जिल्ह्य़ातील पहिली चारचाकी रिक्षा रस्त्यावर;  परिवहन विभागाच्या मंजुरीमुळे प्रवाशांना आरामदायी प्रवासाचा अनुभव

ठाणे : गेल्या कित्येक वर्षांपासून तीन चाकांवर प्रवासी वाहतुकीचा भार पेलणारी काळीपिवळी रिक्षा आता चार चाकांनिशी धावणार आहे. एकाच वेळी पाच जणांना वाहून नेणारी ‘क्वाड्रिसायकल’ ही चारचाकी रिक्षा ठाणे जिल्ह्यात दाखल झाली आहे. बजाज कंपनीच्या या ‘क्यूट’ रिक्षाला स्थानिक परिवहन विभागाने मंजुरी दिली असल्याने येत्या काळात ठाण्यातील रस्त्यांवर तीनचाकींपेक्षा चारचाकी रिक्षांचे प्रमाण वाढण्याची शक्यता व्यक्त होत आहे.

ठाणे शहरात तब्बल दीड लाखांहून अधिक रिक्षा रस्त्यावर धावतात. या रिक्षांमध्ये चालकाखेरीज जास्तीत जास्त तीन प्रवासी बसण्याची सोय असली तरी, रिक्षाचालकाच्या बाजूलाही प्रवासी बसवून वाहतूक केली जाते. त्यामुळे अपघात होण्याचीही शक्यता असते. या पाश्र्वभूमीवर बजाज कंपनीने क्यूट नावाची क्वॉड्रिसायकल बाजारात आणली आहे. ठाणे जिल्ह्य़ात क्वॉड्रिसायकल क्यूट नामक पहिली काळीपिवळी रिक्षा रस्त्यावर धावू लागली आहे. क्यूट क्वॉड्रिसायकल चारचाकी रिक्षेत वाहनचालकासह चार व्यक्ती प्रवास करू शकतात. त्यामुळे अवैध अधिक प्रवाशी वाहतुकीला आळा बसेल, असा दावा प्रादेशिक परिवहन विभागाकडून करण्यात आला. युरोपमध्ये उदयास आलेली क्वॉड्रिसायकल ही बजाज कंपनीने क्यूट नावाने भारतात पहिल्यांदा आणली आहे. वजनाने हलकी आणि आकाराने लहान असणारी ही क्यूट क्वॉड्रिसायकल इंधनबचतीस अनूकूल आणि लहान रस्त्यांसाठी उत्तम असल्याचे बजाज कंपनीचे मुंबई विभागाचे व्यवस्थापक रमेश परमेश्वर यांनी सांगितले.

‘क्यूट’ची वैशिष्टय़े

क्यूट क्वॉड्रिसायकल (पेट्रोल) एका लिटरमध्ये ३५ किलोमीटर धावत असून सीएनजीवरदेखील ही चारचाकी गाडी चालते. रोज शहरात चालवण्यासाठी उत्कृष्ट अशी गाडी असून वाहनचालकासह चार जण या गाडीने प्रवास करू शकतात. जास्तीत जास्त ७० वेगमर्यादा असणाऱ्या या वाहनाची इंजिन क्षमता २१६सीसी आहे. वाहनाचे इंजिन मागील बाजूस आणि सामान ठेवण्याची जागा वाहनाच्या पुढील बाजूस आहे. हे वाहन इतर कोणत्याही वाहनापेक्षा कार्बन डायऑक्साईड वायू हा ४० टक्के कमी प्रमाणात उत्सर्जित होत असल्याचा दावा बजाज कंपनीकडून करण्यात आला आहे.

क्वॉड्रिसायकल म्हणजे काय?

* जगात क्वॉड्रिसायकल म्हणजे एक कमी शक्तीची आणि पारंपरिक कारपेक्षा लहान, कमी वेग असलेली ४ चाकी गाडी असते.

* क्वॉड्रिसायकल युरोपमध्ये जवळपास ३ दशकांपासून अस्तित्वात आहे.

* अमेरिकेमध्ये १९९८ आणि कॅनडात २००० मध्ये अधिकृतरीत्या कमी वेगाचे वाहन म्हणून वाहनांच्या एका नवीन श्रेणीत गणले गेले आहे.

*  युरोपात एकूण ३ लाखांहून जास्त क्वॉड्रिसायकल धावत आहेत.

ठाणेकर प्रवाशांसाठी अतिशय सुखकर, सुरक्षादायी अशी ही बजाजची क्यूट रिक्षा आहे. यामुळे अवैध प्रवासी वाहतुकीला आळा बसेल.

नंदकिशोर नाईक, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी, ठाणे