किन्नरी जाधव

रासायनिक सांडपाणी कमी झाल्याने निवटय़ा, कोळंबी जाळ्यात

कचरा आणि रसायनमिश्रित सांडपाण्यामुळे ठाणे, नवी मुंबईच्या खाडीतील जलचरांचा कोंडमारा होत असल्याची टीका गेल्या कित्येत वर्षांपासून होत असताना यंदा मात्र खाडीच्या पर्यावरणात सकारात्मक बदल झाल्याचे दिसू लागले आहे. वाशी, कौपरखैरणे खाडीत गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा माशांचे प्रमाण आणि वैविध्य वाढल्याचे स्थानिक कोळ्यांकडून सांगण्यात येत आहे.

वाढत्या प्रदूषणामुळे मिळेनासे झालेले निवटय़ा, कोळंबी असे मासेही कोळ्यांच्या जाळ्यात पुन्हा येऊ लागले आहेत. सातत्यपूर्ण जनजागृतीमुळे खाडीत सांडपाणी सोडण्याचे प्रमाण घटले असून, त्यामुळे येथील पर्यावरणात सुधारणा झाल्याचे निरीक्षण पर्यावरण संस्थांकडून नोंदवण्यात येत आहे.

यंदा खाडीतील मासेविक्रीमुळे गेल्या वर्षीपेक्षा दुप्पट व्यवसाय झाल्याचे स्थानिक कोळ्यांचे म्हणणे आहे. वाशी, कोपरखैरणेलगतच्या खाडीत माशांचे वाढते प्रमाण दिलासादायक असले तरी ठाणे खाडीत घरगुती कचरा आणि प्लास्टिकच्या प्रदूषणामुळे अद्यापही मासे सापडत नसल्याची खंत कोळ्यांकडून व्यक्त करण्यात येत आहे. नवी मुंबई परिसरातील खाडीलगतचे कारखाने, बांधकामे यांचे सांडपाणी खाडीत बिनदिक्कत सोडण्यात येत असल्याने पाण्यातील ऑक्सिजनचे प्रमाण कमी होऊन मासे घटल्याचे निरीक्षण पर्यावरण रक्षणासाठी कार्यरत संस्था आणि कोळ्यांनी नोंदवले होते. नवी मुंबई महानगरपालिकेने काही वर्षांपूर्वी केलेल्या सर्वेक्षणात या खाडीलगतचे १८ नाले दूषित असल्याचे स्पष्ट झाले होते. काही वर्षांपूर्वी ठाणे खाडीचा भाग असलेल्या भांडुप उदंचन केंद्र परिसरात तिलापिया प्रजातीच्या माशांचा मृत्यू झाल्याची बाब समोर आली होती. प्रदूषण, पाण्याचे वाढलेले तापमान आणि ऑक्सिजनची कमतरता यामुळे हे मासे दगावल्याचे पर्यावरणप्रेमींकडून सांगण्यात आले होते. खाडीच्या अस्तित्त्वाविषयी सर्वच स्तरांवर चिंता व्यक्त करण्यात येत होती.

खाडीलगतच्या कारखान्यांच्या जागी आता आयटी क्षेत्र वसल्यामुळे खाडीत सोडल्या जाणाऱ्या सांडपाण्याचे प्रमाण घटले आहे. त्यामुळे माशांचे प्रमाण वाढले आहे. खाडीचे प्रदूषण थांबावे, यासाठी काही वर्षांपासून पर्यावरण दक्षता मंडळ आणि वनविभागाच्या माध्यमातून खाडी संवर्धनाविषयी सातत्याने जनजागृती करण्यात येत आहे. खाडी किनारी स्वच्छता मोहिमा राबवण्यात येत आहेत. याचा सकारात्मक परिणाम माशांच्या अस्तित्त्वावर होत आहे.

वाशी, कौपरखैरणे खाडीत वळस, जिताडे, बोई, शिंगाळी हे मासे मिळतात. यंदा या माशांचे प्रमाण जास्त असल्याचे या खाडीत नियमित मासेमारी करणारे प्रवीण कोळी यांनी सांगितले. गेल्या वर्षीपासून कोळंबी, चिंबोऱ्या आणि निवटय़ाही जास्त प्रमाणात मिळत असल्याचे त्यांनी सांगितले. साधारण २२ ते २५ निवटय़ांची एक टोपली ३५० ते ६०० रुपयांना विकली जाते.

निवटय़ांमुळे परदेशी पक्षीही वाढणार

प्रदूषण कमी झाल्यामुळे आणि गाळ साचल्यामुळे निवटय़ा, कोलंबी उपलब्ध होत आहेत. हे पक्ष्यांचे खाद्य असल्यामुळे या खाद्याच्या शोधात परदेशी पक्ष्यांचे आगमनही यंदा जास्त प्रमाणात होईल, अशी शक्यता पक्षी अभ्यासकांनी वर्तवली आहे. ऑक्टोबरच्या पहिल्या आठवडय़ातच खाडी किनारी लिटल स्टिन्ट, सॅण्ड प्लॉवर, ब्लॅक टेल गोडवीट, ब्लॅक हेडेड गल, ब्राऊन हेडेड गल, नॉर्दन शोवेलर, नॉर्थर्न पिनटेल, युरेशिअन करलू, सॅण्डपायपर, टर्न, गोल्डन फ्लॉवर असे विविध पक्षी लडाख, चीन, सायबेरिया आणि युरोपीय देशांतून दाखल होऊ लागले आहेत, असे पक्षी अभ्यासक अविनाश भगत यांनी सांगितले.

खाडीतील विषारी द्रव्यांचे प्रमाण कमी झाले असल्याने धिम्या गतीने ऑक्सिजनचे प्रमाण वाढत आहे. खाडीसंवर्धनात सातत्य राहिल्यास भविष्यात माशांचे प्रमाण वाढत जाईल. ठाणे खाडीतही प्लास्टिक, घरगुती कचरा टाकणे बंद झाल्यास या खाडीतही मासे आढळण्याची शक्यता नाकारता येणार नाही.

– प्रा. डॉ. प्रसाद कर्णिक, खाडी अभ्यासक