखांच्या टोकाला खवल्यांसारखा आकार दिसतो.

मागील पंखांच्या खालच्या बाजूस धडाच्या जवळ तीन काळे ठिपके तर पंखांच्या अगदी टोकाला नारिंगी रंगाचे दोन ठिपके असतात. या ठिपक्यांमध्ये काळा भरीव भाग असतो. ही सर्व रचना डोळ्यांसारखी दिसते. त्याच्या जवळच पंखांना एक टोकदार शेपटी असते, हे सर्व अर्थातच भक्षकाला चकवण्यासाठी असते.

या फुलपाखरांचे पावसाळी रूप हे जास्त गडद रंगांचे असते. या फुलपाखरांचे सुरवंट चमकदार हिरव्या किंवा लाल रंगांचे असतात. खाद्य झाडांची पाने खाऊन हे सुरवंट वाढतात. त्यांच्या वाढीत महत्त्वाचा सहभाग असतो तो मुंग्यांचा. हे सुरवंट आणि मुंग्या यांचे अनोखे सहचर्य असते. आपल्या शरीरातून बाहेर पडणारा चिकट स्राव खायला घालून हे सुरवंट मुंग्यांचे संरक्षण मिळवतात. मुंग्यासुद्धा फक्त सुरवंटांचेच संरक्षण करतात असे नाही तर हे सुरवंट कोषामध्ये गेले की मुंग्या कोष लपवतात आणि फुलापाखरू बाहेर पडेपर्यंत त्यावर लक्षही ठेवतात.