टाळेबंदीत सुरुवातीच्या काळात वेळ कसा घालवावा याबाबत साशंक असलेले अनेक नागरिक पुस्तक वाचनाकडे वळले आहेत. त्यामुळे या काळात वाचन वाढले आहे. मात्र टाळेबंदीमुळे आर्थिक संकटात सापडलेल्या ग्रंथालयांना या हंगामी वाचकांचे कायमस्वरूपी वाचकांत रूपांतर होईल या चिंतेने ग्रासले आहे. सध्याच्या घडीला बंद झालेल्या देणग्या, ग्रंथालयांच्या कर्मचाऱ्यांचे वेतन आणि वास्तूचे भाडे याची चिंता ग्रंथपालांना सतावते आहे. त्यामुळे पुढचा काळ ग्रंथालयांसाठी कसोटीचा असणार आहे, असे बोलले जात आहे.

एकीकडे वाचक डिजिटल पुस्तकांकडे वळत असताना ग्रंथालये ओस पडत असल्याची ओरड होत आहे. कमी झालेले वाचक, वर्गणीत पडलेला खंड, त्यात वाचलनालयांसारखा मोठा हत्ती पोसणे येत्या काळात कठीण होण्याची भीती काही ग्रंथपाल व्यक्त करत आहेत. मात्र दुसरीकडे टाळेबंदीत अनेक जण पुस्तकांकडे वळले असून ग्रंथपालांकडे पुस्तकांची मागणी करू लागले आहेत. पुस्तके अदलाबदलीचे प्रयोगही सुरू असून ही बाब वाचनसंस्कृतीसाठी आशादायी असल्याचे काही ग्रंथपाल सांगतात. अनेक जण पुस्तके वाचल्यानंतर आपल्या सहकारी, मित्र, नातेवाईक यांना पुस्तकाबाबत सारांश सांगत असून पुस्तकाचे महत्त्व सांगत आहेत. अनेक वाचक फेसबुक आणि व्हॉट्सअ‍ॅपच्या माध्यमातून आपण कोणते पुस्तक आणि का वाचत आहोत हे लिहीत आहेत. अनेक जण इतरांकडून पुस्तकांची उपलब्धता विचारत आहेत. कल्याण सार्वजनिक वाचनालयाचे राजीव जोशी हे ही बाब सकारात्मक असल्याचे सांगतात. लोकांना टाळेबंदीत वाचनाचे महत्त्व कळायला लागले आहे. पाच वर्षांपूर्वी वाचकांनी पुस्तके ग्रंथालयांना देण्यास सुरुवात केली होती, मात्र आता त्याची ओढ वाटायला लागली, असेही जोशी सांगतात. नवी पिढीही आता पुस्तके मागते. त्यात मोबाइल, किंडलवरील वाचनामुळे डोळ्यांवरचा वाढणारा ताण, डोकेदुखीचा त्रास आता समोर येऊ  लागला आहे. त्यामुळे वाचक पुन्हा छापील पुस्तकांकडे वळतील. त्यामुळे येत्या काळात अशा वाचकांना ग्रंथालयांकडे आकर्षित करायला हवे, असे जोशी यांनी सांगितले आहे. तर डोंबिवलीतील फ्रेंड्स लायब्ररीचे पुंडलिक पै टाळेबंदीनंतर वाचकांची वाचनाची भूक वाढेल, त्यामुळे आम्ही आशावादी आहोत, असे सांगतात. आम्ही टाळेबंदीची चाहूल लागताच आमच्या वाचकांना ५ ते १० पुस्तके दिली होती. ती संपवून आता वाचक अधिक पुस्तकांची मागणी करत आहेत. काहींची घरातील पुस्तके संपल्याने आता ते पुस्तकांची नव्याने मागणी करत आहेत. त्यामुळे ही बाब दिलासादायी असल्याचे पै सांगतात. आम्ही सध्या वीज बिल भरत नाही, नवी पुस्तके आणि मासिकांची खरेदी थांबल्याने पैसे वाचत आहेत. ग्रंथालयाच्या वास्तूबाबत अजून तरी दिलासा आहे, मात्र पुस्तकांना जगवण्यासाठी ग्रंथालय काही तास उघडण्याची परवानगी द्यायला हवी, असे पै यांनी सांगितले आहे.

ग्रंथालये वाचवायची चिंता

टाळेबंदीत सेवा देत नसल्याने वाचकांकडून देणगी मागणे अव्यवहार्य वाटते. मात्र कर्मचारी, देखभाल दुरुस्ती यांचा खर्च कसा काढायाचा, हा प्रश्न असून जुने सदस्यही दूर जात असल्याची भीती बदलापूरच्या ग्रंथसखा वाचनालयाचे श्याम जोशी यांनी व्यक्त केली आहे. पुस्तक हालते राहिले की अधिक टिकते, त्यासाठी काही अंशी टाळेबंदीतून मुभा मिळावी अशी त्यांची मागणी आहे.