प्रा. आत्माराम गोडबोले लेखक, साहित्यिक

वसईच्या वर्तक महाविद्यालयात मराठीचे प्राध्यापक असलेले प्रा. आत्माराम गोडबोले लेखक म्हणून प्रसिद्ध आहेत. विविध विषयांवर त्यांनी विपुल लेखन केलेले आहे. त्यांच्या ‘संगर’ या कथासंग्रहाला विविध दहा राज्यस्तरीय पुरस्काराने गौरविण्यात आलेले आहे.

Senior colorist Ashok Mulye majha puraskar award ceremony
परोपकारात रमलेला रंगकर्मी
piyush goyal
कर्तबगारीने ‘तेजांकित’ झालेल्यांचा गौरव!
juna furniture teaser released by salim khan
ज्येष्ठ नागरिकांचा सहानुभूतीने विचार करायला हवा
piyush goyal
लखलखत्या तरुण तेजांकितांचा आज गौरव; केंद्रीय वाणिज्य व उद्योगमंत्री पियूष गोयल प्रमुख अतिथी

शाळेत असल्यापासून वाचनाचा छंद होता, परंतु वाचन खऱ्या अर्थाने फुललं ते विद्रोहामुळे. त्या वेळी मराठवाडा विद्यापीठाच्या नामांतरांची आग पेटली होती आणि माझं लातूर हे गाव तेव्हा लढय़ातलं केंद्रस्थानी होतं. अन्याय-अत्याचार साहित्यातून मांडला जायचा.

‘गवई बंधूंचे डोळे गेले,

पाणावल्या नाहीत तुमच्या डोळ्यांच्या कडा

नाहीत कुठे निषेधाच्या सभा,

बातम्या आल्या चार-दोन पेपरांत

बाकी सारं शांत शांत शांत’

अशा आग ओकणाऱ्या कविता वाचनात आल्या. मग एकामागोमाग एक शोध सुरू झाला. नामदेव ढसाळ (गोलपिठा), अर्जुन डांगळे (छावणी हलते आहे), ज. वि. पवार (नाकेबंदी), केशव मेश्राम (उत्खनन) यांच्या कविता वाचनात आल्या आणि एका वेगळ्या साहित्याची ओळख झाली ते म्हणजे विद्रोही दलित साहित्य.

एकदा गंगाधर पानतावणे यांच्या अस्मितादर्शन या साप्ताहिकाने ‘दलित आत्मकथा’ हा विशेषांक काढला होता. तो वाचल्यानंतर सारी दलित आत्मकथने वाचून काढली. आठवणींचे पक्षी (प्र. ई. सोनकांबळे), बलुतं (दया पवार), उपरा (लक्ष्मण माने), फांजर (नानासाहेब झोडगे), अक्करमाशी (शरणकुमार लिंबाळे), माझ्या जन्माची चित्तरकथा (शांताबाई कांबळे), गावकी (रुस्तम अचलखांब) ही दलित साहित्यिकांची आत्मकथने वाचनात आली आणि वेगळ्या विचारांचा प्रवास सुरू झाला.

आयुष्यावर प्रभाव टाकणारी बरीच पुस्तकं आहेत. एकदा डॉ. भालचंद्र फडके यांचे ‘दलित साहित्य : वेदना आणि विद्रोह’ हे पुस्तक वाचनात आलं. त्यानंतर काय वाचावं आणि काय वाचू नये हे समजलं. इथे मला अनेक पुस्तकांची नावे मिळाली. या सर्व पुस्तकांवर विद्रोही, बंडखोर असा शिक्का बसलेला होता. पण हेच खरं अस्सल साहित्य आहे हे पटलं. रथचक्र (श्री. ना. पेंडसे), माहीमची खाडी (मधु मंगेश कर्णिक), चक्र (जयवंत दळवी), वासूनाका (भाऊ  पाध्ये), सूड (बाबूराव बागूल), बहिष्कृत (अरुण साधू) इत्यादी पुस्तके वाचली. या पुस्तकातले अनुभव खूप वेगळे होते. माझ्या वाचनाला दिशा मिळाली. चोखंदळपणा वाढत गेला. भन्नाट, अवाक् करणारं, सुन्न करणारं, संघर्षमय शोधून वाचू लागलो.

