बदलापूर रेल्वे स्थानकात रेल्वे रूळ ओलांडताना डेक्कन एक्स्प्रेसखाली चिरडून एका इसमाचा मृत्यू झाल्याची घटना सकाळी घडली आणि सायंकाळी पुन्हा प्रवाशांनी स्थानकातून बाहेर पडण्यासाठी रेल्वे रूळ गाठले. त्यामुळे प्रवाशांनाही आपल्या जिवाची पर्वा नसल्याचे सिद्ध होते. यावर प्रवाशांचे प्रबोधन करण्याच्या हेतूने रोट्रॅक्ट क्लबच्या सदस्यांनी ‘चेंज बदलापूर’ प्रकल्प हाती घेतला आहे. रूळ ओलांडणाऱ्या प्रवाशांना गुलाबपुष्प देऊन त्यांना रेल्वेमार्ग ओलांडू नये, अशी विनंती या माध्यमातून केली जात आहे.

कामाचा व्याप आणि त्यातून घरी परतताना रेल्वेच्या धकाधकीचा प्रवासातून स्थानकातील लोकलबाहेर पडताना रेल्वे प्रवासी त्रासलेले असतात. बदलापूर स्थानकातील पादचारी पूल आधीच अरुंद आहेत. त्यात पादचारी पुलाचा वापर करू न चढणे, उतरणे ही कसरत टाळता यावी आणि लवकरात लवकर घर गाठण्याच्या उद्देशाने प्रवासी थेट रेल्वे मार्गावरून स्थानकाबाहेर पडण्याचा पर्याय निवडतात. त्यामुळे रेल्वे रूळ ओलांडताना होणाऱ्या मृत्यूच्या घटनांत वाढ झाली आहे. या पाश्र्वभूमीवर भारत कॉलेजच्या रोट्रॅक्ट क्लब आणि रोटरी क्लब ऑफ बदलापूर इंडस्ट्रियल यांच्या संयुक्त विद्यमाने सध्या बदलापूर स्थानकात ‘चेंज बदलापूर’ हा प्रयोग राबवण्यात येतो आहे. सायंकाळी क्लबचे सदस्य गुलाबाचे फूल हाती घेऊ न रूळ ओलांडणाऱ्या प्रवाशांना देत मार्ग ओलांडू नये, अशी विनंती करतात. रूळ ओलंडण्याचे दुष्परिणाम दर्शविणारे फलकही त्यांच्या हातात असतात. सायंकाळी पाच ते रात्री आठ वाजेपर्यंत स्वयंसेवक प्रबोधन करीत आहेत. २१ मे रोजी सुरू झालेली ही प्रबोधन मोहीम २८ मेपर्यंत चालणार आहे.

नागरिकांसाठी आवाहन

गेल्या काही महिन्यांत रूळ ओलांडताना झालेल्या मृत्यूंची संख्या बदलापूर स्थानक नव्हे तर सर्वच रेल्वे स्थानकांमध्ये वाढली आहे. बदलापूर रेल्वे स्थानकात गेल्या दोन महिन्यांत  एक महिला आणि एका व्यक्तीचा मृत्यू झाला. चोरवाटा खुल्या झाल्याने प्रवासी जीव धोक्यात घालून रूळ ओलांडतात. त्यामुळे नागरिकांनीही  जिवाची पर्वा करावी, असे आवाहन रोट्रॅक्ट क्लब ऑफ भारत कॉलेजचा अध्यक्ष आशीष राजवैद्य यांनी केले आहे.