|| मयूर ठाकूर

भाईंदर-काशिमीरा परिसरात असलेल्या स्मशानभूमीमधील चिमणीचा महिनाभरापासून वापर होत नसल्याने सर्वत्र धुराचे साम्राज्य पसरले आहे. धुरामुळे वातावरण प्रदूषित होत असून परिसरातील नागरिकांना त्याचा त्रास सहन करावा लागत आहे.

काशिमीरा परिसरात अनेक वर्षांपासून स्मशानभूमी असून या स्मशानभूमीकडे मनपा प्रशासन व लोकप्रतिनिधी दुर्लक्ष करत असल्याचे आढळून आले आहे. स्मशानभूमीच्या परिसरात मोठय़ा संख्येने नागरी लोकवस्ती आहे. स्मशानभूमीच्या बाजूलाच साईबाबा मंदिराच्या आवारात लहान मुलांची अंगणवाडी आहे. स्मशानातील चिमणीचा वापर होत नसल्यामुळे निघणारा धूर संपूर्ण परिसरात पसरत आहे. त्यामुळे लहान मुलांना त्रास सहन करावा लागत आहे आणि   धुरामुळे नागरिकांच्या आरोग्याच्या समस्या उद्भवत आहेत.  या ठिकाणी असलेली जुनी चिमणी बंद पडल्यामुळे सहा महिन्यांपूर्वीच नवीन चिमणी बसवण्यात आली होती. अनेक वेळा तक्रार करून देखील आजवर दाखल न घेतली जात असल्यामुळे रहिवाशांमध्ये संतापाचे वातावरण पसरले आहे.

काशीमिरा स्मशानभूमीत कोटय़वधी रुपये खर्च करून इलेक्ट्रिक शेगडी बसवण्यात आली, परंतु ती नेहमीच बंद अवस्थेत असल्याचे आढळून आले आहे. ही शेगडी बंद असल्यामुळे पालिकेचे आर्थिक नुकसान झाले आहे. त्यामुळे स्मशानभूमीतील चिमणीचा वापर करून  तिची देखभाल नियमित करण्यात यावी, अशी मागणी रहिवाशी करीत आहेत.

विभागातील अधिकाऱ्याला चिमणीचा नियमित वापर झाला पाहिजे, असे आदेश देण्यात आल्याची माहिती सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता दीपक खांबीत यांनी दिली.