वि. स. खांडेकर, कुसुमाग्रज, रणजीत देसाई, नामदेव ढसाळ, योगिराज बागूल, आनंद यादव, व्यंकटेश माडगूळकर, अरुण साधू, श्याम मनोहर, रवींद्र शोभणे, ना. धों. महानोर, राजन खान, प्रज्ञा दया पवार, मेघना पेठे, रंगनाथ पाठारे, सुरेश भट, भालचंद्र नेमाडे, मोनिका गजेंद्रगडकर हे माझे आवडते लेखक. कृष्णकाठ (यशवंतराव चव्हाण), अर्थविराम (यशवंतराव गडाख), पर्व आणि आवरण (एस. एल. भैरप्पा), ताम्रपट (रंगनाथ पाठारे), वर्तमान (सुरेश द्वादशीवार), एका तेलियाने (गिरीश कुबेर), इडा पिडा टळो (आसाराम लोमटे), मूठभर माती (डॉ. जनार्दन वाघमाारे) ही काही आवडती पुस्तकं

या सर्व लेखकांची पुस्तके दहा र्वष वाचून काढल्यानंतर आपल्याकडे सांगण्यासारखं बरंच आहे. आपलंही निरीक्षण आहे याची जाणीव झाली आणि मग लिखाणाकडे वळालो. अत्याचार, अन्यायाला माझ्या लेखनातून वाचा फोडली आणि आत्मशोध घेण्याचा प्रयत्न करतोय. मी सर्व प्रकारची पुस्तकं वाचत असलो तरी आंबेडकरी विचारांनी प्रेरित झालेला लेखक आहे. हे विचारच माझी प्रेरणा आहे. माणसांचं दु:ख, जगणं, व्यथा, संघर्ष ज्या पुस्तकांत दिसतो ती मला माझी जवळची पुस्तकं वाटतात. ते लेखक माझे वाटतात.

पुस्तकं वाचण्यासाठी वेळ ही सबब आड येत नाही. पुस्तकं नेहमी सोबत असतात. त्यामुळे वेळ मिळाला तसं वाचन होत असतं. मी विविध प्रकारचं साहित्य वाचतो. त्यात चरित्र, आत्मचरित्र, कथा कादंबरी, गझल, कविता आणि वैचारिक वाचनाचा समावेश आहे. पुस्तक जमवत गेलो आणि हजारो पुस्तकांचा संग्रह घरात झालेला आहे. विविध प्रकारच्या पुस्तकांचा त्यात समावेश आहे. आवडते लेखक भेटत गेले. त्यांच्याशी नाळ जुळत गेली. अनेकांशी ऋणानुबंध जडले.

पुस्तकांमुळे माझ्या आयुष्याला कलाटणी मिळाली. माझ्यासारख्या होरपळलेल्या माणसाचे जगणे अर्थपूर्ण झाले. त्याला मूल्य प्राप्त झाले. जीवनाच्या प्रश्नांची उत्तरं मिळत गेली. पुस्तकांमुळे एकाकीपणा वाटला नाही. पुस्तकं माझं टॉनिक आहे. पुस्तकांमुळे दोन माणसांमध्ये संवादाचा सेतू तयार होतो.

सफदर हाश्मी म्हणतात,

‘किताबें कुछ कहना चाहती हैं

आपके पास रहना चाहती हैं

किताबों का कितना बडा संसार हैं

किताबों में इतिहास का चित्कार हैं..’

पुस्तकात इतिहास निर्माण करण्याची ताकद आहे आणि त्या वाटेवरचा माझा प्रवास सुरू आहे.