गणेशोत्सवात खड्डे-कोंडीवर नियंत्रण ठेवणाऱ्या पालिकेचे नवरात्रोत्सवाच्या मंडपांकडे दुर्लक्ष

गणेशोत्सवात मंडपांसाठी खड्डे खोदणाऱ्या मंडळांवर कारवाईचा करण्याचा इशारा देणाऱ्या ठाणे महापालिकेने सार्वजनिक नवरात्रोत्सवासाठी खड्डे खोदणाऱ्यांकडे मात्र डोळेझाक सुरू केली आहे. गणेशोत्सवाचे मंडप काढले जात नाहीत, तोच ठाण्यातील टेंभी नाका, कोलबाड, शिवाईनगर भागांत नवरात्रोत्सवासाठी विद्युत रोषणाईचे खांब उभारण्यासाठी जागोजागी खड्डे खोदले जात आहेत. काही ठिकाणी हे प्रमाण गणेशोत्सवापेक्षाही अधिक आहे.

मंडप उभारणीकरिता रस्त्यावर खड्डे खोदले तर प्रत्येक खड्डय़ामागे दोन हजार रुपये दंड ठोठावला जाईल, अशी तंबी महाापलिका प्रशासनाने उत्सव मंडळांना दिली होती. त्यामुळे शहरातील बहुतेक गणेशोत्सव मंडळांनी यंदा खड्डे विरहित मंडप उभारले. लोखंडी खांबांचा वापर करून हे मंडप उभारण्यात आले होते. विद्युत रोषणाईसाठी खड्डे खोदण्याऐवजी दगड-मातीने भरलेल्या स्टीलच्या डब्यांचा वापर करण्यात आला होता. दरवर्षी निम्म्याहून अधिक रस्ता व्यापणाऱ्या गणेशोत्सव मंडळांनी यंदा मात्र पालिकेच्या नियमावलीनुसार मंडप उभारणी केली होती. त्यामुळे शहरातील रस्ते अडविण्याचे प्रमाणही कमी झाल्याचे दिसले.

गणेश विसर्जनाला आठवडा होत नाही तोच नवरात्रोत्सवाची तयारी शहरात जोरात सुरू झाली आहे. ठाण्यातील टेंभी नाका, कोलबाड, खोपट परिसरात नवरात्रोत्सवाचे मंडप बांधण्यास सुरुवात झाली आहे. रस्त्यांवर खड्डे खोदून त्यात विद्युत रोषणाईसाठी खांब उभारले आहेत. सार्वजनिक उत्सवांसदर्भात धोरण ठरविण्याचे निर्देश उच्च न्यायालयाने एका याचिकेच्या सुनवाणीदरम्यान महापालिकांना दिले होते. त्यानुसार पालिका प्रशासनाने नियमावली तयार केली. तरीही टेंभी नाका येथे नियमापेक्षा मोठा मंडप उभारून रस्ता अडवला आहे. नवरात्रोत्सवाच्या पाश्र्वभूमीवर मंडप उभारणीचे नियम मंडळाना सांगण्यासाठी महापालिकेने सभाही घेतली नसल्याचे कळते. या संदर्भात महापालिकेच्या अतिक्रमण विभागाचे उपायुक्त अशोक बुरपुल्ले यांच्याशी वारंवार संपर्क साधूनही तो होऊ शकला नाही.

टेंभी नाका परिसरात कोंडी

टेंभी नाका परिसरात जिल्हा न्यायालयाच्या दिशेने जाणाऱ्या मार्गावर नवरात्रोत्सवाचा मंडप उभारल्यामुळे पोलीस मुख्यालयाच्या दिशेने जाणारा रस्ता वाहतुकीसाठी पूर्णपणे बंद झाल्याचे निदर्शनास येत आहे. या मार्गावरील वाहतूक जिल्हा रुग्णालय मार्गावरून वळवण्यात आली आहे. तर जिल्हा रुग्णालयाकडून टेंभी नाक्याच्या दिशेने जाणाऱ्या वाहनांना प्रवेश बंदी लागू करण्यात आली आहे. या मार्ग बदलामुळे जिल्हा रुग्णालय परिसरात वाहतूक कोंडी होत आहे.

जिल्हा शासकीय रुग्णालयाकडून टेंभी नाक्याकडे जाणाऱ्या रस्त्यावर तात्पुरत्या स्वरूपावर वाहनांना प्रवेश बंदी लागू करण्यात आली आहे. जिल्हा शासकीय रुग्णालय मार्गावर शाळेच्या वाहनांमुळे कोंडी होत आहे. वाहतूक पोलिसांकडून कोंडी सोडवण्याचे काम केले जात आहे.

– सुरेश लंभाटे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, ठाणे नगर वाहतूक शाखा