पश्चिम रेल्वेकडून तरुणाला जीवदान; विद्युतपुरवठा तासभर खंडित

कौटुंबिक नैराश्यातून  एका तरुणाने सोमवारी सकाळी बोईसर रेल्वे स्थानकावरील पादचारी पुलावर चढून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. मात्र या घटनेची माहिती मिळताच रेल्वे प्रशासनाने तातडीने कारवाई करून मुंबईहून गुजरातकडे जाणाऱ्या रेल्वे मार्गाचा विद्युत पुरवठा तब्बल एक तास बंद ठेवला. एमआयडीसी अग्निशमन दल आणि रेल्वे पोलीस तसेच नागरिकांच्या सहकार्याने या तरुणाला आत्महत्येपासून परावृत्त करण्यास यश आले. एका तरुणाचे प्राण वाचवण्यासाठी दाखवलेल्या तत्परतेमुळे रेल्वे प्रशासनाची संवेदनशीलता प्रकट झाली आहे.

पश्चिम रेल्वेवरील बोईसर रेल्वे स्थानकात सोमवारी सकाळी ८.३० च्या दरम्यान पादचारी पुलावर चढून मोहम्मद तमने (२३) या माथेफिरूने हातात चाकू घेत रेल्वेच्या २५ हजार व्होल्ट विद्युत वाहिनीला हात लावून आत्महत्या करण्याचे नाटय़ सुरू केले. घटनेचे गांभीर्य लक्षात घेत पश्चि रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी तातडीने संपूर्ण विद्युतपुरवठा खंडित केला. त्यानंतर रेल्वे अधिकारी आणि अग्निशमन जवानांच्या अथक प्रयत्नांनंतर मोहम्मदला तेथून बाहेर काढण्यात यश आले. माथेफिरू तरुणाने घातलेल्या गोंधळामुळे पश्चिम रेल्वेची वाहतूक सकाळी ९ ते १० पर्यंत पूर्णपणे बंद होती. बोईसर खैरापाडा ते वाणगाव दरम्यान रेल्वेचा वीजपुरवठा खंडित करण्यात आला होता. यामुळे सुमारे दोन तास रेल्वे वाहतुकीवर परिणाम झाला असून रेल्वे वाहतूक विस्कळीत झाली होती.

रेल्वे प्रवाशांना होणाऱ्या गैरसोयीबद्दल नेहमीच रेल्वे प्रशासनावर ताशेरे ओढले जातात. कधी एखादी लोकल काही तांत्रिक अडचणीने सेकंदाच्या फरकाने विलंबाने आली तरी प्रवासी रेल्वे प्रशासनावर संताप व्यक्त करतात. परंतु बोईसरमधील घटनेने रेल्वे प्रशासन नागरिकांच्या जिवासाठी अतिशय संवेदनशील असल्याचे दिसून आले आहे. मोहम्मद तमने याच्या आत्महत्या करण्याच्या प्रयत्नांच्या घटनेमुळे हजारो प्रवाशांना खोळंबा झाला असला तरी एका व्यक्तीचे प्राण वाचल्याबद्दल अनेक व्यक्तींनी समाधान व्यक्त केले आहे. मोहम्मद हा बिहारमधील समस्तीपूर जिल्ह्यातील रहिवासी असून कुटुंबीयांच्या जाचाला कंटाळून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला असल्याचे त्याच्या चौकशीतून समोर आले आहे.

दोन गाडय़ांचा खोळंबा

रेल्वेचा विद्युत पुरवठा खंडित झाल्याने सकाळच्या वेळी ९.२० वाजताची बोरिवली-डहाणू लोकल आणि ९.५८ वाजताची विरार-डहाणू मेमू या रेल्वे गाडय़ांचा खोळंबा झाला. त्यामुळे बोईसर येथे हजारो प्रवाशांना ताटकळत राहावे लागले.

संरक्षक जाळीची मागणी

बोईसर रेल्वे पादचारी पुलावर ओव्हरहेड वायरच्या समोरच्या बाजुलाच जाळी लावण्यात आली आहे. परंतु पुढे काही अंतरावर जाळी नसल्याने याठिकाणी कोणीही सहज जाऊ शकतो. या ठिकाणी आत्महत्या होऊ शकतात. त्यामुळे या ठिकाणी संरक्षक जाळी लावण्यात यावी, अशी मागणी प्रवाशांनी केली आहे.