बंद वाचनालय पुन्हा सुरू करण्यासंदर्भात प्रशासनाकडे प्रस्ताव

कल्याण-डोंबिवलीच्या बालभवनाच्या इमारतीतील गेल्या काही वर्षांपासून बंद असलेल्या ज्येष्ठ पत्रकार श्रीकांत टोळ वाचनालयाची जबाबदारी लवकरच एखाद्या खासगी संस्थेवर सोपवली जाण्याची शक्यता आहे. त्यासंदर्भातील प्रस्ताव प्रशासनाकडे सादर करण्यात आला आहे. हे वाचनालय सुरू झाल्यास येथील सोळाशे पुस्तकांचा खजिना परिसरातील मुलांसाठी खुला होणार आहे. शिवाय विद्यार्थ्यांना अभ्यासिकाही उपलब्ध होणार आहे.

रामनगरमधील बालभवनातील वाचनालय गेल्या काही वर्षांपासून देखभाल, दुरुस्ती आणि पुरेशा कर्मचाऱ्यांअभावी बंद आहे. शहराच्या मध्यवर्ती भागातील हे वाचनालय अभ्यासिका म्हणून चांगल्या पद्धतीने उपयोगाला येऊ शकते. अनेक गरजू, गरीब विद्यार्थी या वाचनालयातील अभ्यासिकेचा लाभ घेऊ शकतात. त्यामुळे प्रशासनाने वाचनालयाचे खासगीकरण करून ते या कामाचा अनुभव असलेल्या चांगल्या संस्थेला चालवायला द्यावे, अशी मागणी रामनगर प्रभागाचे नगरसेवक, विरोधी पक्षनेते मंदार हळबे यांनी केली होती. यासंदर्भातील प्रस्ताव प्रशासनाकडे सादर करण्यात आला आहे.

या वाचनालयात पुरेशी मोकळी जागा आहे. तिथे बाक, टेबल-खुच्र्या ठेवल्यास अभ्यासासाठी चांगली व्यवस्था होऊ शकते. एका बाजूची अभ्यासिका नाममात्र शुल्कात उपलब्ध करून द्यावी, अशा सूचनाही हळबे यांनी केल्या आहेत. बालभवनातील वाचनालयाचे खासगीकरण करण्याचा विचार सुरू आहे, असे प्रशासनातील अधिकाऱ्याने सांगितले.

बालभवनाकडे दुर्लक्ष

बालभवनातील खेळ, मनोरंजन, वाचनालय, सभागृह, कलादालन खासगी संस्थांना चालविण्यास देण्याची मागणी अनेक वर्षांपासून करण्यात येत आहे, मात्र पालिकेला पूर्ण क्षमतेने बालभवन चालविता आलेले नाही. बालभवनच्या देखभाल दुरुस्तीसाठी सात लाख ५० हजार रुपये खर्च अपेक्षित आहे. गेल्या वर्षी तरतूद नसल्याने यावेळी बालभवनची डागडुजी करण्यात आली नाही. वातानुकूलन यंत्रणा, विजेचे दिवे यांची देखभाल निधीअभावी न झाल्याचे, सूत्रांनी सांगितले.