|| सुहास बिऱ्हाडे

यूट्यूबवरील चित्रफितीवरून अल्पवयीन मुलीचा छडा

वसई: मॉडेल बनण्यासाठी घर सोडून पळालेल्या एका अल्पवयीन मुलीला पोलिसांनी एका यूट्यूब व्हिडीयोच्या आधारे शोध घेऊन बिहारमधून पुन्हा आणले आहे. या मुलीला संपर्क करण्यासाठी पोलीस मॉडेल आणि अभिनेते बनले होते. नालासोपाऱ्यात राहणारी राधिका (नाव बदललेले) ही १६ वर्षांची मुलगी मागील वर्षी घर सोडून गेली होती. याबाबत तुळींज पोलीस ठाण्यात अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. मात्र तुळींज पोलिसांनी वर्षभर काहीच तपास केला नव्हता. मुलीच्या पालकांनी पोलीस आयुक्त सदानंद दाते यांच्याकडे मदत मागितली. त्यांनी या प्रकरणाचा तपास अनैतिक मानवी वाहतूक शाखेकडे सोपवला. मात्र राधिकाचा काहीच सुगावा नसल्याने तिला शोधून काढण्याचे मोठे आव्हान होते.

राधिकाला नृत्याची आवड आहे आणि तिला मॉडेल बनायचे होते. यूट्यूब गाण्यांच्या चित्रफिती ती सारखी पाहत असायची आणि मला पण अशीच मॉडेलिंग आणि नृत्य करायचे आहे, असं तिने मैत्रिणींना सांगितले होते. तो धागा पकडून पोलिसांनी यूट्यूबवरील भोजपुरी गाण्यांचे व्हिडीयो शोधायला सुरुवात केली. बऱ्याच शोधानंतर पोलिसांना तिच्या काही चित्रफिती यूट्यूबर सापडल्या. ते बिहारमधून अपलोड झाले होते. पोलिसांनी त्या चित्रफितीच्या निर्मांत्यांशी संपर्क केला. मात्र त्यांनी दिलेला राधिकाचा नंबर बंद यायचा. एव्हाना ती बिहारमध्ये असल्याचे निष्पन्न झाल्याने पोलिसांचे एक पथक बिहारला रवाना झाले.

पोलिसांनी बिहारच्या सरसा जिल्ह्यातील अनेक चित्रनगरी पालथ्या घातल्या. तिचा एक नंबर एका चित्रनगरीतून मिळाला. पण ती केवळ व्हॉटसअप कॉलवरच बोलायची. त्यामुळे पोलिसांनी शक्कल लढवली. साहाय्यक पोलीस उपनिरीक्षक महेश गोसावी यांनी आपल्या व्हॉटसअ‍ॅपच्या डीपीवर मॉडेलचा फोटो ठेवला.

तिला फोन केल्यावर तिच्या मोबाइलच्या ट्रू कॉलर अ‍ॅपवर अभिनेता नाव दिसेल अशी सेटिंग ट्रू कॉलर अ‍ॅपवर केली. त्यांनतर तिला दोन मॉडेल मुली पाहिजे असा मेसेज केला. या जाळ्यात ती फसली. बोलणी करण्यासाठी पोलिसांनी तिला एका हॉटेलमध्ये बोलावले आणि तिला ताब्यात घेतले. राधिकाला नृत्याची आणि मॉडेलिंगची आवड होती. ती नालासोपाऱ्यात राहात असताना नृत्याच्या शिकवणी वर्गात जात होती. तिचे पालक मात्र तिने अभ्यास करावा असा आग्रह करायचे. यामुळे मॉडेल बनण्याच्या स्वप्नासाठी तिने घर सोडले होते. अनैतिक मानवी वाहतूक शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक भास्कर पुकळे तसेच महेश गोसावी, श्याम शिंदे, जागृती मेहेर आदींनी ही कामगिरी केली.

बेपत्ता मुलींचा शोध लावण्याला आम्ही प्राधान्य दिले आहे. आमच्या पथकाने कौशल्यपूर्ण तपास करून अवघ्या ५ दिवसात या मुलीला बिहारमधून शोधून आणले आहे. मुलीला तिच्या पालकांच्या ताब्यात सुखरूप पोहोचविण्यात आले आहे.

– सदानंद दाते, पोलीस आयुक्त, मीरा-भाईंदर, वसई-विरार पोलीस आयुक्तालय