स्थानक परिसरातील उभारणीला विरोध; काही भागांत स्थानिकांचाही कोलदांडा

वाहतूक कोंडी, प्रदूषण आणि सार्वजनिक वाहतुकीवरील ताण कमी करण्यासाठी ठाणे महापालिका राबवत असलेला ‘हरित सायकल’ प्रकल्प अजूनही अडथळ्यांमध्ये अडकून पडला आहे. या प्रकल्पाची सर्वाधिक गरज असलेल्या रेल्वे स्थानक परिसरात सायकलींसाठी थांबा उभारण्याचे पालिकेचे प्रयत्न येथील रिक्षा संघटनांच्या विरोधामुळे अपयशी ठरत असल्याचे वृत्त आहे.

शहराअंतर्गत वाहतुकीसाठी नागरिकांना महापालिकेच्या वतीने सायकल सुविधा देण्यात आली आहे. साइनपोस्ट इंडिया प्रा.लि. आणि न्यू एज मीडिया पार्टनर प्रा.लि. या कंपनीतर्फे पहिल्या टप्प्यात विवियाना मॉल, कोरम मॉल, रेमंड कंपनी, माजिवडा, पोखरण रस्ता या ठिकाणी सायकल स्थानकांची उभारणी करण्यात आली. सार्वजनिक वाहनांच्या कोंडीत अडकण्यापेक्षा प्रदूषणरहित सायकलीच्या वाहतूक पर्यायाचा वापर नागरिकांकडून काही प्रमाणात होऊ लागला आहे. सायकल प्रकल्प सुरू झाल्यावर त्या भाडय़ाने घेत नागरिक शहराच्या अंतर्गत भागात वैयक्तिक कामासाठी या साधनाचा वापर करत आहेत. सुरुवातीच्या काळात पहिल्याच टप्प्यात १२० नागरिकांनी सायकलींसाठी नोंदणी केली. नागरिकांचा प्रवास सोईस्कर व्हावा आणि रेल्वे स्थानकाच्या दिशेने येजा करताना अधिकाधिक सायकलींचा वापर व्हावा यासाठी या भागात सायकलींसाठी विशेष थांबा उभारण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे. यानुसार महापालिका प्रशासनातर्फे सायकल थांबा उभारण्यासाठी जागा देण्यात आली आहे. मात्र रेल्वे स्थानक परिसरात सायकल थांबा उभारल्यास टॅक्सी, रिक्षा व्यवसायावर परिणाम होईल या भीतीने येथील काही रिक्षा संघटनांनी या सायकल थांब्यास विरोध केल्याचे विश्वसनीय वृत्त आहे.

रेल्वे स्थानक परिसरात रिक्षा आणि टॅक्सी चालकांकडून सायकल थांब्याला विरोध असताना शहराच्या इतर भागात स्थानिक नगरसेवक, नागरिक यांच्या हस्तक्षेपामुळे सायकल थांब्यांचे काम रखडल्याची माहिती पुढे येत आहे. सध्या कोपरी, ज्ञानसाधना महाविद्यालय, पाचपाखाडी, गावदेवी या ठिकाणी सायकल थांब्यांचे काम पूर्ण झाले आहे. मात्र हॅपी व्हॅली, तलावपाळी या परिसरात थांबा उभारण्यासाठी नागरिकांकडून विरोध होत आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली.

रेल्वे स्थानक परिसरात सायकल थांबा उभारण्यासाठी रिक्षा युनियनकडून कोणताही विरोध नाही. रेल्वे स्थानकात सायकल थांबा दिल्यास रिक्षाच्या व्यवसायावर काही परिणाम होईल असे वाटत नाही. मात्र रिक्षा थांब्याची जागा अडवून सायकल थांबा उभारू नये.

– रवी राव, ठाणे ऑटो रिक्षा मेन्स युनियन

स्थानक परिसरात महापालिकेने सायकल थांबा उभारण्यासाठी जागा दिली आहे. आतापर्यंत परवानग्या, नागरिकांचा विरोध या प्रक्रिया पार करत शहरात २३ सायकल थांब्यांचे काम पूर्ण झाले आहे. रेल्वे स्थानक परिसरातही लवकरच सायकल थांबा उभा राहिल अशी खात्री आहे. या थांब्याचे महत्त्व लक्षात घेता लवकरात लवकर काम सुरू केले जाईल.

– संदीप माळवी, उपायुक्त ठाणे महानगरपालिका