कॅटर्स, ट्रॅव्हल्स आणि कपडय़ाची विक्री करणारे लघु उद्योगांचा समावेश

भाईंदर : गेल्या अडीच महिन्यांपासून उत्पन्न बंद झाल्यामुळे अनेक भागात झपाटय़ाने भाडय़ाची दुकाने रिकामी होण्यास सुरुवात झाली आहे. विशेष म्हणजे यात कॅटर्स, ट्रॅव्हल्स आणि कपडय़ाची विक्री करणाऱ्या लघु उद्योग व्यापाऱ्यांचा समावेश आहे.

करोनाचा प्रादुर्भाव झपाटय़ाने वाढत असल्यामुळे देशात टाळेबंदी लागू आहे.महाराष्ट्र राज्यात सर्वाधिक रुग्ण संख्या वाढत असल्यामुळे वाहतूक सेवा,  उद्योगधंदे, आणि औद्य्ोगिक वसाहती गेल्या अडीच महिन्यांपासून पूर्णत: बंद आहेत. परंतु रुग्ण वाढत असल्यामुळे हा कालावधी अजून वाढण्याची भीती निर्माण झाली आहे. त्यामुळे हातावर पोट असलेल्या परराज्यातील व्यावसायिक,  मजूर आणि कामगार आपल्या राज्यात स्थलांतरित होत आहेत.

करोनामुळे गेल्या तीन महिन्यांपासून डोक्यावर उभे राहिलेले कर्जाचे डोंगर अधिक वाढू नये म्हणून अनेक दुकानदार हे भाडय़ाची दुकाने मोकळी करत असल्याचे समोर आले आहे. यात प्रामुख्याने नागरिकांकडे पैसे नसल्यामुळे कपडय़ांची विक्री

होणार नाही या भीतीने कपडय़ाचे व्यापारी, टाळेबंदीत रद्द झालेले कार्यक्रम त्यामुळे उत्पन्न थांबलेले कॅटिरग व्यावसायिक तसेच सहलीनिमित्ताने परराज्यात फिरायला घेऊन जाणारे पर्यटन व्यावसायिक यांचा समावेश असून हे आपली दुकाने मोकळी करत असल्याचे समोर आले आहे.

मासे आणि भाजी विक्रीला जोर

हातातला रोजगार गेल्यामुळे अनेक तरुण हे मासे आणि भाजी विक्रीच्या उद्योगाकडे वळले असल्याचे आढळून येत आहे. कर्जाचे डोंगर उभे राहत असताना दुकाने मोकळी करून हे तरुण रस्त्याच्या कडेला मासे विक्री करत आहेत तर काही असलेल्या दुकानात भाजी विकत आहेत. परिस्थिती लवकरच न बदल्यास अनेकांवर उपासमारीची वेळ येण्याची भीती या नागरिकांकडून व्यक्त करण्यात येत आहे.

आमचा संपूर्ण व्यवसाय ठप्प झाल्यामुळे कर्ज वाढत आहे. अशा परिस्थितीत ऑफिस सुरू ठेवणे मला शक्य नाही, ते मोकळे करण्याखेरीज पर्याय नाही.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

– रोहित पाटील, मालक (मिराह टुरिजम सव्‍‌र्हिस)