ठाणे महानगरपालिकेच्यावतीने आयोजित २८ व्या ‘ठाणे महापौर वर्षा मॅरेथॉन’ स्पर्धेवर पुणे आर्मीमधील रणजित सिंग यांनी नाव कोरले. २१ किलोमीटरच्या या स्पर्धेसाठीच अंतर त्यांनी १ तास १० मिनिटांत कापले. या स्पर्धेच उदघाटन राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री आणि पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते करण्यात आले होते. एकूण १० गटात झालेल्या स्पर्धेकरिता ६ लाखांहून अधिक बक्षिसे ठेवण्यात आली होती. खास करून आजच्या स्पर्धेत एकनाथ शिंदे देखील कँसरग्रस्त धावपटूंबरोबर धावले. पालिका मुख्यालयापासून झालेली २१ किलोमीटरच्या स्पर्धेची सांगता पुन्हा मुख्यालय समोरच झाली. या स्पर्धेत १५ हजारांहून अधिक स्पर्धकांनी सहभाग घेतला. अत्यंत उत्साहपूर्ण वातावरणात या स्पर्धेची सांगत झाली. मान्यवरांच्या हस्ते विजयी स्पर्धकांचा सन्मान करण्यात आला.


‘चला धावूया, स्मार्ट ठाण्यासाठी’ हे घोषवाक्य घेऊन आज ठाणे महानगरपालिकेच्यावतीने महापौर मॅरेथॉन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते या स्पर्धेची सुरूवात झेंडा फडकावून करण्यात आली. यावेळी ठाण्याच्या महापौर मिनाक्षी शिंदे यांच्या समवेत अनेक मान्यवर उपस्थित होते. या स्पर्धेकरिता क्रीडा क्षेत्रातील खेळाडूंबरोबरच ‘माझ्या नवऱ्याची बायको’ या नावाजलेल्या मालिकेतील कलाकार देखील सहभागी झाले होते.

ठाणे महानगर पालिकेच्या मुख्यालयातून २१ किलोमीटरची स्पर्धा पुन्हा त्याच ठिकाणी संपली. २१ किलोमीटर पुरुष तसेच १५ किलोमीटर महिलांची स्पर्धा एकाच वेळेस सुरु झाली. पुरुषांच्या २१ किलोमीटरच्या स्पर्धेत पुणे आर्मीच्या रणजित सिंग यांनी प्रथम क्रमांक पटकावला. त्यांनी हे अंतर १ तास १० मिनिटात कापले. दुसऱ्या क्रमांकावर नाशिकच्या पिंटू कुमार यादव विजयी झाला. तर, अलिबागचा सुजित गमरे याने तिसरा क्रमांक पटकावला. याच महिन्यांत २५ ऑगस्ट रोजी चेन्नई येथे होणाऱ्या राष्ट्रीय खुल्या स्पर्धसाठी सहभागी होणार असल्याचे रणजित सिंग यांनी सांगितले. तर ठाण्यातील या स्पर्धेचे जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी देखील स्वागत केले आहे.

या मॅरेथॉन दौडमध्ये लहान वयोगटातील शाळकरी विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता. त्यानंतर जेष्ठ नागरिक महिला आणि कॅन्सरग्रस्तांनी देखील सहभाग घेतला होता. आजच्या या स्पर्धेत कँसरग्रस्त धावपटूंबरोबर पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी ५०० मीटर दौडमध्ये सहभाग घेतला. यावेळी त्यांच्यासोबत सभागृह नेते नरेश मस्के व इतर मान्यवरांनी हजेरी लावली.