शनिवारी, रविवारी डोंबिवली ते कल्याण वाहतुकीवर परिणाम

लोकसत्ता प्रतिनिधी

मुंबई/ ठाणे : कल्याण पट्टय़ातील वाहतुकीसाठी महत्त्वाच्या मानल्या जाणाऱ्या पत्रीपुलावर ७६ मीटर लांबीची तुळई बसवण्यासाठी मध्य रेल्वेमार्गावर चार दिवस ‘ट्रॅफिक ब्लॉक’ घेण्यात येणार आहे. त्याअंतर्गत येत्या शनिवारी व रविवारी सकाळी ९.५० पासून दुपारी सव्वादोनपर्यंत डोंबिवली ते कल्याणदरम्यानची लोकल वाहतूक रद्द करण्यात आली आहे.

कल्याण पूर्व आणि पश्चिमेला जोडणारा १०४ वर्षे जुना असणारा पत्रीपूल धोकादायक झाल्याने २०१८ मध्ये वाहतुकीसाठी बंद करण्यात आला होता, मात्र गेल्या दोन वर्षांपासून नवीन पुलाचे काम विविध कारणांमुळे रखडले. यावरून नागरिकांतून संतप्त पडसाद उमटू लागल्यानंतर पुलाच्या कामांना वेग आला आहे. या पुलावर ७६ मीटर लांब आणि १०.५ मीटर रुंद असलेली ७०० मेट्रिक टन वजनाची तुळई बसवण्यात येणार असून हैदराबाद येथील कारखान्यातून ही तुळई पुलाच्या ठिकाणी दाखल झाली आहे. रेल्वेच्या सुरक्षा आयुक्तांनी गेल्या आठवडय़ात या तुळईला ना हरकत प्रमाणपत्र दिले आहे. गेल्या आठवडय़ातच तुळईच्या जोडणीसाठी १ मीटपर्यंत यशस्वी ‘मॉक ड्रिल’ करण्यात आली. या तुळईची अंतिम जोडणी करण्यासाठी राइट्स या खासगी कंपनीने दिवाळीनंतर मध्य रेल्वे प्रशासनाकडे मेगाब्लॉकची मागणी केली होती. त्यानुसार मध्य रेल्वेने चार ट्रॅफिक ब्लॉक घेण्याचा निर्णय घेतला असून या चारपैकी पहिले दोन ब्लॉक २१ आणि २२ नोव्हेंबरला घेण्यात येत आहेत. या ब्लॉकमुळे मध्य रेल्वेच्या डोंबिवली ते कल्याणदरम्यान लोकल फेऱ्या रद्द होणार असून मेल-एक्स्प्रेस गाडय़ांवरही परिणाम होणार आहे. तर, उर्वरित दोन ब्लॉक पुढील आठवडय़ातील शनिवारी आणि रविवारी घेण्यात येणार आहेत.

पत्रीपुलासाठी बसवण्यात येणारी तुळई ही ७६.६७ मीटर लांबीची सर्वात मोठी तुळई असल्याचे रेल्वेतील एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले. त्याआधी मुंबईतील हँकॉक पुलावरील तुळई ही ६३ मीटर लांबीची आहे.