स्थलांतराचा ‘स्मार्ट सिटी कंपनी’चा राज्य परिवहन महामंडळाकडे प्रस्ताव

भगवान मंडलिक
कल्याण : कल्याण पश्चिम रेल्वे स्थानक परिसरात स्मार्ट सिटी प्रकल्पाअंतर्गत राज्य परिवहन महामंडळाच्या आगाराची महापालिकेकडून पुनर्बाधणी केली जाणार आहे. हे काम पूर्ण होईपर्यंत सध्याचे आगार कल्याण कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात स्थलांतरित करावे, असा प्रस्ताव स्मार्ट सिटी कंपनीने राज्य परिवहन महामंडळाला दिला आहे.

कल्याण कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारातील प्रशस्त जागेचा राज्य परिवहन मंडळाने बसचे दैनंदिन संचालन, कार्यालयीन कामकाजासाठी वापर करावा. तसेच कल्याण रेल्वे स्थानकापासून जवळ, प्रवाशांना ये-जा करण्यासाठी सोयीस्कर अशा ठिकाणी प्रस्तावित जागा असल्याने त्याचा मंडळाने स्वीकार करावा, असा प्रस्ताव स्मार्ट सिटी कंपनीने राज्य परिवहन मंडळाला दिला आहे. या विषयी महामंडळाकडून संबंधित जागा मान्य असल्याचे लेखी उत्तर येत नसल्याने हा विषय खोळंबला आहे, अशी माहिती स्मार्ट सिटी कंपनीतील एका सूत्राने दिली.

स्मार्ट सिटी प्रकल्पातून कल्याण आगाराचा पुनर्विकास होणार असल्याने आगाराचे स्थलांतर, तेथील परिचलन याविषयी चर्चा करण्यासाठी राज्याचे परिवहन मंत्री अ‍ॅड्. अनिल परब यांच्या अध्यक्षतेखाली गेल्या महिन्यात मुंबईत एक बैठक झाली. कल्याण आगाराच्या पुनर्बाधणीचे काम सुरू करण्यापूर्वी आगार कल्याण कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात स्थलांतरित करण्याचा प्रस्ताव महामंडळाला दिला आहे. महामंडळ अधिकाऱ्यांनी या जागेची पाहणी केली आहे. बस परिचलनाचे नकाशे, आराखडे मंडळाकडे दाखल केले आहेत, अशी माहिती पालिका अधिकाऱ्यांनी बैठकीत दिली.

राज्य परिवहन मंडळाच्या एका उच्चपदस्थ अधिकाऱ्याकडून मिळालेल्या माहितीनुसार कल्याण आगार पुनर्विकासाचा प्रकल्प सुरू झाल्यानंतर या आगाराचे शहराच्या अन्य भागात स्थलांतर केले जाणार आहे. ही नवीन जागा प्रवाशांना ये-जा करण्यासाठी योग्य आहे की नाही याची पडताळणी केली जात आहे.

कल्याण आगाराचा स्मार्ट सिटीमधून पुनर्विकास होईपर्यंत राज्य परिवहन महामंडळाने पालिकेने प्रस्तावित केलेल्या जागेचा विचार करावा. तसे आराखडे, नकाशे महामंडळ अधिकाऱ्यांना दिले आहेत. एस.टी.च्या अधिकाऱ्यांनी जागा पाहणी केली आहे. जागा मान्य असल्याचे लेखी उत्तर एस. टी. मंडळाकडून येणे अपेक्षित आहे.

-तरुण जुनेजा, प्रकल्प अभियंता, स्मार्ट सिटी