आठवडाभराच्या मुसळधार पावसामुळे ठाण्यात खड्डय़ांचे साम्राज्य

ठाणे : जुलैच्या मध्यंतरात आठवडाभर विश्रांती घेऊन परतलेल्या मुसळधार पावसामुळे ठाणे शहरातील रस्ते वाहून गेल्याचे चित्र सध्या दिसत आहे. दोन आठवडय़ांपूर्वी पावसाची उघडीप मिळताच पालिकेने युद्धपातळीवर कामे करून रस्त्यांवर पडलेले खड्डे बुजवले होते. मात्र, गेले आठवडाभर सुरू असलेल्या पावसामुळे रस्ते पुन्हा उखडले गेले आहेत.

महामार्ग, सेवा रस्ते आणि शहरांतर्गत रस्त्यांवर पडलेल्या खड्डय़ांना टाळून वाहने हाकताना चालकांना मोठी कसरत करावी लागत आहे. विशेष म्हणजे, काही महिन्यांपुर्वीच वाहतूकीसाठी खुले करण्यात आलेल्या नौपाडा आणि मिनाताई ठाकरे चौकातील उड्डाणपुलांवरील डांबरचा थरही वाहून गेल्याने या पुलांच्या कामावरही प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

ठाणे महापालिका क्षेत्रामध्ये जुलै महिन्याच्या पहिल्या आठवडय़ात झालेल्या मुसळधार पावसात जागोजागी खड्डे पडले होते. काही ठिकाणी रस्तेही खचले होते. मात्र, पावसाने विश्रांती घेतल्यानंतर पालिकेच्या बांधकाम विभागाने शहरात खड्डे बुजविण्याची मोहिम हाती घेतली होती. ज्या भागात महापालिकेचे रस्ते नाहीत तेथेही खड्डे भरण्याचे आदेश जयस्वाल यांनी दिले होते. या खड्डेभरणीनंतर नागरिकांना काहीसा दिलासा मिळाला होता. मात्र, गेल्या आठवडाभरापासून सुरू असलेल्या पावसामुळे ही सगळी खड्डेभरणी पाण्यात वाहून गेली आहे.

घोडबंदर महामार्ग, मुंबई-नाशिक महामार्ग, नितीन कंपनी सेवा रस्ता, कोपरी, गोखले मार्ग, संत नामदेव पथ ते हरिनिवास, ब्रह्मांड, कोलशेत, ढोकाळी नाका, कावेसर, कापुरबावडी, माजिवाडा, कामगार रुग्णालय, कोरस, इंदिरानगर आणि दिवा या भागांतील रस्त्यांवर मोठय़ा प्रमाणात खड्डे दिसून येत आहेत.  मुंबई-नाशिक महामार्गावरील फ्लॉवर व्हॅलीजवळ मोठे खड्डे पडले असून याठिकाणी दोन दिवसाआड खड्डे बुजविले जात आहेत. मात्र, पावसामुळे भरलेले खड्डे पुन्हा उखडत आहे. या खड्डय़ामध्ये टाकण्यात आलेली बारीक खडी रस्त्याच्या एका बाजुला जमा होऊन रस्ता उंच-सखल झाला आहे. अनेक ठिकाणी हे चित्र दिसून येते. यामुळे दुचाकी घसरुन अपघात होण्याची भिती व्यक्त होत आहे. या संदर्भात ठाणे महापालिकेचे नगर अभियंता रविंद्र खडताळे यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्यांची प्रतिक्रिया मिळू शकली नाही.

पुलांच्या कामावर प्रश्नचिन्ह

ठाणे शहराच्या मध्यवर्ती भागातील वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या (एमएमआरडीए) माध्यमातून ठाणे महापालिकेने तीन उड्डाण पुल उभारले आहेत. त्यापैकी नौपाडय़ातील संत नामदेव चौक तसेच  मीनाताई ठाकरे चौकातील उड्डाणपूल चार महिन्यांपूर्वीच वाहतुकीसाठी खुले करण्यात आले. मात्र, या दोन्ही पुलांवरील रस्त्याचे डांबर वाहून गेल्याने हा रस्ता खडबडीत झाला आहे. तसेच काही ठिकाणी खड्डे पडले आहेत. त्यामुळे या उड्डाण पुलांवर अपघात होण्याची भीती व्यक्त होत आहे. या संदर्भात ठाणे महापालिकेचे उपनगर अभियंता प्रविण पापळकर यांच्याशी संपर्क साधला असता, त्यांनी उड्डाणपुलवरील रस्त्याच्या झालेल्या दुरावस्थेबाबत माहिती घेऊन आवश्यक ती उपाययोजना करण्यात येईल, असे सांगितले.

दोन मिनिटांच्या अंतरासाठी १५ मिनिटे

माजीवडा येथून घोडबंदर दिशेने जाणाऱ्या आणि घोडबंदरहून माजीवडय़ाच्या दिशेने येणाऱ्या मार्गावर दुपारी अवजड वाहनांची वाहतूक होते. त्यात या रस्त्यावर ठिकठिकाणी खड्डे पडले असल्याने वाहतूक मंदावत आहे. त्यामुळे कापूरबावडी ते माजीवडा हे दोन मिनीटांचे अंतर पार करण्यासाठी वाहन चालकांना १५ मिनीटांचा अवधी लागत आहे.