रस्ता रुंदीकरणात तोड होण्याची शक्यता; पर्यावरणप्रेमींचा अखेरचा दंडवत
ठाण्यातील पोखरण रस्त्यावरील शिवाईनगर बस थांब्याजवळील एका झाडाच्या प्रत्येक फांदीवर पांढऱ्या-पिवळ्या फुलांचा बहर आला आहे. लांबून पाहिल्यावर ही फुले नसून झाडाची कोवळी पाने असल्याचा भास होतो. मात्र तेथील झाडाखाली पडलेल्या पाकळ्यांचा सडा आणि परिसरात पसरलेला मंद सुगंध या फुलाची ओळख पटवून देतो. मन प्रसन्न करणारा हा वृक्ष म्हणजे अत्यंत दुर्मीळ प्रजातीमधील ‘वायवर्ण’ अर्थात ‘वरुण’ आहे. गेली काही वर्षे पोखरण रस्त्यावर दिसणारे हे झाड आता ठाणेकरांसाठी काही दिवसांचा सोबती ठरणार आहे. पोखरण रस्त्यावर सुरू असलेल्या रस्ता रुंदीकरणाच्या कारवाईमध्ये हे झाड तोडले जाण्याची शक्यता असल्याने या झाडाच्या फुलांचा हा शेवटचा बहर ठरणार आहे. त्यामुळेच ठाण्यातील अनेक वृक्षप्रेमी आणि पर्यावरणप्रेमींनी या झाडाला भेट देऊन त्याची माहिती घेण्याचा प्रयत्न सुरू केला आहे.
ठाणे शहराच्या वेगवेगळ्या भागांत काही वर्षांपूर्वी अत्यंत दुर्मीळ वृक्षांची लागवड करण्यात आली होती. ती झाडे आता बरीच मोठी झाली असून ठाण्याच्या पर्यावरणाचा समतोल आणि शहरवासीयांच्या डोळ्यांना सुखावणाऱ्या रंगांची उधळण ही झाडे करीत आहेत. पोखरण रस्त्यावर यापैकी बऱ्याच झाडांचे दर्शन घडत असून त्यामध्ये बहावा, कांचन, महाराष्ट्राचे राज्यपुष्प असलेले तामण, पांढरी सावर, जंगली बदाम, खिरणी, भोकर, बकुळ, आकाशनीम यांचा समावेश आहे. याच रस्त्यावर शिवाईनगर बस थांब्याजवळ ठाण्यातील अत्यंत दुर्मीळ झाडांपैकी ‘वायवर्ण’ या वृक्षाचेही दर्शन घडते. देशातील प्रत्येक राज्यामध्ये आणि महाराष्ट्रातील वेगवेगळ्या जिल्ह्यांत विरळ प्रमाणात आढळणाऱ्या या वृक्षप्रजातीची ठाण्यातील संख्या अवघ्या एका हाताच्या बोटावर मोजण्याइतकीच आहे. त्यातील पोखरण रस्त्यावरील हे झाड सर्वाच्याच परिचयाचे होते. मात्र रस्ता रुंदीकरणाच्या आड येत असल्याने येत्या काही दिवसांत हे झाड तोडण्यात येणार आहे. या झाडाचा सध्याचा हा अखेरचा बहर ठरणार असून तो अनुभवण्यासाठी पर्यावरणप्रेमी या वृक्षाला भेट देत आहेत. ठाण्यातील फर्न संस्थेच्या वतीने नुकतेच या झाडाची माहिती घेऊन झाडाच्या फुलांचा अभ्यास करण्यात आला. सुमारे ७५ हून अधिक ठाणेकर नागरिकांनी या ठिकाणी भेट देऊन या झाडाची पाहणी केली.

वायवर्ण वृक्षाबद्दल..
कट्रेव्हा नुरव्हाला या शास्त्रीय नावाने ओळखल्या जाणाऱ्या या वृक्षाला पाचुंदा, वायवर्ण, वरुण, बंगालमध्ये बरुन, इंग्रजीत बर्ना अशी नावे
आहेत. भारतात सर्वत्र आढळणारा आणि सर्व भारतीय भाषांत नाव असलेल्या ‘वायवर्ण’ या वृक्षाला धार्मिक महत्त्व असून शंकराच्या मंदिराजवळ तसेच मुस्लीम आणि बौद्ध प्रार्थनास्थळांच्या आवारातही याला विशेष महत्त्व आहे.
परिसंस्थेतील झाडे लावा
ठाण्यातील फर्न संस्था गेल्या वर्षभरापासून ठाण्यामध्ये विविध पर्यावरणीय उपक्रम राबवत असून त्यांच्या ‘सोयरे वृक्ष’ या उपक्रमातून नागरिकांना शहरातील झाडांची ओळख करून दिली जाते. याच उपक्रमातून ‘वायवर्ण’ या झाडाची माहिती नागरिकांना नुकतीच करून देण्यात आली. पोखरण रस्त्यावर सध्या रस्ता रुंदीकरणाची कारवाई सुरू असून सध्या अस्तित्वात असणारी अनेक झाडे पुढील वर्षी या भागात नसतील, त्यामुळे त्यांच्यासाठी हा बहरण्याचा अखेरचा मोसम ठरणार आहेत. या झाडांमध्ये ‘वायवर्ण’ हे अत्यंत दुर्मीळ झाड आढळल्याचे संस्थेच्या सीमा हर्डीकर यांनी सांगितले. त्यामुळे रस्ता रुंदीकरणाचे काम पूर्ण झाल्यानंतर येथे याच प्रजातीची आणि परिसंस्थेच्या दृष्टीने उपयुक्त अशी देशी झाडे या रस्त्याच्या कडेने पुन्हा लावण्यात यावीत, अशी मागणी या वेळी हर्डीकर यांनी केली आहे.

increase in the number of floodplains Water pumping pumps at 481 places during monsoon
जलमय सखल भागांच्या संख्येत वाढ? पावसाळ्यात ४८१ ठिकाणी पाणीउपसा पंप; खर्चातही वाढ
dhule crime news, dhule gutkha transport marathi news,
साड्यांच्या गठ्ठ्यांआडून गुटख्याची वाहतूक, धुळे जिल्ह्यात साडेदहा लाखाचा मुद्देमाल जप्त
drowned
नाशिक जिल्ह्यात वेगवेगळ्या घटनांमध्ये तीन जणांचा बुडून मृत्यू
village maps
गाव नकाशे नसल्याने मच्छीमारांचे अस्तित्व धोक्यात, पंचवीस वर्षांपासून प्रतीक्षा