काही ठिकाणी झाडांच्या फांद्या कोसळल्या

ठाणे : जिल्ह्य़ातील शहरी तसेच ग्रामीण भागात गुरुवारी पावसाने जोरदार हजेरी लावली. मात्र, तासाभरातच जोर कमी होऊन पावसाने उसंत घेतली. सकाळपासूनच ढग दाटून आल्याने सर्वत्र काळोख पसरला होता. तासभर पडलेल्या पावसामध्ये काही ठिकाणी झाडांच्या फांद्या उन्मळून पडल्या.

बुधवारी सकाळी सुरू झालेल्या पावसाचा जोर काही वेळातच कमी होऊन दिवसभर पावसाची रिपरिप सुरू होती. गुरुवारीही जिल्ह्य़ात ढगाळ वातावरणामुळे अंधार पसरला होता. ठाणे शहरात सकाळी ११ वाजता विजेच्या कडकडाटासह जोरदार पाऊस सुरू झाला. तासभर हा पाऊस सुरू होता. त्यानंतर मात्र पावसाचा जोर काहीसा कमी झाला. दुपारी ३ वाजेनंतर पाऊस पूर्णपणे थांबला होता. या पावसामुळे पाचपाखाडी भागात एका झाडाची फांदी उन्मळून पडली. सुदैवाने या घटनेत कुणीही जखमी झाले नाही. तर, वर्तकनगर परिसरात तीन वेळा वीजपुरवठा खंडित झाला. कल्याण-डोंबिवली शहरातही दुपारी पावसाची रिपरिप सुरू होती. उल्हासनगर, अंबरनाथ, बदलापूर, भिवंडी, मुरबाड, शहापूर या सर्वच ठिकाणी दुपारच्या वेळेत जोरदार पाऊस झाला.