विकेंद्रित स्वयंपाकगृहाच्या माध्यमातून चार हजार रोटी

भगवान मंडलिक, लोकसत्ता

कल्याण : कल्याण डोंबिवली महापालिका हद्दीतील बेघर, गरजू, अनाथ अशा सुमारे १० हजारांहून अधिक रहिवाशांना पालिकेकडून दररोज दोन वेळचे जेवण पुरविले जाते. त्याचबरोबर डोंबिवलीत शिवमार्केट आणि म्हात्रेनगर प्रभागातील नगरसेवकांच्या माध्यमातून गेल्या महिनाभरापासून ‘रोटी बँक’ उपक्रम राबविला जात आहे. या माध्यमातून घराघरात तयार झालेल्या एकूण सुमारे चार ते पाच हजार पोळ्या कार्यकर्ते, स्वयंसेवी संस्थांच्या माध्यमातून जमा करून त्या सकाळ, दुपार विविध भागांतील गरजूंना वाटप केल्या जात आहेत.

महापालिका हद्दीत ७४ झोपडपट्टय़ा आहेत. या झोपडय़ांमध्ये मजूर, कष्टकरी, रोजंदारीवर काम करणारा वर्ग राहतो. शहराच्या विविध भागांत रिक्षाचालक राहतात. महिनाभर रिक्षा बंद आहेत. अनेक खासगी वाहनचालक आहेत. घरपोच सेवा देणारे कामगार आहेत. त्यांची टाळेबंदीमुळे परवड होत आहे. अनेक कुटुंबांकडे शिधापत्रिका नाही. त्यामुळे त्यांना शिधा दुकानातील धान्य मिळत नाही. कल्याण, डोंबिवली शहराच्या विविध भागांतील अशी कुटुंब शोधून त्यांना दुपार, रात्रीच्या वेळेत वेळेत भोजनाचा पुरवठा होईल या दृष्टीने आम्ही प्रयत्न करीत आहोत, असे शिवमार्केट प्रभागाचे नगरसेवक विश्वदीप पवार, म्हात्रेनगर प्रभागाचे नगरसेवक मुकुंद पेडणेकर यांनी सांगितले. घरोघरी तयार होत असलेल्या पोळ्या घेताना किंवा गरजूंना वाटप करताना कोणतीही छायाचित्र काढू नये या अटी शर्तीवर हा उपक्रम राबविला जात आहे. चार हजार एकत्रित पोळ्या तयार करायच्या असत्या तर भव्य स्वयंपाकगृह, शेगडय़ा, गॅस, भांडी, महिला, पुरुष असा व्याप वाढला असता. त्यामुळे घराघरात विक्रेंद्रित पद्धतीने अशी स्वयंपाकगृहे चालविली जात आहेत. या उपक्रमात सहभागी होण्यासाठी अनेक रहिवासी स्वेच्छेने पुढे येत आहेत. ‘घरातील कुटुंबासाठी जे भोजन करतो त्यामधेच थोडय़ा वाढीव पोळ्या करतो. सद्य:परिस्थितीत गरजूंना अशा मदतीची गरज आहे. त्यामुळे हे काम करताना अवघडल्यासारखे वाटत नाही,’ असे पोळ्या करून देणाऱ्या कुटुंबीयांनी सांगितले.

स्वेच्छेने भोजनाबरोबर वाढीव पोळ्या

शिवमार्केट प्रभागातील ७०० कुटुंब, म्हात्रेनगर प्रभागातील ५०० कुटुंब स्वेच्छेने घरात तयार होणाऱ्या भोजनाबरोबर चार ते पाच वाढीव पोळ्या गरजूंना देण्यासाठी तयार करतात.  दोन्ही प्रभागांतील घराघरात तयार होणाऱ्या सुमारे चार हजार पोळ्या जमा करून डोंबिवलीतील जैन मंदिरातील भव्य भोजनगृहातील कक्षात देण्यात येतात. या भोजन कक्षात भात, भाजी, डाळ, पोळ्या अशी पाकिटे तयार करून गरजूंपर्यंत पोहोचविली जातात. यामध्ये जैन, गुजराथी, मारवाडी समाजातील स्वयंसेवी संस्थांचा उत्स्फूर्त सहभाग आहे, असे पेडणेकर यांनी सांगितले. अनेक घरांमध्ये एकटेच वृद्ध, ज्येष्ठ नागरिक आहेत. काही कुटुंबातील कर्त्यां महिला टाळेबंदीमुळे अन्य शहरांत अडकून पडल्या आहेत. अशा कुटुंबातील ज्येष्ठ पुरुष मंडळींना घरपोच भोजनाची सोय केली आहे, असे नगरसेवक विश्वदीप पवार यांनी सांगितले.