सात दिवसांत दंड न भरल्यास खटला

शहरातील रस्त्यांवरील वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांना सीसीटीव्हीच्या कॅमेऱ्यांत ‘टिपून’ नियमभंगाचा दंड घरपोच पोहोचवणाऱ्या वाहतूक पोलिसांनी आता बेकायदा पार्किंगबाबतही हीच पद्धत अवलंबण्याचा निर्णय घेतला आहे. ना पार्किंग क्षेत्रात उभ्या करण्यात आलेल्या वाहनांबाबत संबंधित वाहनमालकाला दंडाची पावती घरपोच पाठवण्यात येणार आहे. एवढेच नव्हे तर सात दिवसांच्या आता हा दंड न भरल्यास संबंधितांवर न्यायालयात खटला दाखल करण्यात येईल, असा इशारा ठाणे वाहतूक शाखेचे पोलीस उपायुक्त अमित काळे यांनी दिला आहे.

ठाणे, कल्याण, डोंबिवली, उल्हासनगर, अंबरनाथ, बदलापूर या शहरांतील रस्त्यांवर वाहतूक कोंडी नित्याची समस्या बनली आहे. वाढती वर्दळ आणि अरुंद रस्ते हे याचे एक कारण असले तरी या रस्त्यांच्या कडेला वाहने उभी करण्याची वाहनचालकांची प्रवृत्ती वाहतूक कोंडीत आणखी भर पाडत आहे. ना पार्किंग क्षेत्रात उभी करण्यात आलेली वाहने उचलण्यासाठी ठाण्यात टोइंग क्रेन उपलब्ध आहेत. मात्र, कल्याण किंवा त्यापुढील शहरांत ही व्यवस्था अद्याप उपलब्ध झालेली नाही. त्यामुळे आता अशा वाहनांवर कारवाई करण्यासाठी वाहतूक विभागाने तंत्रज्ञानाचा अवलंब करण्याचा निर्णय घेतला आहे.  मोबाइलद्वारे उपलब्ध असलेल्या तंत्रज्ञानाद्वारे संबधित पोलीस कर्मचारी हा नो पार्किंगमध्ये उभ्या असलेल्या वाहनाचे छायाचित्र काढू शकतो. त्यानंतर ते छायाचित्र ठाणे वाहतूक मुख्यालयात नव्याने स्थापन करण्यात आलेल्या न्यायालयीन शाखेमध्ये पाठविण्यात येतात. या शाखेत एक पोलीस निरीक्षक आणि सहा पोलीस कर्मचारी आहेत. त्यांच्या प्रत्येकाकडे हे छायाचित्र जाते. त्यानंतर ही न्यायालयीन शाखा  प्रादेशिक परिवहन विभागाकडून त्या वाहनचालकाची माहिती मिळविते आणि त्यानुसार स्पीड पोस्टद्वारे संबधित व्यक्तिला त्याच्या दंडाची पावती घरी पाठविण्यात येते, असे अमित काळे यांनी सांगितले.

या तंत्रज्ञानाद्वारेझेब्रा क्रॉसिंगच्या पांढऱ्या पट्टय़ा ओलांडणाऱ्या आणि सिग्नल तोडणाऱ्यांवरही कारवाई करण्यात येणार आहे. त्यामुळे वाहतूक शाखेचा महसूल वाढण्यास मदत होणार आहे. पत्र मिळाल्यानंतर सात दिवसांत दंडाची रक्कम न भरल्यास थेट न्यायालयात वाहनचालकाला खटला लढवावा लागणार आहे.