कल्याण : करोना संक्रमणाच्या पार्श्वभूमी वर पालिका प्रशासनाने कल्याण-डोंबिवलीमध्ये दर रविवारी भरणारे आठवडी भाजीपाला बाजार बंद ठेवण्याचे आदेश दिले आहेत.

पालिका हद्दीत करोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढू लागली आहे. गेल्या पाच दिवसांपासून १०० ते १५० च्या दरम्यान रुग्ण आढळून येत आहेत. करोना रुग्णांची वाढती संख्या विचारात घेऊन आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी गर्दीच्या ठिकाणांवर निर्बंध आणले आहेत. बाजारात करोना संसर्गाचे नियम पाळण्यात येतात की नाही, याची पाहणी करण्यासाठी आयुक्तांनी शुक्रवारी अचानक दौरा केला होता. त्या वेळी अनेक व्यापारी, ग्राहक मुखपट्टी वापरत नसल्याचे निदर्शनास आले होते.

या बेशिस्तीची गंभीर दखल घेऊन शहराच्या विविध भागांत, प्रभागांमध्ये दर आठवड्याला भाजीपाला व इतर वस्तूंचे बाजार भरविले जातात. या बाजारात ग्राहक, विक्रेते करोना संसर्गाचे नियम पाळत नसल्याने सर्व प्रभाग अधिकारी रविवारी सकाळपासून बाजाराच्या ठिकाणी आपल्या कारवाई पथकासह हजर होते. बाजारात दुकान लावण्यासाठी आलेल्या विक्रेत्यांना पथकाने पिटाळून लावले.

कल्याण पूर्वेत विठ्ठलवाडी, दावडी, डोंबिवलीत ९० फुटी रस्त्यावर, उमेशनगर, सागावमधील आठवडी बाजार रविवारी बंद होते.

बाजार समिती, लक्ष्मी भाजीपाला सुरू असले तरी तेथे बाजार समिती, पालिकेचे पथक ग्राहक, व्यापारी करोना संसर्गाचे नियम पाळतात की नाही यावर लक्ष ठेवले जात आहे.

ठाण्यात रिक्षामध्ये केवळ दोन प्रवाशांना मुभा

करोनाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी ठाणे ते बदलापूर आणि भिवंडी शहरात धावणाऱ्या रिक्षांमध्ये केवळ दोनच प्रवाशांना प्रवास करण्यास मुभा देण्याचा निर्णय ठाणे वाहतूक पोलिसांनी घेतला आहे. जून महिन्यानंतर टाळेबंदीला शिथिलता मिळाल्यावर रिक्षांमध्ये दोनपेक्षा अधिक प्रवाशांची वाहतूक सुरू होती.

गेल्या काही दिवसांपासून ठाणे जिल्ह्यात करोना रुग्णांच्या संख्येत पुन्हा एकदा वाढ होऊ लागली आहे. यामध्ये सर्वाधिक रुग्ण हे ठाणे आणि कल्याण डोंबिवली महापालिकेच्या हद्दीत आढळून येत आहेत. त्यामुळे नियमांचे काटेकोरपणे पालन करण्याचे आवाहन पोलीस आयुक्त विवेक फणसळकर यांनी दिले आहेत. तसेच जमावबंदी आदेश लागू असून त्याचीही अंमलबजावणी योग्य पद्धतीने करण्याच्या सूचना पोलीस दलाला देण्यात आल्या आहेत.

मात्र, त्यानंतरही शेअर तत्त्वावर चालणाऱ्या रिक्षांमध्ये चार ते पाच प्रवाशांची वाहतूक सुरू होती. त्यामुळे करोनाचा प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता होती. यावर उपाय म्हणून ठाणे ते बदलापूर आणि भिवंडी शहरात आता एका रिक्षामध्ये चालक आणि दोन प्रवाशांनाच प्रवास करण्यास मुभा देण्याचा निर्णय वाहतूक पोलिसांनी घेतला आहे.

तसेच नियमांचे उल्लंघन करणाऱ्या रिक्षाचालकांविरोधात ५०० रुपये दंड वाहतूक पोलीस आकारत आहे. शुक्रवार आणि शनिवारी केलेल्या कारवाईत पोलिसांनी ७६७ रिक्षाचालकांना पोलिसांनी दंड आकारल्याची माहिती उपायुक्त बाळासाहेब पाटील यांनी दिली.